परदेशातून आलेल्या १०९ लोकांचा पालिका घेतेय शोध; पालिकेला माहिती देण्याचे आयुक्तांकडून आवाहन

कल्याण :- कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत २९५ नागरिक आले असून त्यापैकी  १०९ जणांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाश्यानी पालिका प्रशासनाला आपली माहिती देण्याचे आवाहन क.डों.म.पा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट आद्यप येणे बाकी आहेत. यातील ३४ लोकं ही केडीएमसी बाहेरचे रहिवासी असून उर्वरित१०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अनेकांचे फोन बंद येत आहेत तर अनेकांच्या घराला कुलूप असल्याने संपर्कात अडथळा येत असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

परदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ऍट रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना ७ दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. तसेच ८  व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तर पुन्हा ७ दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक कॉरंटाईन केले जाईल.

ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे. नागरिकांनी ही आपल्या आरोग्य बरोबर इतरांचे प्रकृती आणि आरोग्य सुदृढता कशी राहिल याकडे सामाजिक बांधिलकी तुन पाहिले पाहिजे.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई केली जाणार. गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान लस न घेतलेल्यानी लगेचच कोवीड लस घेण्याचे आवाहन केले गेले. कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस ही महत्वाचा घटक असून ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता पर्यंत ७२ टक्के नागरिकांचा पहिला आणि ५२  टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला झाला असल्याची माहिती आयुक्तां कडून देण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पुर्वेतील भाजपच्या रोजगार मेळाव्यातुन शेकडोंच्या हाताला काम; विविध औद्योगिक कंपन्यांचा सहभाग

कल्याण :- पूर्वेतील भारतीय जनता पार्टी व श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जवळपास दिड हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यातील मुलाखतीद्वारे शेकडो लोकांच्या हाताला नवे काम लागले आहे. या उपक्रमासाठी कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष संजय बा. मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे अनेक लोकांच्या हातचे काम सुटले. बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवतरुण तसेच गरजूंच्या हाताला पुन्हा काम लागावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावा यासाठी हा मेळावा आयोजित करीत असल्याचे कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. बँकिंग, कॉल सेंटर, सेक्युरिटी, बॅक ऑफिस, शैक्षणिक, वैदयकीय, रिअल इस्टेट, मॅकेनिक अशा विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होत्या. असंख्य नव तरुण व तरुणी यांनी फॉर्म भरून मुलाखती दिल्या. विविध क्षेत्रातील संस्थांना या मेळाव्यामार्फत आपल्यासाठी उपयुक्त असे एम्प्लॉय या मेळाव्यात मिळाले. शेकडो लोकांना लागलीच कॉल लेटर देण्यात आले.

कल्याण पुर्वेत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. या समवेत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील उपस्थित होते.

“आजच्या तरुणाईच्या हातात ताकद आहे, बुद्धी आहे. परंतु रोजगार नसल्याने अनेक प्रश्न उद्भवतात. याकरिता रोजगार मेळावा आयोजित करून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी व अन्य बाबी पाहता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपा कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांना त्याचा लाभही झाला. भाजपा सदैव युवकांसोबत आहे अशी ग्वाही देतो.”

संजय मोरे (अध्यक्ष, भाजपा कल्याण पूर्व)

-संतोष दिवाडकर

महाराष्ट्रात ओमीक्रोनने उघडलं खात; डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरुण आता ओमीक्रोन पोजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील हा पहिला ओमीक्रोन संक्रमित रुग्ण असून राज्यात ओमीक्रोनचा आता शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हा ३३ वर्षीय युवक दुबई-दिल्ली मार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. तिथुन टेक्सीने तो डोंबिवलीत आला. मात्र तो आला तेव्हाच त्याला हलका ताप होता. पुढे टेस्ट दरम्यान त्याचा रिपोर्ट कोरोना पोजिटिव्ह आला होता. मात्र त्याचे सेंपल्स मुंबईत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला ज्यात तो ओमीक्रोन संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णावर आता पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना जवळपास आटोक्यात आलेला आहे. असे असताना आता ओमीक्रोनने शिरकाव केल्याने महानगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यावर काय उपाययोजना करणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी घाबरून न जाता मास्कचा वापर, हात व तोंड स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे हे सर्व नियम पाळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेला व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र या नव्या प्रकरणामुळे अधिक हवालदिल झाले आहेत.

ओमीक्रोन हा कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आहे. भारतात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातुन ओमीक्रोनने भारतात आपले खाते उघडले. पहिले दोन रुग्ण या राज्यात आढळले. त्यानंतर तिसरा रुग्ण गुजरात मध्ये आढळला. आणि आता महाराष्ट्रात डोंबिवलीत चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

-संतोष दिवाडकर

Durgadi Fort : भारतीय नौसेना दिन, शिवराय आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व

भारतीय नौसेना दिन हा दिवस ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून संबोधले जाते. ( Durgadi Fort ) आजकाल समाज माध्यमांवर याबाबत सर्वाना अवगत झाले आहे. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली असल्याने त्यांना नौसेनेचे जनक म्हटले जाते. मात्र त्यांनी हे आरमार कुठे स्थापन केले ? याबद्दलची माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत आज गेलेलीच नाही.

आरमाराआधीचे कल्याण :- छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची सुरुवात कल्याण मधून केली. महाराजांच्या जन्मापूर्वी या शहरात परकीय राजवट राज्य करीत होते. पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर कब्जा केला होता. त्याकाळी कल्याणमध्ये लाकूड आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होता. कल्याण शेजारील भिवंडी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे. हातमागावर तयार झालेला कपडा जलमार्गाने देखील सर्वत्र पोहोचत असे. याच शहरात शेतीच्या अवजारांची निर्मिती होत असे. यानिमित्ताने व्यापार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी ठाणे खाडी किनारी वखारी बांधल्या. आणि त्याच्या आडोशाला गढी चौक्या देखील उभ्या केल्या.

कल्याण ताब्यात घेऊन किल्ल्याची निर्मिती :- हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी आदिलशाहीच्या ताब्यात असलेले कल्याण शहर जिंकले आणि स्वराज्यात सामील करून घेतले. खरंतर हा दिवस कल्याण शहर वासीयांसाठी स्वातंत्र्य दिवसच म्हणावा लागेल. कल्याण पाठोपाठ भिवंडी शहर देखील स्वराज्याचा भाग बनले. शिवाजी महाराजांनी कल्याण काबीज केल्यानंतर ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग अभ्यासपूर्ण हेरून घेतले. पोर्तुगीज आणि त्याच बरोबर इंग्रजांचा दूरदृष्टीने विचार करून त्यांनी कल्याणच्या खाडी किनारी दुर्गाडी किल्ला उभारायचे ठरवले. पुढे आबाजी महादेव यांना किल्ला बांधताना अमाप द्रव्ये सापडली. देवीची कृपादृष्टी म्हणून या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव मिळाले. याच दुर्गाडी किल्ल्यावर आश्रय घेऊन शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली. अनुभवी आणि कौशल्य असलेल्या तरबेज लोकांकडून त्यांनी जहाजे बांधून घेतली.

जहाजांची निर्मिती :- छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यावरून समुद्री आरमाराची सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोदी निर्माण केली. जिथून ही जहाजे बनविण्यात आली. त्यांच्या आरमारात तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तिरकाठी, मचवा, पाल, संगमीऱ्या, फत्तेमाऱ्या अशी निरनिराळी जहाजे, गलबते उभी राहिली. त्यांची जहाजे ठाणे खाडीतून दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत ये जा करत होती. ही जहाजे अरुंद होती व नाळेचा भाग निमुळता असल्याने पाणी कापून वेगही धरत होती. ही जहाजे शत्रूला चकवा देऊन सहज पुढे निघून जात होती. समुद्री स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांचे आरमार पूर्णपणे सज्ज झाले होते. पुढे याच आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी आदींवर जरब बसवली होती.

आरमाराच्या मदतीने कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले.

आरमाराच्या मदतीने समुद्रात साम्राज्य :- १६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.

१६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. मात्र जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे – वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.

नवीन जहाजांची निर्मिती :- स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत. गलबत हे आकाराने असून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

व्यापारासाठी धोरण निश्चित :- जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता शत्रूला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

संकलित लेखन :- संतोष दिवाडकर

संदर्भ :-
https://www.maayboli.com/node/31679

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/shivramaya-armaram-thane-creek-and-portuguesa/amp_articleshow/64429383.cms

मोहने येथे बांधकाम व्यावसायिकांकडून बुकिंग धारकांना तीन कोटीचा चुना; सदनिकेचा अद्यापही ताबा नाही.

मोहने :- भागीदार असणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट बुकिंग करणाऱ्या किमान ३८ लोकांचे तीन कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा अद्यापही दिला नसल्याने ग्राउंड प्लस सात मजली इमारत कामाविना जैसे थे अवस्थेत असल्याने या विरोधात बुकिंग करणाऱ्यांनी पोलिस तसेच रेराकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला कोरोनाची झळ लागल्याचे दिसून येत आहे. मात्र इमारत बांधण्या अगोदर फ्लॅट बुंकिंग पैसे घेणे किती अंगलट येणार हे आता शासकीय यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांच्या कारवाईवर अवलंबून आहे.

मोहने येथील शांताराम पाटील नगर येथे बांधकाम व्यावसायिक असलेले आनंद दुबे, भरत मलिक व विजय उपाध्याय या तिघांनी बालाजी डेव्हलपर्सच्या नावाने गार्डन इस्टेट संकुलनाचे २०१६ रोजी बांधकाम सुरू केले होते. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगररचना विभागाने या कामाला मंजुरी दिल्याने परिसरात असणाऱ्या नागरिकांनी लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या सदनिकेचा नोंदणीकृत खरेदी करारनामा केला होता. एकूण ५६ फ्लॅट अस्तित्वात असून ३८ नागरिकांनी बुकिंग करतावेळेस लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकाला त्यावेळेस देण्यात आले होते. बुकींग करता वेळेस इच्छुकांनी खासगी तसेच पतपेढी व विविध वित्तीय बँकांकडून कर्ज काढुन विकासकांना दर महिन्याला लोनचा हप्ता देण्यात येत होता. ३८ नागरिकांचे लोनचे हप्ते पूर्ण फिटूनही अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही.

बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट धारकांना २०१९ ते २०२० पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगण्यात आले होते. २०२१ हे वर्षही उलटून चालले असताना बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेराकडून देखील २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदनिकेचा ताबा देण्याबाबतची शेवटची तारीख देण्यात आली होती.
सदर इमारतीतील घरे विकासकाने बुकिंग रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा केला असतानाही काम अपूर्ण ठेवले असून कामाकडे विकासक संपूर्ण दुर्लक्ष करीत असून सदनिकाधारकांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप बुकींग धारकांनी केला आहे. विकासकांच्या अशा वर्तनामुळे सदनिकाधारकांच्या कर्जाचे हप्ते व घरांचे भाडे यामुळे सदनिकाधारकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

सदनिकाधारकांचे फोन न उचलणे आणि उचलल्यास शिव्या व धमकी देणे आदी प्रकार होत असल्याने याबाबत सदनिकाधारकांनी खडकपाडा पोलीस स्टेशन तसेच रेराकडे याबाबत तक्रार केली आहे. विकासकांनी मोठ्या प्रमाणात आमची किमान तीन कोटी रुपयांची आर्थिक लूट करून अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप ३८ सदनिका बुकिंग केलेल्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या अनागोंदी कारभाराची चौकशी होऊन पीडितांना दिलासा देणारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात विकासक भरत मलिक यांच्याशी संपर्क साधला असता कोविडमध्ये काम बंद होते. मात्र आता ते सुरू करण्यात आले असून इमारतीचे फिनिशिंगचे काम सुरू करणार असून लवकरच त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.

-रोशन उबाळे

डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपीं विरोधात आरोप पत्र दाखल; ३३ पैकी चौघांना जामीन मंजूर

डोंबिवली :- मानपाड़ा पोलिस स्टेशन मध्ये २२ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. यात तब्बल ३३आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी १५ वर्षीय मुलीवर ९ महिने लैगिक अत्याचार केला होता .यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकत्ये यांचा समावेश असल्याने पोलीस प्रशासनावर ही मोठा दबाव होता. प्रकरण संवेदनशील असल्याने मानपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय मध्ये ८८५ पानांचे चार्जसीट (दोषारोपपत्रक) दाखल केले असून १२२ साक्षीदार जाब जबाब नोंदविण्यात आले आहे.

या घटनेत तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून एकूण ३३ जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेचा तपास महिला सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला. या घटनेचा तात्काळ निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर मोठा दबाव होता.  साधारणत: पोलीस कोणतीही घटना घडल्यानंतर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करतात. मात्र या प्रकरणात दीड महिन्यात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा शेखर बागडे यांनी दिली.

 एकूण ३३ आरोपींपैकी ४ आरोपी अल्पवयीन असून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित २९ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. पीडितेवर डोंबिवली, नवी मुंबई, रबाळे, मुरबाड या ठिकाणी बलात्कार आणि नशेचे पदार्थ ही देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

-रोशन उबाळे

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्यांनी त्यांची माहिती पालिकेला द्यावी; क.डों.म.पा. ने केले आवाहन

कल्याण :  गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य  विभागाला कळविण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ओमायक्रॉन विषाणूचा परदेशात झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात जोखमीच्या देशातून म्हणजेच युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोटस्‍वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड,‍ झिम्‍बॉबे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्रायल या व शासनाने वेळोवेळी  निर्धारित केलेल्या इतर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व नागरिकांनी भारतात परतल्यानंतर आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा लोकांना ७ दिवस घरी विलगीकरणात राहायचे आहे. व ८ दिवसांनी पुन्हा तपासणी करायची आहे आणि त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील ७ दिवस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायचे आहे.

परंतू जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येईल व त्यातुन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील उपचाराची रुपरेषा निश्चीत केली जाईल. यामधून ५ वर्षाखालील मुलांना वगळण्यात येत आहे, परंतू जर त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर मात्र त्यांची आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील.

परदेशातील काही देशात ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीया या देशातून काही दिवसापूर्वी भारतात आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची आरटी पीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आढळून आली, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

 या नविन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसात परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेस कळवावी त्याचप्रमाणे स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट महानगरपालिकेच्या चाचणी केंद्रातून करुन घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटयांनी देखील आपल्या गृहसंकुलात गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास किंवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण उल्हासनगरच्या काही भागांत भटक्या कुत्र्यांची नागरिकांत दहशत

कल्याण :- पूर्वेतील आडीवली तसेच उल्हासनगर मधील काही भागांमध्ये कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. लहान मुलांचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्व आडीवली ढोकळी तलावाजवळील कचराकुंडीच्या शेजारी असलेल्या कृष्ण नगरीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून लहान मुलांना कुत्र्या कडून चावे घेण्याचे प्रकार घडत असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांना कुत्र्याकडून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ होत असून पालिका प्रशासनाने या परिसरातील भटक्या कुत्र्यांवर आळा घालून त्यांचं निर्बीजीकरण करणं गरजेच मानलं जातं आहे.

उल्हासनगरमध्ये रात्रंदिवस झुंडीने भटक्या कुत्र्यांचा वावर असून रात्री बाहेर फिरणं देखील नागरिकांना कठीण झालेय आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार नक्की शहरात कार्यरत आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय. एखाद्या बालकाचा जीव जाण्यापूर्वीच प्रशासन जागे झालं तर अनुचित प्रकार टाळता येईल एवढ मात्र नक्कीच.

-संतोष दिवाडकर

शेअर रिक्षांचे अंतिम दरपत्रक सादर करण्याची रिक्षा संघटनेची RTO कडे मागणी

कल्याण : शेअर रिक्षा सर्वेक्षण, निश्चित भाडेदर, आक्षेप हरकत,  त्रुटी दुरूस्ती, काही रूट वर पुर्नसर्वेक्षण तसेच सन २०१५ पूर्वी प्रमाणे निश्चित भाडेदर, महत्वाचे प्रवासी टप्पे या प्रमाणे अंतिम दरपत्रक सादर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे निवेदनाद्वारे केली आहे.

       शेअर ऐ रिक्षा भाडे दर निश्चिती पहीला टप्पा सर्वेक्षणात ९ रूपये ३१ पैसे होत असतांना ९ रूपये प्रतिप्रवासी निश्चित केलेली आहे. प्रवाशांना शेअर रूटवर सहजरित्या रिक्षा उपलब्धता व सुट्टे पैसे चणचण व देवाण घेवाण या वरून वादविाद टाळणे याकरीता पहिला टप्पा प्रतिप्रवासी १० रूपये अशी निश्चित करावी असे व्यवहारीकदृष्टया रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. शेअर ऐ रिक्षा भाडेदर अंतिम भाडेदर सुची जाहीर करतांना प्रत्येक रूटवर जास्त प्रवाशांचे संख्या असलेले टप्पे यादीत घ्यावे. सन २०१५ पुर्वीची शेअर रिक्षा दरपत्रक सुची वाचन व आकलन करावे.

गेली ६ वर्ष रिक्षा चालकांना भाडेवाढ मिळाली नव्हती. नवीन भाडेवाढ जाहीर होवून एक वर्षानंतर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. रिक्षा दुरूस्ती खर्च टायर टयुब पंक्चर व सि. एन. जी. दरात प्रचंड दरवाढ झालेली आहे. कल्याण आर.टी.ओ. कार्यक्षेत्रात रिक्षा व्यवसाय संपुर्ण रेल्वे प्रवाशांवर व सकाळी स्टेशनकडे व सायंकाळी स्टेशनकडुन इच्छित स्थळी असा वनसाईड आहे. त्यामुळे पत्राची योग्य दखल घेवुन अंतिम रिक्षा भाडेदर पत्रक जाहिर करण्यापुर्वी रिक्षा चालक प्रतिनिधी रिक्षा संघटना यांच्याशी चर्चा विनीमय करून जुने सन २०१५ पुर्वीचे दरपत्रक आकलन करून अंतिम दरवाढ जाहीर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग १५ डिसेंबर पर्यंत बंद

कल्याण :- राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात केडीएमसीच्या शालेय समितीची बैठक केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. नवीन येणाऱ्या व्हेरीयंटचा अंदाज घेऊन नियोजन करता येईल असे प्रशासनाचे धोरण असू शकते.

या बैठकीत सध्याच्या परिस्थितीतील कोविड -१९ प्रादुर्भाव व जागतिक पातळीवर आलेला कोविड -१९ चा नवीन व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार यावर चर्चा करण्यात आली. कोविड -१९ चा व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु न करता १५ डिसेंबर २०२१ पर्येंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान १५ डिसेंबर नंतर कोविड-१९ ओमीक्रोनच्या प्रसाराबाबतची त्या वेळची स्थिती लक्ष्यात घेउन समितीचे पुन्हा बैठक घेऊन पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करायचे कि नाही हे ठरविण्यात येईल असा निर्णय सुद्धा झालेल्या या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे तूर्तास कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा ह्या १५ डिसेंबर पर्येंत बंद राहतील हे स्पष्ट झाले आहे.

-रोशन उबाळे