कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात लसीकरण अभियान प्रभावीपणे राबवली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशाचप्रकारे शहाड परिसरात सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर काल एकाच दिवशी तब्बल ४३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरण मोहिमेला सुरवात झाल्यापासून शहाड परिसरातील नागरिकांना लस घेण्यासाठी लांब जावे लागत होते. त्यामुळे शहाड परिसरातच लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. नागरिकांची हि मागणी लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे पाठपुरावा करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला शहाड परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.
या मागणीला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहाड येथील मोहन लाल देडिया इंग्लिश स्कूल याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या या आदेशानंतर भाजपाचे वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर यांनी या लसीकरण केंद्रावर मंडप आणि इतर साहित्याची स्वतः व्यवस्था करत लसीकरण केंद्र सुरु केले. हे केंद्र सुरु होताच एकाच दिवशी तब्बल ४३० नागरिकांचे लसीकरण याठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान शहाड परिसरात लसीकरण केंद्र सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
-कुणाल म्हात्रे