नवीन दुर्गाडी पुल आज पासून वाहतुकीसाठी खुला ; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ऑनलाईन तर पालकमंत्र्यांच्याहस्ते फीत कापून लोकार्पण
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेनचे अखेर आज लोकार्पण करण्यात आले असून गेल्या काही वर्षापासून भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन तर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
कल्याण भिवंडी शहराला जोडणारा तसेच ठाणे, मुंबईकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा मनाला जातो. कल्याण शहरासह आसपासच्या शहरातील हजारो नागरिक याचा वाहतुकीसाठी वापर करतात. मात्र वाहतुकीसाठी वापरत असलेला पूल अपुरा पडत असल्याने तब्बल ६ वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली. अखेर आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा करावा लागणारा सामना आता थांबणार आहे.
जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. आज यापैकी नविन दोन लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या चार लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नविन आणि २ जुन्या अशा एकूण ८ लेन नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, केडीमसी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उदघाटन प्रसंगी सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सकाळी पूलाचा पाहणी दौरा केला. यावेळी पूल बांधण्यासाठी परवानगी आणि निधी माझ्या कार्यकाळात मंजूर झाला. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होणेसाठी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला. असे असताना देखील या उद्घाटन सोहळ्यात साधे निमंत्रण देखील दिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
– कुणाल म्हात्रे



