कल्याण तालुक्यातील चवरे येथे वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी वटपौर्णिमेच्या दिवशी भर पावसात बांधून पूर्ण केले.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून बांधत असलेल्या आदिवासी महिलेच्या घरावर वन विभागाने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केले होते. वनविभागाच्या या कारवाईनंतर श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढत या कारवाईचा निषेध करण्यात आला होता. तसेच संबंधीतांवर कारवाई करत त्या आदिवासी महिलेला घर बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. तर प्रशासनाने घर बांधून न दिल्यास श्रमजीवी संघटना घर बांधून देईल असेही सांगण्यात आले होते.
मोर्चा मध्ये संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर यांनी ठरवल्या प्रमाणे कल्याण तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यां घर बांधणी साठी उभ्या राहिल्या व सावित्रीबाई यांच घर एका दिवसात उभ करून दिले. भर पावसात आपला संसार उघड्या वर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात यावेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू होते. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, तालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, जिजा वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे