Kolsewadi Police : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून ८ नशा करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे. नानिकराम मंगलानी असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव असून तो खडेगोळवली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर दोन खून आणि एक विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी सर्वपक्षीय जागृक नागरीकांनी मोर्चा काढला होता. कारण खून आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सहभागी तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते. कल्याण-डोंबिवलीत अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्कॉट तयार करण्यात आले आहे. जो प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवून आहे.
कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी या बाबत सांगितले की, सोमवारी कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये एका ड्रग्ज तस्करासह आठ नशेबाजांनाही अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले नशा करणारे हे चांगल्या घरातील असले तरी ते नशेच्या आहारी गेले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अमली पदार्थांचे सप्लाय करणाऱ्यांमध्ये घाबराहटीचे वातावरण पसरले असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी तस्करांसह ५०-६० किलो गांजा अंबरनाथ बदलापूर मध्ये जप्त करण्यात आला असल्याची देखील माहिती आहे.
–संतोष दिवाडकर
Kolsewadi Police raids drug dens