कोविडशिल्ड लस घेतल्यानंतर शरीरात विशिष्ट चुंबकीय शक्ती संचारते व त्यामुळे ज्या ठिकाणी लस घेतली आहे त्या भागात व त्या आजूबाजूला चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. अशा प्रकारचा दावा करून एकप्रकारे बुवाबाजीला समर्थन केल्यासारखे होत आहे. याची पोल खोल शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी केली आहे.
लसीमुळे अंगात चुंबकीय शक्ती येऊन फक्त घरातील उथळ भांडे, चमचे, कॉईन हे चिपकत असतील तर अर्धा किलो ते एक किलोचे वजन ही चिपकायला हवे. तसेच दुकानात असलेले मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारे ५० ग्राम पासून पुढे सर्व वजने ही चिपकायला हवीत फक्त स्टेनलेस स्टील चिपकलेले दिसत आहेत. विज्ञान निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग यांवर विश्वास ठेवते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे कोणत्याही प्रकारची साधना व दैवी शक्ती नाही हे समजुन घ्यायची गरज असल्याचे स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.
चमत्कार मागे हातचालाखी किंवा विज्ञान ह्या दोन गोष्टी असतात. ह्याच विज्ञानाचा आधार घेऊन चमत्कार केले जातात ज्याला दैवी शक्तीचं नाव दिले जाते. मानवी शरीर हे मलमूत्रची गटार आहे. विविध मार्गातून शरीरातील द्रव्ये ही बाहेर टाकली जातात. त्याचप्रमाणे घामामध्ये “सिबम” नावाचा चिकट द्रव्य असतो. तो घामावाटे शरीरातून बाहेर पडतो व त्वचेवर राहतो. जर खरोखरच अंगामध्ये चुंबकीय शक्ती असेल तर जमिनीवर ठेवलेल्या वस्तू ही बोटाने स्पर्श करून उचलता यायला हव्यात. तसेच अंगात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी घरात थांबू नये कारण घरातील किंवा आसपासच्या सर्व वस्तू अंगावर येऊन चिपकतील. तरीही डोळस होऊन एखाद्या चमत्कारामागील कारणमीमांसा समजुन घ्यायला हवी असेही शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन व जागर विज्ञानाचा कार्यक्रम शाहिर स्वप्नील शिरसाठ हे ठिकठिकाणी सादर करत असतात त्यात ते विविध चमत्कारांची उकल ही करत असतात. बुवाबाजी विरोधात संघर्ष करणाऱ्यांनी स्वतःवर ठाम विश्वास ठेवायला हवा. भूलथापांना बळी पडू नये चिकित्सक होऊन एखाद्या गोष्टींमगील कारणे शोधली पाहीजेत. स्वतःला व इतरांनाही बुवाबाजी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. कारण संतांनी समाजसुधारकांनी त्यासाठीच आपले आयुष्य वेचले होते असेही ह्यावेळी शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे