कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे २७ गावांमध्ये इतर सोयी सुविधा पुरविण्यास पालिका असमर्थ ठरत असल्याने अवास्तव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारी याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७ गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला आहे.
-कुणाल म्हात्रे