कल्याण-डोंबिवली घडामोडी

२७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मिळणार मुबलक पाणी; पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण : २७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वसन पालिका आयुक्तांनी भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच २७ गावातील सन २००२ पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर देखील कमी करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आज मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी बोलावत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी चंद्रकांत मोटे यांच्यासह मोहन काळन, रवींद्र भंडारी, प्रकाश पाटील आणि गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला होता. त्यानुसार आज मोर्चाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट घडवून आणली. यावेळी आयुक्तांनी २७ गावातील नागरिकांना अमृत योजनेच्या माध्य्मानातून डिसेंबर पर्यंत मुबलक पाणी मिळणार असून ज्यांची घरे सन २००२ पर्यंतची आहेत त्यांनी आपल्या मालमत्ता कारच्या पावतीसह अर्ज केल्यास त्यांचा मालमत्ता कर कमी केला जाईल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती चंद्रकांत मोटे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *