कल्याण-डोंबिवली महापालिका परीक्षेत्रात येत्या १५ दिवसात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणेबाबत आज सकाळी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकाना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अशा बेफिकीर लोकांवर कारवाया देखील सुरू करा असे निर्देश आता महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी. असे डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यामुळे सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी. अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.
सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे त्यामुळे १५ दिवस सर्वांनी कडक लॉकडाउनचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. सकाळी ११ नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी असेही ते म्हणाले. वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या विभागात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाहणी करावी. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.
लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते. अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल तर ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे सदर भाजी मार्केट चे नियोजन अन्यत्र विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर रेस्टॉरंट मध्ये लोक उभे राहून खातांना दिसून येतात. तसेच स्टेशनबाहेर सकाळी ११ नंतर देखील फेरीवाले दिसून येतात अशी माहिती सहा.आयुक्त अनिल पोवार यांनी दिली असता रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले . ११ एप्रिलला रुग्ण संख्या २४०० झाली होती. आता आठवड्याभरात दिवसाला ५०० पर्यंत खाली आली. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात रुग्ण संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. सकाळी ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.
सदर बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कल्याण परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण व डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, परिमंडळ – ३ अंतर्गत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.