महावितरणच्या कल्याण परिमंडळात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. तर सर्वच वर्गवारीतील सुमारे दहा लाख ग्राहकांकडे ५५२ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
कल्याण परिमंडळ अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या १७३१ वीजजोडण्यांचे १२४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर परिमंडलात शहरी भागातील पथदिव्यांच्या २०१७ वीजजोडण्यांचे ५१ कोटी रुपये वीजबिल येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या १०३१ वीजजोडण्यांची थकबाकी ४ कोटी ४० लाखांवर गेली आहे. दोन्ही सार्वजनिक सेवांचे थकीत वीजबिल भरून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा. अन्यथा या सेवांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने सूचित केले आहे.
परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ९ लाख ९९ हजार ग्राहकांकडे ४४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे