६ वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मोक्कातील आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने पकडले जाळ्यात

कल्याण :- शनिवारी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये मोक्का अंतर्गत ६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-३१ वर्षे रा. इंदिरानगर, आंबिवली हा बर्‍याच दिवसांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आरोपीची पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

       या आरोपीवर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत ४, आर.के.मार्ग पो.स्टे. मध्ये ५, तर मानपाडा आणि ताडदेव पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. हि कामगिरी व.पो.नि विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

कल्याण : कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महापालिका क्षेत्रातील १८ वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांसाठी, प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी जावून लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी त्याचप्रमाणे दिव्यांग व आजारी व्यक्तींनी देखील महानगरपालिकेच्‍या लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही टळलेला नाही, परदेशात कोविडची तिसरी लाट आली आहे. भारतातही कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर १८ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविशिल्ड/कोव्हॅक्सिन लस घेतली नसल्यास त्यांनी तातडीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. तसेच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी ८४ दिवस पूर्ण झाल्यावर व ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल त्या नागरिकांनी २८ दिवस पूर्ण झाल्यावर तातडीने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ चे लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे व त्या पासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. त्यामुळे कोविड लसीचे २ डोस घेवून आपले आणि कुटूंबियांचे कोविड पासून संरक्षण करावे.

महापालिकेच्या कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत आपल्या घराजवळ ठिकठिकाणी लसीकरण सत्र चालविण्यात येत आहे. जेणे करुन प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल. लसीकरण केद्रांची माहिती दररोज फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्टाग्राम, व्टिटर तसेच महापालिकेच्या संकेत स्थळावर दररोज सायंकाळी प्रसिध्द केली जाते.

-कुणाल म्हात्रे

वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर