कल्याणचा आणखी एक महत्त्वाचा पुल होणार लोकांसाठी खुला ; ३१ मे ला मुख्यमंत्री करणार ऑनलाइन लोकार्पण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुलांचे काम सुरू होते. पत्रिपुलानंतर काही पुल सुरू झाले त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला नवा दुर्गाडी पुल हा ३१ मे पासून लोकांच्या सेवेत येणार आहे. या पुलाची एक मार्गिका खुली केली जाणार आहे.

नवा दुर्गाडी पुल हा ठाणे मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुल आहे. कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच आंबिवली व टिटवाळा भागातील नागरिकांना मुंबईला जाण्याचा हा उपयुक्त मार्ग मानला जातो. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध तांत्रिक,नैसर्गिक व बेजबाबदारी सारख्या कारणांमुळे काम रखडत होते. त्यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने नव्या कंत्राटदारा मार्फत पुलाच्या कामाला गती दिली.

सोमवार दि.३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले जाणार आहे. या पुलावरील एक मार्गिका जूनच्या सुरुवातीलाच खुली होणार आहे. या मार्गिकेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. कल्याण शहरात सुरू असलेल्या विविध पुलांच्या कामामुळे हे शहर वाहतुकीच्या विळख्यात होते. त्यातच पत्रिपुलानंतर हा पूल सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण काहीसा कमी होणार आहे.

कल्याण डोंबिवलीतील प्रश्न मार्गी लावणाऱ्या आयुक्तांची बदली ?

कल्याण मधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड नुकताच बंद करण्यात आलेला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील कचऱ्यासाठी एक वेगळे नियोजन देखील करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर आता सुशोभिकरण होऊन त्या जागेचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आहेत. आशा परिस्थितीत त्यांची बदली होऊ शकते अशी शंका समाज माध्यमांवर शहरवासीय करू लागले आहेत.

डॉ.विजय सुर्यवंशी क.डों.म.पा.चे आयुक्त झाल्या पासून त्यांनी अनेक गोष्टींची दखल गांभीर्याने घेत विविध प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता या महापालिका क्षेत्रात या अगोदरही येणारे नवे आयुक्त जोर लावून काम करताना दिसले होते. मात्र कुणी तरी आतून त्यांना दबाव टाकल्या सारखे ते अचानक थंड पडत आणि परिणामी त्यांची बदली होते असं शहरवासीय सोशल मीडियावर व्यक्त होतात. सध्याच्या आयुक्तांनी कोरोना काळात संपूर्ण मेहनत घेऊन परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. शहरात नगरसेवक महापौर ही पदे अस्तित्वात नसतानाही ते स्वतःच संपूर्ण जोर लावून काम करीत आहेत. त्यामुळे चांगल्या काम करणाऱ्या माणसांची बदली होते असा एक मानस या शहरातील जाणकारांच्या मनात आहे.

आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत महापालिका क्षेत्राला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले आहे. पत्रिपुल देखील त्यांच्याच काळात खुला झाला आहे. शहराच्या विकासासाठी लागणारी सौन्दर्यदृष्टी त्यांच्या कडे आहे असे काही राजकीय पक्षातील मंडळीचे देखील म्हणणे आहे. याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात करावयाच्या उपाययोजना देखील त्यांनी सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्यांची खरोखरच बदली झाली तर ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दुर्भाग्यची बाब ठरेल यात शंका नाही. जर प्रशासनाला या परिस्थितीत त्यांची बदली करणे योग्य वाटले तर ती विनाशकालीन विपरीत बुद्धी ठरणार यात शंका नाही.

घराच्या वाटणीच्या वादातून भावाने घेतला भावाचा जीव ; उल्हासनगरमध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा

घराच्या वाटणीत हिस्सा मिळत नाही. याला भाऊ जबाबदार असल्याच्या समजूतीतून भावानेच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

उल्हासनगर कँम्प क्र. -१ येथील भिमनगर परीसरात विठ्ठल कदम यांचे वडलोपार्जीत घर आहे. तिथं त्यांची आई जनाबाई कदम रहातात. या घराची वाटणी कर आणि मला त्यातील हिस्सा दे अशी मागणी करत मुलगा संतोष हा आईमागे तगादा लावत होता. याबाबत जनाबाई यांनी आपल्या मुलाला म्हणजेच फोन वरुन सांगितले. त्यानंतर विठ्ठल कदम आणि त्यांचा मुलगा विशाल याने संतोष पांडूरंग कदम याला समजविण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईच्या प्रॉपर्टीत भाऊ विठ्ठल हा बाधा आणत असल्याच्या समजूतीतून वाद निर्माण झाला. या वादात संतोष कदम याने विठ्ठल कदम याच्या डोक्यात लोंखडी सळईने आघात करुन त्याचा खून केला.

हि घटना उल्हासनगर खेमानी परीसरात घडली. याबाबत विशाल विठ्ठल कदम यांच्या फिर्यादी वरुन खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उल्हासनगर पोलिसांनी सदर घटनेचा तत्काळ तपास करत आरोपीला अटक केली आहे. असे उल्हासनगर झोन ४ उपायुक्त यांनी सांगितले.

बंद झालेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पालिका आयुक्तांनी केली पाहणी ; भविष्यात होणार कायापालट

२५ मे २०२० पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ केल्यानंतर आता २५ मे २०२१ रोजी वर्षापूर्तीअंती डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकणे बंद केल्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डम्पिंग ग्राउंड परिसराची घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमवेत पहाणी केली. या डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याचे बायोमायनिंग करून सपाटीकरण केले जाईल आणि या जागेवर अतिशय सुंदर असे उद्यान, सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅकची उभारणी केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

बिल्डींग परमिशन देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात, परंतु या अटींचे पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही ते पुढे म्हणाले. आता यापुढे आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल. यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते, आता ओला कचरा हा आता बायोगॅस व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो तर सुका कचरा उचलण्यासाठी काही एजन्सी पुढे आलेल्या आहेत. त्यांच्याकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

कुणाल म्हात्रे

आधारवाडीतील रहिवाशी लवकरच घेणार मोकळा श्वास ; आधारवाडी डंम्पिग ग्राऊंडवर कचरा टाकणे केले बंद

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद होण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेरीस हि प्रतीक्षा संपली असून या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे.

२५ मे २०२० रोजी शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ झाल्यापासून वर्षपूर्ती नंतर आता आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये कोविड साथ सुरू असताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी त्यांचे विभागामार्फत शून्य कचरा मोहीम २५ मे २०२० पासून राबविण्यात सुरुवात केली. कोविड कालावधीत हि मोहीम राबवताना सुरुवातीला नागरिकांकडून, लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, परंतु उपायुक्त कोकरे यांनी त्यांच्या घनकचरा विभागातील पथकामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी २०० कार्यशाळा, ५० व्हिडिओ कॉन्फरन्स आणि १० वेळा फेसबुक वर लाईव्ह जाऊन नागरिकांशी संवाद साधला होता.

त्याच प्रमाणे घनकचरा विभागामार्फत गृहनिर्माण सोसायटी मध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथे मिटिंग्स आयोजित करून त्यांना कचरा वर्गीकरण करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच महानगरपालिकाकडे असलेली कचरा संकलनाची वाहने व कर्मचारी यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात येऊन आठवड्यातील रविवार, बुधवार या दोन दिवशी फक्त सुका कचरा उचलण्याची पद्धत अवलंबण्यात आली. ओला कचरा आणि सॅनेटरी नॅपकिन हे दररोज उचलण्यात येऊ लागल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुलभ झाले.

प्लॅस्टिक वर मिळवले नियंत्रण :-

प्लास्टिक हे पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्यामुळे स्वच्छता मार्शल यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. त्याच प्रमाणे दर रविवारी प्लास्टिक संकलन केंद्रामार्फत प्लास्टिक संकलनाची व्यवस्था करण्यात आली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिला रविवारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दुसरा रविवारी कापड, गाद्या, जुने कपडे, तिसरा रविवारी काच व कागद, चौथा रविवारी चप्पल बूट फर्निचर इत्यादी वस्तूंच्या संकलनासाठी संकलन केंद्र तयार करण्यात आले. ५ किलो प्लास्टिक च्या बदल्यात एक वेळेची पोळी-भाजीची अभिनव संकल्पनादेखील महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली. या सर्व बाबींमुळे प्लास्टिकवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळाले आहे.

शहरातील कचऱ्याचे आता काय होणार ?

शहर अभियंता सपना देवनपल्ली (कोळी) व कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्या विशेष प्रयत्नांतून महापालिकेमार्फत आता उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला असून बारावे येथे २०० मेट्रिक टन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तसेच बारावे येथे प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प ही सीएसआर फंडातून तयार करण्यात आला आहे. बारावे येथे सुरू असलेल्या २५ मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पापासून सीएनजी गॅस तयार करण्याच्या प्रकल्पालाही चालना देण्यात आली आहे. आयरे, उंबर्डे, कचोरे व बारावे येथे १० टन क्षमतेने बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

क.डों.म.पा. कचऱ्यापासून मिळवते रॉयल्टी :-

महापालिका क्षेत्रात काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांचा कचरा त्यांच्या आवारात जिरवून त्याच्यापासून खत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांना मालमत्ता करांमध्ये ५ % सूट देण्यात येत आहे. सध्या महापालिका क्षेत्रात जवळ जवळ ८०-९० % कचऱ्याचे वर्गीकरण होत असून सुका कचरा हा कचरा संकलन केंद्राकडे पाठवण्यात येत असून त्यामधील सुका कचरा रिसायकलिंग अंती वापरण्यात येत आहे. उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामधून आज पर्यंत ३००० मेट्रिक टन इतक्या खताची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात सुका कचरा संकलन करण्या-या संस्था सध्या कार्यरत असून त्यांचेकडून सुका कचरा उचलण्याच्या मोबदल्यात आता पर्यंत रु.३ लाख इतकी रॉयल्टी महापालिकेस प्राप्त झाले असून अशा प्रकारे कच-या पासून रॉयल्टी मिळणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे.

खासदार, आमदार, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, स्वच्छ डोंबिवली मंच व इतर विविध सामाजिक संस्था, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचे नागरिक यांच्या मधील योग्य समन्वयाने हे शक्य झाले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

कुणाल म्हात्रे

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योगपतीने घेतली ‘रॉल्स रॉयस’ कार ; किंमत ऐकून हादराल

कल्याणचे प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांनी नुकतीच एक कार खरेदी केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही असेच आहे. कारण ही काही साधी सुधी कार नसून ‘रॉल्स रॉयस’ कंपनीची कार आहे. ही कार अत्यंत दुर्मिळ असून जगात खूप कमी लोकांकडे ही कार आहे. संजय गायकवाड यांनी हीच कार कल्याण या ऐतिहासिक शहरामध्ये आणली आहे.

संजय गायकवाड हे गेली ३० वर्षांपासून उद्योजक म्हणून कल्याण शहरात ओळखले जात आहेत. ‘गौरीविनायक बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स’ चे ते मालक असून या शहरात त्यांनी अनेक इमारती उभारल्या आहेत. एक उद्योजक आणि दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. २४ मे रोजी त्यांनी ‘रॉल्स रॉयस घोस्ट’ ही कार घरी आणली. मुळात ‘रॉल्स रॉयस’ कार ही प्रत्येकाच्या स्वप्नात असते परंतु ती अत्यंत दुर्मिळ कार असून डोळ्यांना रस्त्यावर दिसली तरी खूप मोठी गोष्ट आहे. संजय गायकवाड यांनी ८ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजून ही कार कल्याण शहरात आणल्याचे समजते. अर्थातच कार दुर्मिळ असल्याने तिची किंमत देखील तितकीच मोठी आहे. आणि ती आता कल्याणच्या रस्त्यांवर धावताना देखील दिसणार आहे.

भारतात लेम्बॉरगिनी,बुकाटी, टेस्ला,जेगवार अशा गाड्यांचा क्रेज तर आहेच पण ‘रॉल्स रॉयस’ ही कार जगभरातील सर्वात रॉयल कार मानली जाते असं अनेकांच्या तोंडून तुम्ही नक्की ऐकले असेल. या कारचा इतिहास देखील तसाच आहे. तुम्ही इंटरनेट वर अधिक माहिती घेऊन कारचा इतिहास नक्की पहा. परंतु या कार बाबतची भारतातील एक रंजक कथा देखील तितकीच चर्चेत आहे.

राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’

भारतातील एक राजा नाव जयसिंग लंडनमध्ये सकाळी फेरफटका मारीत होता. याचवेळी त्याला ‘रॉल्स रॉयस’ चे शो रूम नजरेस पडले. परंतु अंगावरील कपडे पाहून आणि तेथील कर्मचाऱ्यांनी त्या राजाला तिथून हटकले. त्यानंतर तो राजा हॉटेल वर आला आणि राजेशाही थाटात पुन्हा त्या शो रूम वर आला. त्याला पाहून तेथील कर्मचारी आवक झाले आणि त्यांनी राजा जयसिंग यांचं राजेशाही थाटात स्वागत केलं. राजा जयसिंग यांनी तिथे उभ्या असलेल्या सहा कार खरेदी करून भारतात नेल्या. तेथील नगरपालिकेला या गाड्या त्यांनी दिल्या आणि गाडीतून शहरातील कचरा साफ करण्यास सांगितले. ‘रॉल्स रॉयस’ गाडी भारतात कचरा उचलण्यास वापरली जाते ही बाब जगभरात पसरली आणि या गाडीचा खप कमी झाला. त्यामुळे कंपनीने राजा जयसिंग यांची माफी मागितली आणि सहा गाड्या भेट म्हणून पाठवून दिल्या. माफी मागितल्या नंतर राजा जयसिंग यांनी देखील कचरा उचलणे बंद करण्यास सांगितले. आणि त्यानंतर ‘रॉल्स रॉयस’ आजपर्यंत जगातील नंबर वन कार म्हणून ओळखली जाते. राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’ ही कथा भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. या गाडीचे चाहते इतके आहेत की एका सरदाराने १ नव्हे १० गाड्या खरेदी केल्या आहेत.

– Santosh Diwadkar 8767948054

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यां समवेत मलंगगड ग्रामीण भागात पाहणी दौरा

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. या चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या समवेत या भागात पाहणी दौरा केला.

तौक्ते वादळाने राज्यातील काही भागात थैमान घातले होते. या वादळाने अनेकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवी म्हणून ठाणे जिल्ह्याचे पालमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मलंगगड ग्रामीण भागात पाहणी दौरा केला. आणि गावोगावी भेटी देत शेतकऱ्यांशी चर्चा केल्या.

वादळीवार्याने शेलारपाडा गावातील प्रमोद दाभणे यांच्या घरावरचे छप्पर उडून गेले. अशावेळी शेलारपाडा गावातील एका ग्रुप ने संकटकाळी धावून मदतीचा हात पुढे केला. या वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याने तात्काळ ‘दाभणे मास्टर ग्रुप’ ने मदतीचा हात पुढे करत प्रमोद दाभणे यांना पत्रे बसवून देऊन तात्काळ मदत केली. या अगोदर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील रस्ता स्वखर्चाने तयार केला होता. तर आता नव्याने संकट येताच ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभणे, पोलीस पाटील समीर दाभणे, मा.सदस्य धनाजी दाभणे यांच्या नेतृत्वात ‘दाभणे मास्टर ग्रुप’ हा वेळेला धावून येण्याची भूमिका बजावताना दिसत आहे. अश्याच संकटकाळी गरजुंना मदतीसाठी धावून येऊ असे या ग्रुपमधील युवा सदस्य संदेश दाभणे यांनी सांगितले आहे.

परराज्यातून कल्याण डोंबिवलीत येणा-या नागरिकांना ॲन्टीजेन टेस्ट शिवाय एन्ट्री नाही ; महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची सख्त भूमिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांनी अगोदर ॲन्टीजेन टेस्ट करावी मगच शहरात यावे अशी सख्त भूमिका पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. असे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी आज दिली आहे.

परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक
कोणत्याही प्रकारची कोविडची टेस्ट न करताच शहरात दाखल होत असल्याची बाब निदर्शनास येताच आज महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याचे वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. ११ एप्रिल रोजी २४०० पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २०० पर्यंत आलेली आहे. आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन यांचे समवेत पाहणी करून परराज्यातून येणाऱ्या तसेच प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. कल्याण रेल्वे स्थानकावर आता ३ ते ४ ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असे ते पुढे म्हणाले.

‘ब्रेक द चेन’ च्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना शहरात घेतले जाईल. तसेच “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे असेही उद्गार रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी यावेळी काढले.

या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, आरपीएफ कमांडंट शहेनशहा, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर ,स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन,महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील,क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असाच काहीसा उपाय सुचवला होता. असाच पेटर्न आता कल्याणमध्ये आयुक्त विजय सूर्यवंशी राबवत आहेत असे म्हणता येईल.

कापूराचं झाडं अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का????
पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही. 
   सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.
    
     सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो. 
     
    आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
    
    आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.
    
त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.
    
   तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको. 


प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३.

रस्त्यावर बेफिकीरपणे मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाया सुरू करा ; क.डों.म.पा. आयुक्तांचे निर्देश

कल्याण-डोंबिवली महापालिका परीक्षेत्रात येत्या १५ दिवसात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणेबाबत आज सकाळी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकाना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अशा बेफिकीर लोकांवर कारवाया देखील सुरू करा असे निर्देश आता महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी. असे डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यामुळे सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी. अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.

सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे त्यामुळे १५ दिवस सर्वांनी कडक लॉकडाउनचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. सकाळी ११ नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी असेही ते म्हणाले. वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या विभागात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाहणी करावी. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.

लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते. अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल तर ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे सदर भाजी मार्केट चे नियोजन अन्यत्र विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर रेस्टॉरंट मध्ये लोक उभे राहून खातांना दिसून येतात. तसेच स्टेशनबाहेर सकाळी ११ नंतर देखील फेरीवाले दिसून येतात अशी माहिती सहा.आयुक्त अनिल पोवार यांनी दिली असता रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले . ११ एप्रिलला रुग्ण संख्या २४०० झाली होती. आता आठवड्याभरात दिवसाला ५०० पर्यंत खाली आली. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात रुग्ण संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. सकाळी ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.

सदर बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कल्याण परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण व डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, परिमंडळ – ३ अंतर्गत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.