शनिवार दि.२८ ऑगस्ट रोजी एक इसम डोंबिवली परिसरात एक चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला त्यांच्या गुप्त माहितगाराच्या मदतीने प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे क्लासिक हॉटेलच्या समोर मानपाडा रोड येथे सापळा रचला. आणि या सापळ्यात पिंजऱ्यात उंदीर फसावा तसा हा चोर अडकला.
या इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने विक्रीसाठी आणलेली रिक्षा ही चोरीची असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्याचे वय १७ वर्षे असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याचबरोबर तो मुंब्रा येथे राहणारा असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. संशयित विधिसंघर्षीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडुन तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. एकुण २,३०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच त्याच्यावर दाखल असल्याच्या गुन्ह्याची तपासणी केली असता एकूण सात गुन्हे ह्या आरोपीवर दाखल असून तीन गुन्हांची उकल कल्याण क्राइम ब्रांचने करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विधिसंघर्षीत बालकास कासावडवली पोलीस ठाणे येथे मुददेमालासह पुढील कायदेशीर कारवाई करिता ताब्यात देण्यात आले. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, दत्ताराम भोसले, मंगेश शिर्के, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.
-संतोष दिवाडकर
