कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुलांचे काम सुरू होते. पत्रिपुलानंतर काही पुल सुरू झाले त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला नवा दुर्गाडी पुल हा ३१ मे पासून लोकांच्या सेवेत येणार आहे. या पुलाची एक मार्गिका खुली केली जाणार आहे.
नवा दुर्गाडी पुल हा ठाणे मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुल आहे. कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच आंबिवली व टिटवाळा भागातील नागरिकांना मुंबईला जाण्याचा हा उपयुक्त मार्ग मानला जातो. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध तांत्रिक,नैसर्गिक व बेजबाबदारी सारख्या कारणांमुळे काम रखडत होते. त्यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने नव्या कंत्राटदारा मार्फत पुलाच्या कामाला गती दिली.
सोमवार दि.३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले जाणार आहे. या पुलावरील एक मार्गिका जूनच्या सुरुवातीलाच खुली होणार आहे. या मार्गिकेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. कल्याण शहरात सुरू असलेल्या विविध पुलांच्या कामामुळे हे शहर वाहतुकीच्या विळख्यात होते. त्यातच पत्रिपुलानंतर हा पूल सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण काहीसा कमी होणार आहे.