विठ्ठलवाडी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्र.क्र. ९६ मध्ये काही दिवसांपूर्वी काॅंक्रीट रस्ता व गटाराचे काम करण्यात आले होते. परंतु गटार बंधिस्त करण्यापूर्वी गटार व्यवस्थित साफ न करता, तसेच खाली लावलेले प्लायवुड सुद्धा काढले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
विठ्ठलवाडी येथील सह्याद्री पार्क ते महालक्ष्मी शाॅपिंग सेंटर येथील नवीन काॅंक्रीट रस्त्यावर अर्धा एक तास मुसळधार पाऊस पडल्यास गुडघ्या पेक्षा अधिक गटाराचे पाणी साचते. यामागे काही तांत्रिक बाबी असून महापालिका व MMRDA ठेकेदार कंपनी कडुन गटारांची साफसफाई आज करण्यात आली होती. याचदरम्यान या परिसरातील रहिवासी तसेच भाजप शहर उपाध्यक्ष संदिप राजाराम जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी उपस्थित असता ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत समाजसेवक विशाल जाधव यांनी हा प्रकार श्रेयवादाच्या घाईत झाला असल्याची उपरोधक टीका समाज माध्यमांवर केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागांत रस्ते काँक्रीटीकरण तसेच बंधीस्थ गटारांची कामे करण्यात आली आहेत. याच कामांचे श्रेय मिळवण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चढाओढ लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र कामात हलगर्जीपणा, निकृष्ठता तसेच दिरंगाई होता सल्याचे प्रकार देखील समोर येत असतात. करदात्या नागरिकांना गृहीत धरून केलेल्या कामाचा पुढे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही स्मार्ट सिटीची स्मार्ट काम आहेत का? असा सवाल नागरीक विचारू लागले असून महापालिका अधिकारी कामाची पाहणी करतात की नाही असाही सवाल उपस्थित केला जातो.
–संतोष दिवाडकर

In Vitthalwadi, water accumulates on the road due to sewerage