कल्याण-डोंबिवली घडामोडी

लसीकरण केंद्रावर टोकनचा काळाबाजार? कमी टोकन देत असल्याचा नागरिकांचा आरोप

कोरोना पासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात राज्य सरकारने मुभा दिल्यानंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींच्या तुलनेत कमी टोकन देत असल्याने लसींच्या टोकनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो. आठवड्यातून केवळ २ ते ३ दिवसच लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. २७ गावांमध्ये असलेल्या पिसवली प्रभागात मोठी लोकसंख्या असून येथील नागरिकांच्या सोयीसाठी पेन्थोन स्कूल याठिकाणी शुक्रवारी लसीचे ३०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये २० डोस हे ऑनलाईन पद्धतीसाठी तर उर्वरित २८० डोस हे ऑफलाईन पद्धतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. असे असतांना २०० नागरिकांना देखील लसीचे टोकन देण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी केला आहे.

      प्रत्येक लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसींच्या तुलनेत नागरिकांना कमी टोकन देण्यात येतात. तसेच स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त बाहेरील नागरिक देखील या लसीकरण केंद्रावर येत असल्याने स्थानिकांना मात्र लसीपासून वंचित रहावं लागत आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारले असता काही डोस हे पालिका कर्मचाऱ्यांसाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रम सुरु होऊन कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला असतांना अद्यापही पालिका कर्मचारी लसीपासून वंचित कसे असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेने आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा उपरोधिक टोला देखील स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी लगावला आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *