केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून २० ऑगस्ट पर्यंत विविध मतदारसंघातुन ही यात्रा जाणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मनसे आमदार राजू पाटील हे कपिल पाटील यांच्या समवेत दिसल्याने पुन्हा मनसे भाजप युतीच्या चर्चांना फोडणी मिळाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटी नंतर सुरू झालेल्या मनसे भाजप युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला दिसत नाही. प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांना मिळणाऱ्या सारख्या उत्तराने यांचं नक्की चाललेलंय काय ? असा संभ्रम दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकार आणि महाराष्ट्राला पडलेला आहे. काल डोंबिवलीतील मनसे मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पणात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असोत किंवा आजची कपिल पाटील यांच्या यात्रेतील मनसे आमदार राजू पाटलांची हजेरी या सर्व गोष्टी युतीचे संकेत देत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनसे आणि भाजप विविध स्थानिक राजकीय कार्यक्रमातुन जवळीक साधत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातून युतीची चाचपणी सुरू आहे का असा संभ्रम निर्माण झालेला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांना जन आशीर्वाद यात्रेनंतर माध्यमांनी पुन्हा युतीचा प्रश्न केला मात्र राजू पाटील यांनी नेहमीप्रमाणेच आपले स्पष्टीकरण देऊ केले. कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांची जन आशीर्वाद यात्रा शीळफाटा हुन कल्याणच्या दिशेने निघाली होती. त्यामुळे ते आमच्या मतदार संघातून घरासमोरून जात असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी मी फक्त आलो होतो असे राजू पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर यामागे कोणतेही राजकारण नसल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर कपिल पाटील यांनीही राजू पाटील यांच्या समवेतचा फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताना सावधानतेने मनसे आमदार असा उल्लेख न करता कल्याण ग्रामीण आमदार असा केला आहे.
-संतोष दिवाडकर