नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाच्या नामकरणासाठी सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करून वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोर्चात सहभागी होत असल्याचे देखील सांगितले आहे.
“मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.
राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.
आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.
म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.”
– राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)
-संतोष दिवाडकर