Dwarli ते नेवाळी नाका पर्यंत घरफोड्या वाढल्या; रात्रीच्या पोलीस गस्तीची मनसेची मागणी

Dwarli : श्री मलंगगड रोडवरील द्वारली ते नेवाळी नाका परिसरात अलीकडल्या काळात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून महिलांची छेडछाड होत असल्याची माहिती मनसेचे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी हिल लाईन पोलिसांना निवेदनाद्वारे दिली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व भागात असलेला द्वारली ते नेवाळी नाका पर्यंतचा भाग हा शहरी वर्दळीपासून बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती ही अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर परिसरात घरफोड्या, दुकानफोडी वाढल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग भयभीत झाला असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.

गर्दुल्ल्यांचा वावरामुळे या भागात महिला सुरक्षित नसून छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी निवेदनात केली असून, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना भेटून प्र.क्र.११९ चे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी निवेदन दिले आहे.

Burglary increased from Dwarli to Newali Naka; MNS’s demand for night police patrolling

डोंबिवली ते मुंबई थेट KDMT बससेवा सुरू करण्याची मागणी

KDMT : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस सध्या नवी मुंबई मार्गावर यशस्वी व प्रवाशांना सोयीस्कर अशी धाव घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी युवासेनेचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळेल असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल. ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेवरचा भार काहीसा कमी होईल असे दीपेश म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरांवर येणाऱ्या लोंढ्यामुळे लोकसंख्या दुप्पटीने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला आहे. ज्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर अधिक होतो. त्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीतुन मानकोली पुलावरून मुंबई बससेवा सुरू केली तर नक्कीच सोयीस्कर बाब ठरू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Dipesh Mhatre’s demand to start direct KDMT bus service from Dombivli to Mumbai

डोंबिवली शहर होणार ग्रीन एनर्जी सिटी; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्यास सुरुवात

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत सोलार पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया मोफत पार पडणार आहे. यामुळे सोसायट्यांना सोलार पॉवर युनिट बसवणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नाहीत.

सदर योजनेसाठी सोलार पॉवर कंपन्या, सोसायट्या आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेतील माईलस्टोन गाठला आहे. यावेळी ५४ सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साईन केले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या स्नेहा रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये सोलार पॉवर युनिट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला.

या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार आहे. परिणामी तब्बल ५० ते ६०% रक्कमेची बचत होईल. यामुळे डोंबिवलीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या ग्रीन एनर्जी सिटी संकल्पनेचे स्वागत केले आहे.

एसटी महामंडळ : यावर्षी पावला गणपती बाप्पा; नऊ वर्षांत प्रथमच एसटी आली नफ्यात

एसटी महामंडळ : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळ नफ्यात आल्याने व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.

या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे. भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळ : For the first time in nine years, ST turned a profit

Gajanan Rane : कामगारांना पावला राज ठाकरेंचा ‘गजानन’; करून दिली घसघशीत पगारवाढ

Gajanan Rane : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महापे येथील नामांकित कंपनी प्रोटोलॅबच्या कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, मनसेच्या पाठपुराव्यामुळे येथील कामगारांना पगारवाढ मिळाली आहे. यासाठी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने या कामगारांनी गणेश चतुर्थीला मनसेचा गजानन पावल्याची भावना व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्ट
कंपनीच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्य अंकुश राजपूत यांच्या समवेत सरचिटणीस गजानन राणे यांची भेट घेतली होती. या वेळी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यतत्व स्वीकारले होते. या वेळी सर्व कामगारांनी गजानन राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचे ठरवले होते. परंतु या प्रसंगी राणे यांनी आज तर तुमच्या कंपनीमध्ये युनियनची स्थापना झाली आहे, जेव्हा तुमच्या सर्व मागण्या मान्य करून घेईन, तुम्हाला चांगली पगारवाढ मिळवून देईन तेव्हाच हा सत्कार मी स्वीकारेन, असे सांगितले होते.

अनेक वर्षापासून रखडलेली पगारवाढ अखेर या गणेशोत्सवात पूर्ण झाली असून त्रैवार्षिक करारही पूर्ण झाला. यामुळे आनंदी झालेल्या कामगारांनी “राज ठाकरेंचा गजानन आम्हाला पावला” असे उदगार काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही आभार व्यक्त केले. यादरम्यान कामगारांनी गजानन राणे यांचा तसेच प्रथम पुढाकार घेणाऱ्या कल्याण मधील युवा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांचा यथोचित सन्मान केला.

Gajanan Rane : Raj Thackeray’s ‘Gajanan’ steps up for workers; Gave salary hike

आमदार Ganpat Gaikwad यांचे द्वितीय पुत्र Son राजकारणात? राजकीय वर्तुळात चर्चा

Ganpat Gaikwad Son : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड हे या घटनेनंतर अज्ञातवासात आहेत. त्यांच्या पश्चात गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सक्रियपणे राजकारणात उतरल्या असून मागील काही काळापासून ते संपूर्ण मतदारसंघात वावरताना दिसत आहेत. त्यातच आता आमदार गणपत गायकवाड यांचे द्वितीय चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील नुकतेच एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी प्रथमच उपस्थित असल्याचे दिसल्यानंतर ते देखील राजकीय क्षेत्रात उतरले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

गणपत गायकवाड तरुण वयात असल्यापासूनच सामाजिक कार्यातून पुढे आले होते. त्यानंतर सलग दोन वेळा अपक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षातून तिसऱ्यांदा विजयी निवडणूक लढवली होती. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र वैभव गायकवाड यांनी देखील मागील वर्षी राजकारणात अधिकृतरित्या एन्ट्री केली होती. या संपूर्ण वर्षभरात त्यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर आता त्यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील एका राजकीय समारंभात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शुक्रवारी आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी ते उपस्थित राहिले होते. त्यांच्याच हस्ते प्रभाग क्रमांक ११८ परिसरात विद्युत एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले असून उपस्थितांनी याबाबत त्यांचे स्वागत केले.

प्रणव गायकवाड हे राजकीय गराळ्यापासून नेहमीच स्वतःला दूर ठेवत आले आहेत. साधी राहणी आणि सर्वसामान्य जीवनपद्धती अशी त्यांची ओळख असून याआधी ते धार्मिक,कौटुंबिक कार्य सोडता कधीही राजकीय अथवा सामाजिक प्रकाश झोतात आलेले नाहीत. मात्र आयोजित लोकार्पण सोहळ्याला काही कारणाने सुलभा गायकवाड यांना उपस्थित राहता न आल्याने प्रणव गायकवाड हे स्वतः उपस्थित राहिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रणव गायकवाड हे अद्याप राजकारणात आलेले नसून त्यांनी फक्त सामाजिक कार्य म्हणून सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे.

MLA Ganpat Gaikwad second son in politics?

MSRTC NEWS : एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये झाली वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

MSRTC News : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

MSRTC NEWS : Increase in basic pay of ST employees; Chief Minister’s announcement

KDMC News : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली

KDMC News : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती. 4 जे प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाई नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून तक्रारदारांचा निषेध व्यक्त केला होता. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचे समोर आले आहे. परंतु ही बदली कारवाईमुळे झाली नसून महापालिकेच्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता मनसे शाखेसमोरील पत्र्याचे शेड तोडणे महापालिकेला जास्त महत्त्वाचे वाटते का? असा सवाल मनसे पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळींनी आकसापोटी महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत मनसेने शाखेसमोरील रस्त्यालगत एक भलेमोठे होर्डिंग्ज लावले होते. ज्यात ‘कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’ असा राज ठाकरेंच्या विधानाचा मजकूर लिहलेला होता. तक्रादारांच्या डोळ्यावरची सत्तेची झापड उतरविण्यासाठी आम्ही बॅनर लावला असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी 4 जे प्रभाग क्षेत्राच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची 5 ड प्रभाग क्षेत्रात बदली केली आहे. तर 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त पदी सचिन तामखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत 5 ड प्रभाग क्षेत्राचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यावर सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनसे शेडबाहेरील पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही प्राप्त तक्रारीनुसार करण्यात आली होती. झालेल्या बदल्या या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी करण्यात आल्या असल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

KDMC News : Transfer of Assistant Commissioner who took action on shed in front of MNS branch

मालवणमधील शिवरायांच्या मूर्ती दुर्घटने प्रकरणी कल्याणचे मूर्तिकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल

जयदीप आपटे : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेनंतर कल्याण येथील या मूर्तीचे निर्माते जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. हा पुतळा भारतीय नौदलाने उभरला असून तो बनविण्याची जबाबदारी जयदीप आपटे यांच्याकडे देण्यात आली होती.

जयदीप आपटे हा कल्याणमधील अंदाजे २५ वर्षीय तरुण असून त्याने राजकोट किल्ल्यावर २८ फूट उंच ब्राँझचा पुतळा तयार केला होता. या पुतळ्याच्या बांधकामाला सुमारे 3 वर्षे लागली, जयदीपने एका मुलाखतीत सांगितले की, पुतळ्याचे निर्माण जून 2023 मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे केवळ सात महिन्यांत पूर्ण झाले होते. पोलिसांनी आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केले नसून केवळ पुतळ्यासाठी बांधलेल्या व्यासपीठाची रचना केली होती, असे सांगत चेतन पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

समाज माध्यमांवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जयदीप आपटे यांनी जे जे स्कुल ऑफ आर्ट्स व एल एस रहेजा आर्ट्स स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. जयदीप आपटे हे खरेतर एक उत्तम मूर्तिकार असून त्यांनी अनेक मुर्त्या घडविल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या मुर्त्या ह्या जिवंत असल्याचा भास होतो. यामुळेच त्यांना हे काम दिले असावे असा कयास बांधला जात आहे. मात्र एक भव्य दिव्य मूर्तीची उभारणी करण्यात ते अयशस्वी ठरले असून त्यांच्यावर टिकांचा वर्षाव होत असून ते कायद्याच्या कचाट्यातही सापडले आहेत. या घटनेनंतर जयदीप यांच्या आजवरच्या कामावर पाणी फेरलं गेलंय. मात्र संपुर्ण विश्वास नसेल तर इतके मोठं काम स्वीकारायला नको होते असेही काही जाणकार म्हणत आहेत.

A case has been registered against the sculptor of Kalyan in the case of Shivaraya idol accident in Malvan

जयदीप आपटे यांनी बनविलेल्या काही मुर्त्या :-

Kalyan MNS : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई; पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून व्यक्त केला संताप

Kalyan MNS : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महापाकिलेने तोडक कारवाई केली होती. या कारवाई विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या समोरच एक बॅनर लावला असून ही कारवाई आकसापोटी केली असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही असे राज ठाकरेंनी केलेले एक विधान त्यांनी या बॅनरवर लिहून ईशारा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सदर पत्र्याचे शेड अनधिकृत असून ते तोडण्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिका कारवाई करीत असल्याची माहिती 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्याक आयुक्त सविता हिले यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. या ढाब्यांवर बेकायदा दारूच्या पार्ट्या सुरू आहेत. काही ढाबे विना परवाना ग्राहकांना मद्यविक्रीही करीत आहेत. असले काळे धंदे सुरू असताना प्रशासनाला मनसे शाखे समोरील शेड तोडणे महत्त्वाचे वाटते का असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेड संदर्भात तक्रार केली असून सत्तेचा वापर करून अशा तक्रारी खोडसाळपणाने करून आमचे समाजकार्य बघवले जात नाही असेही मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच खोडसाळ तक्रारदारांना आम्ही एकाच ओळीत उत्तर दिले असून हा बॅनर त्यांच्या डोळ्यावरची सत्तेची मस्ती असलेली झापड काढण्यासाठी लावला असल्याचे सांगण्यात आले. आम्ही सर्व गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि वेळेवर तो चुकताही करतो असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले.

Kalyan MNS : Action on shed in front of MNS branch