कल्याण-डोंबिवली घडामोडी

वीजबिल वसुलीला गती द्या; कल्याण परिमंडळ प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालकांचे निर्देश

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या जवळपास दीड वर्षांपासून वीजबिल वसुलीचा आलेख सातत्याने खालावत गेला आहे. परिणामी महावितरणला दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. ही बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू विजबिलासह थकबाकी वसुलीला गती देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.

कल्याण परिमंडलात बदलीवर रुजू झालेले मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण परिमंडलातून मुख्य कार्यालयात वीज खरेदी विभागात बदलून गेलेले मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता औंढेकर, कल्याण परिमंडलातून बदलून मुख्य कार्यालयात गेलेले मुख्य अभियंता अग्रवाल, नाशिक परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनासह निसर्ग व तौक्ते चक्री वादळाच्या नैसर्गिक आपत्तीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जीवाची बाजी लावली. परंतु वेळेवर वीजबिल भरून ग्राहकांकडून या सेवेचे मोल झाले नाही. मोबाईल, डिश टीव्ही आदी सेवांचे पैसे वेळेवर भरले जात असताना उधारीवर दिलेल्या विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष झाले. ग्राहकांना अत्यावश्यक असलेल्या विजेचे बिल वेळेत भरण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक रेशमे यांनी व्यक्त केली.

कल्याण परिमंडलातून बदली झालेल्या अधीक्षक अभियंता सुनील काकडे, ज्ञानेश कुळकर्णी, प्रवीण परदेशी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, विशाल भवर यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *