मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी असंख्य मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मोहने वडवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे लोकार्पण केले होते. वास्तविकपणे सोमवारी या पुलाचे लोकार्पण होणार होते. मात्र ते लांबणीवर पडल्याने राजू पाटील यांनी स्वतः जाऊन पुलाचे उदघाटन करून टाकले आणि पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला. मात्र रात्री पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अधिकृत लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर खुला करणार असल्याचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यातच आता नवा पत्रिपुल आणि कोपर पूल बनल्याने काहीसा त्राण कमी झाला आहे. शिवाय सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्याने देखील काहीसा फरक पडल्याचे दिसून येते. मोहने येथील वडवली पूल देखील आता लोकार्पण सोहळ्या साठी पुन्हा बंद करण्यात आलेला आहे.
“काही तांत्रिक कारणामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. आणि याबाबत सर्व आमदारांना माहिती देखील दिली होती. मनसेने केलेले उदघाटन अनधिकृत आहे. केवळ खोडसाळपणे राजकीय स्टंटबाजी म्हणून त्यांनी असे केले आहे. या पुलाच्या कामासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता त्यानंतरच हा पूल बनला आहे. मनसेने अनधिकृतपणे उदघाटन केले होते म्हणून पुन्हा पूल बंद करण्यात आला आहे. आता लवकरच अधिकृत लोकार्पण केले जाणार आहे.”
– विश्वनाथ भोईर (शिवसेना आमदार
“जवळपास १०-११ वर्षानंतर हा पूल वापरासाठी तयार आहे. काल मंत्र्यांना वेळ नसल्याने नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुरू केला होता. मात्र तो पुन्हा बंद करण्यात आला आहे. यांना लोकांची सोय महत्त्वाची आहे की उदघाटन ?”
– राजू पाटील (मनसे आमदार)