कल्याण लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रेल्वे विषयक कामांचा पाहणी आढावा घेण्याकरिता आयोजित दौऱ्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक बी.के. झा यांच्यासोबत विठ्ठलवाडी स्थानकात जाऊन तेथे सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. सदर कामे आता पूर्णत्वास आली असून या सर्व कामांची पाहणी करुन नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उ.म.पा.चे नगरसेवक धनंजय बोराडे उपस्थित होते.
विठ्ठलवाडी स्थानकात पूर्व दिशेला नागरिकांना जाणे सोयीचे जावे यासाठी तिकिट घर बांधण्यात आले असून येत्या महिन्याभरात ते नागरिकांकरिता खुले करण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी येथील पूर्व दिशेकडील रस्त्यावरुन स्थानकात जाण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध करुन तेथे प्रवाशांकरिता २ सरकते जिने (एस्कलेटर्स) बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे एस्कलेटर्स नागरिकांच्या सेवेत रुजू होतील. तसेच अंबरनाथ दिशेकडील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे सोयीचे व्हावे याकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यात आले असून येत्या २० दिवसांत ही सुविधा सुरु होणार आहे.

विठ्ठलवाडी स्थानकातील पादचारी पूल पश्चिमेला उतरण्यात यावा या नागरिकांच्या मागणीची दखल घेत यासाठी प्रयत्नशील राहून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विठ्ठलवाडी स्थानकात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार आहे. या मार्गिकांच्या संरेखनाचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच या पुलासाठीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
-संतोष दिवाडकर
