कल्याण :- नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले होते. मात्र संक्रांतीच्या दिवसाला समाधानकारक अशी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात आज तब्बल १२१६ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजेच बरे झाले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे या वाढत्या आकड्यांमधून काहीसे दिलासादायक वृत्त संक्राती निमित्त कल्याण डोंबिवलीकरांना मिळाले आहे.
मागील काही दिवसांपासून क.डों.म.पा. क्षेत्रात दररोज हजारो नवे कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत. जवळपास १० हजारांहून अधिकचे रुग्ण या १४ दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक प्रमाणात नोंदवले गेले आहेत. या आकडेवारी मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आलेली आहे. आजच्या आकडेवारी नुसार क.डों.म.पा. क्षेत्रात एकूण ११ हजार ३५७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सध्या प्रकृतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.
-संतोष दिवाडकर