राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी कल्याणमधील सुजित रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस, कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र रोकडे यांना दिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने सुजित रोकडे यांची कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी तर आदित्य चव्हाण यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा रोकडे यांच्या नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.
सुजित रोकडे हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सक्रीय असून कल्याणमध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य असे अनेक उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबविले आहेत. पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुजित रोकडे यांनी यावेळी सांगितले.
-कुणाल म्हात्रे