महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.
कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.
कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.
-कुणाल म्हात्रे