KDMC Election 2026 : महायुतीतील इनकमिंगचा फुगा फुटलाच; इच्छूकांनी ठाकरे ब्रँडकडे वळवला मोर्चा

KDMC Election 2026 : महायुतीत महिन्याभरापासून सुरू असलेल्या इंकमिंगगचा फुगा फुटणार अशी शक्यता ‘एम एच मराठी’ने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. ही बाब खरी ठरली असून आता महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले असून ठाकरेंच्या पक्षांतून लढण्यासाठी आता इच्छूकांची घालमेल सुरू आहे. तर दुसरीकडे तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श.प. व इतर लहान सहान पक्षांचा विचारही केला जात आहे.

मागील महिन्याभरापासूनच उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून शिवसेना भाजप मध्ये प्रचंड इच्छूकांची गर्दी झाली. पॅनलचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांतही आपसात खेचखेची झाली. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक ओढण्याचे काम दोन्ही पक्षातून केले गेले. मात्र यातील काही माजी नगरसेवकांना पक्षात घेऊनही उमेदवारी देता न आल्याने पक्ष प्रवेश करून पायावर धोंडा पाडून घेतल्याचा अविर्भाव निर्माण होऊ लागला आहे. याउलट शिवसेना उबाठा व मनसेने शांत राहून संयमाने पाऊल टाकल्याचे दिसून आले आहे.

पक्ष सोडून गेलेले आता पुन्हा उमेदवारीसाठी मनसेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आम्ही आमची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद केली असल्याचे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. याउलट दुसरीकडे अनेक वर्षांनी मनसेत वापसी करणाऱ्या काही माजी नगरसेवकांचे मात्र जोरदार स्वागत झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? हे समजण्यासाठी अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे. अर्ज छाननी व माघारी अर्ज गेल्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध केली जाणार आहे.

KDMC Election 2026 : The bubble of incoming in the Mahayuti has burst
Thackrey in KDMC : कल्याण डोंबिवलीत ‘ठाकरे’ ब्रँड ठरू शकतो पॉवरफुल

Thackrey in KDMC : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष भरती प्रक्रियेत मग्न आहेत. काँग्रेससह दोन्ही ठाकरेंचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याचे काम दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याने शहरात दोनच पक्षांची चलती असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजकारणात आजमितीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याअनुषंगाने आतापर्यंत शांत असलेल्या ठाकरेंचे पक्ष आता ‘वेट अँड वोच’च्या भूमिकेतून बाहेर पडले आहेत. मनसे शिवसेना उबाठा नेमकी काय रणनिती करीत आहे याचा अंदाजही ते इतर पक्षांना लागून देत नसून बुधवारी त्यांनी युतीची घोषणा केली आहे.

इनकमिंगचा फुगा फुटणार? : मागील काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेसह भाजपात गेलेले आहेत. शिवसेना उबाठाचेही माजी आमदार व आमदारकी लढवलेले काही मोठे चेहरे पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ज्या पक्षात इच्छूकांचे प्रचंड ट्रॅफिक जमले आहे, त्याच पक्षात आधीपासून असणाऱ्या पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाला धरताना, दुसरे निसटून जाण्याची भीती आता दोन्ही पक्षांना लागून आहे. तर हेच निसटलेले नाराज निष्ठावंत ठाकरेंच्या ताफ्यात आता सामावू शकतात.

आतापर्यंत ओढाओढी करून शिवसेना भाजपने शक्तिप्रदर्शन करून आपणच वजनात आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र इनकमिंग इतकी झाली की महायुतीच्या घोषणे नंतर नाराज मंडळी आउटगोइंगही सुरू करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आतापर्यंत शांत असलेले ठाकरेंचं वादळ कधी घोंगावून चित्र पालटवेल हे सांगू शकत नाही. आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरीही शिवसेनेच्या विभाजनानंतर आता भाजप मोठा भाऊ बनून महापौर पदाचा दावा करीत आहे. अंबरनाथ, बदलापुरात तसे साध्यही केले आहे.

आतापर्यंत पक्षीय बलाबल : २०१५ च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी ९४ जागा या शिवसेना भाजपने जिंकल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ५२ नगरसेवक शिवसेनेचे होते. तर मनसेचेही दहा नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. आता शिवसेनेच्या विभाजनासह मनसेच्या काही माजी नगरसेवकांनीही पक्षांतर केल्याने ठाकरेंना नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. याच नव्या चेहऱ्यात मनसेचे २०१० साली निवडणूक लढवलेले काही माजी नगरसेवक पुन्हा मनसेतून निवडणूक लढवणार आहेत.

ठाकरेंचं वादळ घोंघावणार ? : राजकीय पटलावर ठाकरे बंधू मागील काही दिवस शांत होते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची शांतता असल्याचे ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडू शकतो? यापेक्षा त्यांनी कोणती व्यूहरचना केली आहे? आणि कल्याण डोंबिवलीत नेमकी काय चाल चालणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ६२ ही मॅजिक फिगर असून ठाकरे बंधूना मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वप्रथम महायुतीलाच ६० च्या आत थोपवण्याचे आवाहन असणार आहे.

Thackrey in KDMC : ‘Thackrey’ brand can be powerful in Kalyan Dombivali

जनतेचे नाव पुढे करीत राजकारण्यांचे पक्षप्रवेश; पॅनलच्या जमवाजमवीसाठी पक्षनिष्ठा खुंटीला

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीला अवघा चार आठवड्यांचा अवधी राहिला असून त्यापूर्वी पक्षप्रवेश सोहळे शहरात पार पडत आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी जो तो आपला विचार करीत असून इच्छूकांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना भाजप मध्ये प्रवेश घेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र हे पक्षप्रवेश करताना, “आम्ही जनतेच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश करतोय” असा केविलवाणा निर्वाळा करीत स्वतःचे राजकीय स्वार्थ साधले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यंदा पॅनल पद्धत असल्याने सरसकट चार उमेदवारांना एकत्र लढत द्यावी लागणार आहे. त्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसेसह अन्य घटकपक्ष आपले नशीब अजमावणार आहे. मात्र या पद्धतीत लहान पक्ष व अपक्ष लढणाऱ्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. याच बाबीचा फायदा मोठ्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस पक्षांतील माजी नगरसेवक आपापल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन जनतेच्या विकासाचे नाव पुढे करीत स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी दलबदलू राजकारण करण्यास कोणताही कमीपणा ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत सुगीचे दिवस असणाऱ्या पक्षांसोबत जाऊन पुन्हा नगरसेवक बनायचे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून पक्ष बदलले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात झालेली प्रचंड ट्रॅफिक पाहता निवडणूक महायुतीत लढावी की स्वतंत्र लढावी असाही मोठा प्रश्न शिवसेना भाजपला पडलेला आहे. दोन्ही पक्षांत प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा नाराजीनाट्ये रंगणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेस स्वतंत्र लढण्याची नामुष्की ओढवू शकते. याउलट दोन्ही ठाकरे एकवटले असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुतीपुढे टिकायचे असेल तर ठाकरेंचे एकत्र लढणेच शहाणपणाचे ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

✍️ संतोष दिवाडकर 8767948054