श्रेयवादाची लढाई : मनसे आमदारा नंतर भाजप आमदारावर शिवसेनेची टीका

कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित विधानसभा क्षेत्रात एमएमआरडीए कडून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. मात्र या निधीच्या श्रेयवादावरून शिवसेना, मनसे आणि आता भाजपा अश्या तिन्ही पक्षांत चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. यातून खासदार विरुद्ध आमदार असे एकप्रकारे संघर्ष चित्र पहायला मिळत आहे.

एमएमआरडीए कडून मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या निधीमधील १२३ कोटी हे कल्याण पूर्वेतील रस्त्यांसाठी तर २७ कोटी हे मानपाडा भागा साठी मंजूर झाले आहेत. याचवरून मागील दोन दिवस कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली होती. राजू पाटील यांनी मानपाडा रस्त्याच्या निधीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन श्रेय लाटू नका असे म्हटले होते. हा विषय संपतो ना संपतो तोच आता कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेत जुंपल्याचे समोर आले आहे. माझ्याच जुन्या कामांना नवीन नावे देऊन निधी मंजूर केल्याचे दाखवले आहे असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केला होता. यावर बोलताना शिवसेना पदाधिकारी गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, आमदारांनी काहीही कामे केली नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अथक प्रयत्न करून, अधिकाऱ्यां समवेत भेटी करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील प्रस्तावित रस्त्याला निधी नेमका कुणाच्या प्रयत्नाने मिळाला आहे ? यापेक्षा हे रस्ते लवकरात लवकर बनावे अशी अपेक्षा करदाते नागरिक करीत आहेत. लांबणीवर पडलेली क.डों.म.पा. निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक खासदार आहे. तर भाजपचे दोन आणि शिवसेना मनसेचे प्रत्येकी एक एक आमदार या महानगरपालिका क्षेत्रात येतात. त्यामुळे सुरू झालेल्या राजकीय वातावरणावरून निवडणुकीचा आभास आतापासूनच निर्माण होऊ लागला की काय असे वाटू लागले आहे.

-संतोष दिवाडकर

आमदार गणपत गायकवाड यांची वचनपूर्ती; विधान सभा क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात.

कल्याण पुर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळात आपल्या मुलाच्या लग्नाचा अवास्तव खर्च टाळून त्या खर्चातून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली आहे. हि मोहीम तीन दिवसीय असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या लसीकरण मोहिमेला मिळत आहे.

कोरोना काळात सर्वत्र लसीकरण सुरु असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रावरील लसीकरणावर पुरेसा साठा होत नाही. तर दुसर्या बाजूस विविध खाजगी इस्पितळात आपल्या खिशातले सातशे ते आठशे रुपये खर्च करून लोकांचे लसीकरण होत आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळातील निर्बंधामुळे त्यांच्या मुलाचा अवास्तव खर्च टाळून स्व खर्चातील काही भाग म्हणून कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुण दिली. आणि याचप्रकारे आमदार गणपत गायकवाड यांनी वचनपूर्ती करुन सर्वसामन्य नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. सोमवारी या लसीकरणाचे उद्घाटन आमदार गणपत गायवाड यांनी केलं.

लसीकरण प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मंडळचे अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक मनोज राय, यांच्यासह इतर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हि मोहीम 3 दिवसीय असून ही लस दिव्यांग व्यक्ती, पत्रकार, रिक्षा चालक, तृतीय पंथीय, नाभिक व्यवसायिक, विधवा महिला यांना देण्यात येणार आहे.या मोहिमेत नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. यानंतर मोहिमेत टप्पा टप्याने १००० असे नागरिकांचे लसीकरण राबिवण्यात येणार आहे व या पुढे देखील अश्या प्रकारे लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी दिले.

-संतोष दिवाडकर

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आदिवासी पाडे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित?

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर देखील आदिवासी पाडे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचितच असून आदिवासी क्षेञ आढावा समीतीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी कल्याण तालुक्यातील आदिवासी पाड्यांची आदिवासी दिनानिमित्ताने पाहणी केली.  

कल्याण तालुक्यातील खडवाली, जिभोणी, कातकरीपाडा, वाव्होली, सागवाडी, मानिवली कातकरीपाडा, नेतीवली कातकरीपाडा या ठिकाणी पाहाणी दौरा करून आदिवासी जमातीतील कातकरी कुंटुबांची नागरी सुविधांबाबत चौकशी केली. यावेळी देशाच्या स्वांतञ्याच्या ७४वर्षानंतर खरे स्वांतञ्याची किरणे गरीबांच्या झोपड्डी पर्यंत पोहचलेली नाही. अनेक आदिवासी कुंटुबांना घरकुल नाही, शुध्द पिण्याचे पाणी नाही, आधारकार्ड नाही, रेशनकार्ड नाही हे सर्व कातकरी कुंटुबांना मिळाले पाहीजे. या बाबत शासनाने ठरवुन दिलेल्या योजनांची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापुर प्रकल्प आधिकारी आर.एच.किल्लेदार, तहसिलदार दिपक आकडे, गटविकास आधिकारी श्वेता पालवे, महिला व बालविकास प्रकल्प आधिकारी चौधरी,  खडवली, नंडगाव, वाव्होली सजा तलाठी मंडळ आधिकारी सांळुखे, संबधित ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक, केडीएमसी प्रभाग क्षेञ आधिकारी व कर्मचारी, श्रमजीवी  संघटनेचे पदाधिकारी जि.अध्यक्ष  आशोक सापटे, जि.सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, ता.अध्यक्ष विष्णु वाघे, उपाध्यक्ष ज्योती फसाले, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे आदीजण दौ-या दरम्यान उपस्थीत होते.

-कुणाल म्हात्रे

वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सिटी पार्क प्रमुख आणि शहर अभियंत्याची भेट

वालधुनी नदी स्वच्छता समिती च्या शिष्टमंडळाने सिटी पार्क व वालधुनी नदी संबंधित चर्चा करण्यासाठी सिटी पार्क प्रमुख जुनेजा व  शहर अभियंता सपना कोळी यांची भेट घेतली व सिटी पार्क व वालधुनी नदी स्वच्छ करण्या विषयी चर्चा केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, कार्याध्यक्ष सुनील उतेकर, सचिव आर्किटेक्ट गणेश नाईक, खजिनदार विनोद शिरवाडकर, उपाध्यक्ष पंकज डोईफोडे, भरत गायकवाड, सतिश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ साली सिटी पार्क बॉटनिकल गार्डन मंजूर झाले. हा विषय सर्व तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या संमतीने महासभेत मंजूर झाला. २०१७ साली यु पी एस मदान यांनी ज्या ठिकाणी सिटी पार्क बनवण्याचा निर्णय घेतला गेला त्या ठिकाणी  पाणी भरत असल्याकारणाने कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही असे मत व्यक्त करत आपला विरोध दर्शविला.

२०१८ साली पुन्हा पाणी भरून पूर परिस्थिती निर्माण झाली म्हणून केडीएमसीतर्फे  सीडब्ल्यूबीआरएस या पुणे येथील संस्थेशी सीआरझेड संबंधित चर्चा करण्यात आली. त्यांनी परिस्थिती समजून घेऊन पाईपलाईन पर्यंत रोड लेव्हलच्या दोन ते अडीच मीटर खाली अशी रिटेनिंग वॉल बांधण्यात यावी जेणेकरून नदीचे पाणी आत शिरणार नाही व सिटी पार्क पाण्यात जाणार नाही यासाठी हे सुचवले असल्याचे वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असता  संबंधित अधिकाऱ्यांनी  सांगितले.

    वालधुनी नदिचा उगम स्त्रोत मलंगगड येथून अंबरनाथ, उल्हासनगर ,कल्याण पूर्व ,कल्याण पश्चिम येथून खाडीत असा प्रवास ही वालधुनी नदी करते. नदी स्वच्छतेचा विषय फक्त मर्यादित नसून तिच्या उगम स्त्रोता पासून ते खाडी पर्यंत संपूर्ण लांबी विचारात घेतली जाते. हा पाटबंधारे खात्याचा विषय असून अंबरनाथ नगरपरिषद, उल्हासनगर व मनपा या तीन महानगरपालिकांचा विषय असल्यामुळे अडचण निर्माण होते असल्याचे  शहर अभियंता व जल अभियंता सपना कोळी यांनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

      हा विषय सिटी पार्क कसे बनवावे एवढाच मर्यादित आहे. परंतु अतिशय महत्त्वाचा विषय असा की या सिटी पार्कच्या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाले व रिटेनिंग वॉल मुळे पाणी अडवले जाऊन हे पाणी लगतच्या परिसरात पसरून पूर परिस्थिती निर्माण होते. कडोमनपाने बांधकामास परवानगी दिलेल्या बिल्डिंगी व दुकाने यांच्यामध्ये या वालधुनी नदीचे पाणी शिरते, लोकांचे लाखोचे नुकसान होते. जर तीन महानगरपालिकेचा विषय असल्यामुळे किंवा पाटबंधारे खात्याचा विषय असल्यामुळे अडचणी येत असतील तर यात नागरीकांचा काय दोष? पाठ बंधारे खाते व तिन्ही महानगरपालिकांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे वालधुनी नदी स्वच्छ करण्यासाठी निधी कुठून उपलब्ध करून घ्यावा हा सुद्धा त्यांचाच प्रश्न आहे. फक्त जे लोक पालिका प्रशासनाच्या काही निर्णयामुळे कायमचे पूरग्रस्त ठरले आहेत शासन दरबारी त्यांचा विचार केला गेला पाहिजे अशी मागणी वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी यावेळी केली.

-कुणाल म्हात्रे

जातनिहाय सर्वेक्षण रद्द करण्याची रेशनिंग कृती समितीची मागणी

अन्न सुरक्षा कायदा २०१३ अन्वये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची केंद्र शासनाच्या वतीने रेशन घेण्यासाठी फक्त एस.सी, एस.टी सर्वेक्षण करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार शिधावाटप कार्यालयामार्फत व शिधावाटप दुकानांमध्ये जात सांगा व रेशन घ्या असा प्रकार आढळून आल्याने समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी शिधावाटप अधिकारी कल्याण यांना निवेदन देऊन जात निहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी गेलेल्यांना जात विचारली जात असून अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थ्यांना या शासकीय आदेशाने त्यांच्यावर होणारा अन्याय असल्याचे राम बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे. बहुतांशी एस.सी, एस.टी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील समाज अन्नधान्याला मुकलेला असून तो आजही वंचित असताना तूंटपुंज्या समाजामधील लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर अन्याय करणारा आहे.

 यामुळे समाजात जातनिहाय रोष व तेढ निर्माण होणार नाही व संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन कल्याणचे शिधावाटप अधिकारी यांना निवेदनात रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी केली आहे. यावेळी समितीचे जालंदर सूर्यवंशी, संजय काकडे, नीलिमा महाजन, सुलभा पांडे, गणेश ताटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचा’ कोकणातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात; भाग २

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने केलेली मदतीची सुरुवात आणि त्यांच्या टीमचा पहिल्या दोन दिवसांचा प्रवास तर आपण जाणून घेतलातच आता पहा पुढे नेमकं काय घडलं ? परंतु ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांनी पुढील लिंकवर आधी तो वाचावा. https://mhmarathi.in/?p=954

शनिवार दि.३१ जुलै… मदतकार्याचा तिसरा दिवस. खेड तालुक्यातील संजय मोरे यांच्या निवासस्थाना पासून मदतीसाठी संपूर्ण ताफा पुढील ठिकानी रवाना झाला. सुसेरी अलसुरे मोहल्ला, शिव, भोसते येथील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना अन्नधान्य किट व इतर वस्तुंचे किट देण्यात आले. जगडुबी नदीच्या पुराने या लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची भातशेती वाहून गेली होती. रस्ते उखडले, घरे कोसळली. या सर्व भागात मदत दिल्यानंतर संपूर्ण ताफा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जायला निघाला.

उपाशीपोटी अतिदुर्गम भागाकडे रवाना :- दुपारचे तीन वाजले होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत अतिदुर्गम भागाकडे निघाले आणि प्रवास सुरु झाला. काही लोकांनी सकाळचा नाश्ता केला नव्हता. शिवाय दुपार झाली असल्याने पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले होते. मदतकार्य करता करता पोटात भुकेने गोळा उठला होता. मात्र आता प्रवास सुरु झाला होता. खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिरमिनी गावाकडे हा ताफा निघाला होता. येथीलच मु.पो.वडगाव गावात दरड कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मदतीचा हात पुढे केला.

मोबाईल टॉवर साठी करणार आमदार प्रयत्न :- गावखेड्यातील संपूर्ण प्रवासात मोबाईलला कसलेही नेटवर्क आढळले नाही. येथील लोक एका मोठ्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. ही बाब त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर ताफा निघाला आणि येथील एक जागृत देवस्थान देवी इवराई मानाई देवीच्या दर्शनासाठी काहीवेळ थांबला. देवदर्शन करून पुन्हा ताफा खेडकडे जिथे वास्तव्य होते त्या ठिकाणी निघाला. सायंकाळचे सहा वाजत आले होते. शनिवारचा निरंकार उपवास घडल्याने सर्वजन जेवणावर तुटून पडले.

दोन दिवसांच्या मदतकार्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत आलेला ताफा पुन्हा कल्याणकडे निघाला. दुसऱ्या दिवशी रविवारचा जनता दरबार आणि इतर नियोजित कार्यक्रम असल्याने ते आपल्या मतदारसंघात परतण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या समवेत निघाले. यानंतर रात्री थोडेफार जेवण करून सर्वजण झोपी गेले.

दिवस चौथा – चिपळूण :- रविवार दि. १ ऑगस्ट … मदतकार्याचा चौथा दिवस. सकाळी आवरून उर्वरित मालाच्या टेम्पोसह दोन गट करून चिपळूण येथे मदत वाटण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी निघाले. चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानीच. वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे येथील पूल देखील वाहून गेला. मात्र डागडुजीनंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. परशुराम घाटापासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. १९६५ नंतर आलेल्या भयावह पुरामुळे तालुक्यातील बाजारपेठ, जवळपास असणाऱ्या वसाहती साधारण १२ फूट पाण्यात गेल्या होत्या. काही ठिकाणी नदी प्रवाह बदलल्याने पूर परिस्थिती ओढावली असल्याचे तेथील लोक सांगत होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने त्या ठिकाणी जाऊन मदतीचा एक हात पुढे केला.

खेर्डी येथील दत्तवाडी, विकासवाडी, सती, समर्थ नगर, बाजारपेठ मोहल्ला वस्ती, माप, खिंड, वाणी, आळी, कलबसते अश्या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले. चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागातील पोसरे गावच्या बौद्ध वाडीवर दरड कोसळून जिवीतहानी झाली होती. याही ठिकाणी अध्यक्ष मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर जवळपास असलेल्या सापील्दी, धामणगाव, खोपिगाव, दसपटी येथील ओवाळी, धनगरवाडी, कडवड गावांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने मदतीचा हात दिला. चार दिवसांच्या व चार तालुक्यातील या संपूर्ण मदतकार्यात कोकण वासीयांनी संपूर्ण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आभार मानले. कल्याणहुन आलेली ही मदत महाड,पोलादपूर,खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्यक्ष गरजूंनाच देण्यात आली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मदत कोणाला करीत आहोत या बाबीवर प्रतिष्ठाण भर दिल्याने मदत योग्य हातात गेली असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिष्ठाणच्या मदतीने भारावले कोकणकर:- संपुर्ण ४ दिवस मदत वाटप करीत असताना आपत्तीग्रस्त नागरिकांनी संस्थेच्या लोकांना तसेच सहभागी झालेल्या आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी असोत किंवा काही ठिकाणी एसटी थांब्याकरीता निवारा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. सरकार आमच्याकडून बस थांब्याच्या निवाऱ्याकरिता पैसे मागतात असे म्हणत तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणीही मदतीसाठी पोहोचलं नव्हतं सरकार देखील इथे आलं नसेल अशा भागात तुम्ही मदत घेऊन आलात. ही आम्हाला मिळालेली पहिली मदत आहे. कारण बाकीचे लोक शहरातच मदत वाटून निघून जातात पण आमच्या दुर्गम भागात कधी कोणी आलं नव्हतं. तुमची ही मदत खरोखरच लाखमोलाची आहे. अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रतिष्ठाणचे आभार मानले. शिवाय गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि प्रश्न यावर नक्कीच मार्ग काढला जाणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी गावकऱ्यांना दर्शवला.

मदतकार्यात सहभागी सेवेकरी :- कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या या मदतकार्यात कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक/अध्यक्ष संजय बाबुराव मोरे, कार्याध्यक्ष रमाकांत देवळेकर, उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, सचिव संदीप तांबे, उपखजिनदार अजय पवार, सल्लागार तसेच प्रसिद्धी प्रमुख शरद शिंदे, त्याचप्रमाणे दीपक गायकवाड, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिल राऊत, राहुल कासारे, योगेंद्र यादव, प्रदीप उपाध्याय, सदानंद शिंदे, संतोष परब, संतोष गुरव, रुपेश साळुंखे, मंगेश पवार, मंगेश सकपाळ, गणेश शिंदे, अविनाश शिरकर, मनीष पाटील, सचिन कुरणे, रदणेश महाडिक, अजय महाडिक, इलाखी कोनार, प्रशांत पवार, प्रितेश आचरेकर, साहिल मोरे, संतोष दिवाडकर, तिसाई ग्रुपचे अरुण दिघे, मनोज माळी, संदीप सरवणकर, अमीत धानजी, विशाल जोगदंड, अज्जू गायकवाड, नितीन शिंदे, प्रमोद माने, तुकाराम मापरी, साजीत खान, सूरज भारद्वाज, गौरव सरवणकर, रामदास तळपदे तसेच कल्याण कल्याण पूर्व व्यापारी संघटना आणि इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान कोकण दौऱ्यात लाभले. मदत करताना द्यावयाचे सामान व मदत देण्याचे ठिकाण आगोदर निश्चित करण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण यांच्या कडून इतर संस्थांना करण्यात येत आहे.

-संतोष दिवाडकर

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – मनसेचा रेल्वेला ईशारा

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची मागणी मनसेने केली असून कल्याण मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्र अधिकारयांना, कल्याण स्टेशन अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, रेल सुरक्षा बळ यांना  निवेदन दिले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करू न दिल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोना काळात सावधगिरी म्हणून सरकार तर्फे सर्वात आधी उपनगरीय लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आणि नंतर अतिआवश्यक सेवे करीता सुरु ही करण्यात आल्या. सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच उपनगरीय गाड्यात प्रवास करू शकतात. आता सर्व काही पूर्व पदावर येत असतानाही, सामान्य प्रवाश्याना उपनगरीय गाड्यात प्रवेश नाही, म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच काम करीत आहेत बाकीच्या लोकांनीं  घरी बसायचा का असा सवाल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.

सामान्य जनता लाचार झाली असून आता पाणी डोक्याच्या वर जात आहे. ज्या लोकांनी एक किंवा दोन्ही लस घेतलेल्या आहेत त्यांना तरी प्रवाशाची मुभा देण्यात यावी. जर येत्या दोन तीन दिवसात सामान्य प्रवाश्याचा विचार नाही केला गेला तर, मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जवाबदारी रेल्वेची असेल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले बनवताहेत उपग्रह; आयुक्तांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांचे गौरव करताना काढले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित ‘स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021’ साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.

मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.

हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

-संतोष दिवाडकर

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला १६ तासांत अटक; KDMC च्या सीसीटीव्हीमुळे लागला शोध

प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली आहे. रिक्षाच्या हूडचा  रंग युनिक असल्याने पोलिसांनी १६ तासाच्या आत प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारास बेडय़ा ठोकल्या आहेत. अजय कांबळे असे रिक्षा चालकाचं नाव असून रशीद शेख असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे. हे दोघे कल्याण पूर्व भागातील पत्रिपुल श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत.

आकाश जैयस्वाल याने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील निक्कीनगर  चौकातून कल्याण स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्न स्थळी घेऊन गेला. आकाश जवळली महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सह प्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या १६ तासात रिक्षाचालकासह त्याचा साथीदाराला गजाआड केलं असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व नांदीवलीत वाहन पासिंग मध्ये भ्रष्टाचार ? उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे होतेय चौकशीची मागणी

वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली असून याबाबत पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी महासचिव राहुल काटकर, पवन दुबे, प्रविण के. सी., राज द्विवेदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील नंदिवाली तलाव येथे कल्याण व ठाणे आरटीओ मधील गाड्यांचे पासिंग करण्यात येते. या ठिकाणी  आरटीओ अधिकारी, दलाल व काही स्थानिक मिळून वाहन पासिंग करताना वाहन चालक, मालक यांची लुट व फसवणूक करत आहेत. या ठिकाणी वाहन पासिंग करताना लाखों रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. शनिवार व रविवार या दिवशी काही विशेष दलालांच्या गाड्यांचे पासिंग करण्यात येत आहे. आरटीओ नियमानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी वाहन पासिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक अधिकारी जास्तीत जास्त ४० वाहन पासिंग करु शकतात.

काही दलाल गाडी पासिंग करण्यासाठी ऑनलाइन मध्ये देण्यात आलेल्या तारखेला वाहन पासिंग न करता शनिवार व रविवार या दिवशी वाहन पासिंग करतात. वाहन पासिंग साठी आरटीओ नियमानुसार गाडी मध्ये काही त्रुटी असताना व आवश्यक कागद पत्र नसताना देखील अधिकारी व दलाल आर्थिक संगणमत करुन वाहन पासिंगकरत आहेत. तसेच वाहन पासिंग साठी बुक मध्ये लेखा जोखा देखील करत नाहीत. पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्या कडुन अनधिकृत पणे पार्किंग साठी १०० रुपये घेतले जात आहेत. पार्किंगची पावती (बनावट पावती) असल्या शिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत.

पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्याकडुन अनधिकृत पणे गाडी सॅनिटायझर करण्यासाठी म्हणून जबरदस्ती १०० रुपये घेतले जात आहेत. सॅनिटायझर केल्याशिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहन चालक मालक यांना गाडीला विशेष व्यक्ती कडुन गाडीला रेडीयम लावण्यासाठी सक्ती अधिकारी यांच्या कडुन करण्यात येत आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार असून यामुळे  नागरिकांची मोठी लुट होत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

या सर्व मुद्दयांवर ७ दिवसात तृतीय पक्षा मार्फत चौकशी करुन चालु असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे आरटीओ कार्यालयामध्ये तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर नांदिवली येथील भ्रष्टाचार करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, दलाल व सामील असलेल्या काही स्थानिकांच्या व्हडीओ ऑडिओ क्लिप्स देखील असल्याचे बोलले जात आहे.

-कुणाल म्हात्रे