कालीचरण महाराजांवर कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

कल्याण :- सध्या महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनलेले कालीचरण महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. १० डिसेंबर राजी कल्याण शहरात येऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

श्री शिवप्रताप फाउंडेशनच्या वतीने १० डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेत शिव प्रताप दिन साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. उपस्थित समुदायाला संबोधित करताना त्यांनी मंचावर भाषण केले होते. या भाषणातून त्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या थोर पुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्याचप्रमाणे दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सांगितले.

एसटीपीआय पार्टीचे फरदीन पैकर आणि राष्ट्रवादीचे नोवेल साळवे, मनोज नायर, पत्रकार बाळकृष्ण मोरे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याबाबत सोमवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यामुळे यानिमित्ताने कालीचरण महाराज पुन्हा कल्याण मध्ये येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

-संतोष दिवाडकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी क.डों.म.पा.चं अभिवादन; १० विद्यार्थिनींना हॅपीनेस किट्सचे वाटप

कल्याण : आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, विनय कुलकर्णी, अनंत कदम, वैदयकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जयंती दिन हा सर्वत्र “बालिका दिन” म्हणूनही साजरा केला जात असल्याने, त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महापालिकेच्या शाळांमधील १०  विद्यार्थिनींना (बालिकांना)  महापालिका शिक्षण मंडळ व अक्षयपात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा अंतर्भाव असलेल्या हॅपीनेस किट्सचे वाटप महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,इतर अधिकारी वर्ग व शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याहस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या घनकचरा विभाग मार्फत दि. ३ ते ९ जानेवारी हा सप्ताह प्लास्टिक निर्मूलन म्हणून साजरा केला जात असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील पालिकेच्या जे प्रभाग कार्यालयात; अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या तमाम महिला वर्गाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणा-या अन चूल-मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांना प्रवाहात आणणा-या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त रामदास कोकरे  यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्लास्टिक निर्मूलनची शपथ सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, प्रमाग क्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने शपथ घेतली. यात प्रभागातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

-कुणाल म्हात्रे

मोहने आंबिवली रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडेदर सर्वेक्षण विनाविलंब करण्याची मागणी

आंबिवली:  मोहने आंबिवली शहरातील रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर सर्वेक्षण विनाविलबं करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि मोहने आबिवंली विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस पोलिस प्रशासन यांचे मोहने आंबिवली विभागातील वाहतुक व्यवस्था याबाबत दुर्लक्ष होत आहे. मोहने आंबिवली हा परीसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे.  मोहने आंबिवली शहराचे झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण झालेले आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली आहे. हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असुनही मोहने आंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही बाब खेदजनक आहे.

आंबिवली मोहने शहरात वाहतुक व्यवस्था नियोजन या करिता आजगायत वाहतुक नियमन व उपाययोजना केल्या नाहीत. कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर निश्चिती सर्वेक्षण करण्यात आले पंरतु मोहने आंबिवली शहरातील प्रवासी व रिक्षा आवश्यकता व प्रवाशी व रिक्षांची अमाप संख्या जास्त असुनही रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा सर्वेक्षण शहराअतंर्गत केले नाही ही बाब आश्चर्यजनक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणा बाबत खुलासा व अवगत करुन विनाविलंब शहराअतंर्गत रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा रुट भाडेदर निश्चित सर्वेक्षण करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

३ जानेवारी पासून क.डों.म.पा. करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

कल्याण :- दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे. यासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबर द्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर द्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा सध्या सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधा सुद्धा मुलांसाठी उपलब्ध आहे. यावेळी येताना लाभार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगावा. पालिकेने नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या हद्दीत असणारे लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.

१. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम

२. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम

३. सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व

४. शक्तीधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व

५. आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम

६. मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड, आंबिवली

या लसीकरण केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) उपलब्ध राहणार आहे. लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड जवळ बाळगणे अनिवार्य राहील. महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) तेथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

-रोशन उबाळे

अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या युवकाला विनयभंगाच्या गुन्हयाखाली अटक

कल्याण :- तरुणी सोबत अश्लील चॅटिंग आणि व्हडिओ कॉल करणाऱ्या एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित युवकाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर मध्ये राहणारा गुरूदीपसिंग चतुरसिंग खालसा हा तरुण फेशन शॉ साठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड करतो. एका जाहिरातीत काम करण्यास नकार दिल्याने एका तरुणीला त्याने निशाणा बनवले. आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर करून त्याने या तरुणीशी संपर्क केला. पुढे अश्लील चॅट करून अश्लील व्हिडीओ कॉल केला. यामुळे संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी काहीही माहिती नसल्याने तांत्रिक आणि विविध बाबींच्या आधारे तपास केला. यात आरोपीने कश्या पद्धतीने हा प्रकार केला हे उघड झाले. यात विविध कंपन्यांचे आयपी एड्रेस वापरला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

रिक्षा चालकास मारहाण करून लुटणार्या पती पत्नीसह चौघे गजाआड; पोलिसांनी सहा तासात ठोकल्या बेडय़ा

कल्याण :- प्रवासी बनून पती पत्नी अंबरनाथ येथून रिक्षात बसले. त्यांनी रिक्षाचालकाला बोलण्यात गुंतवून कल्याण मध्ये आणले. याच दरम्यान त्यांचे आणखी तीन साथीदार रिक्षात बसले. केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग कार्यलयाजवळ असलेल्या सामसूम जागेत त्यांनी रिक्षा थांबवायला सांगतली. यानंतर पाचही जणांनी रिक्षा चालकास बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सहा तासाच्या आतच सीसीटीव्हीच्या सहय्याने चार आरोपींना अटक केली आहे. तर अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

अंबरनाथ पश्चिमेत राहणारा जावेद शेख हा रिक्षा चालवितो. २९ तारखेच्या रात्री एक पती पत्नी त्याच्याकडे आले होते. आम्हाला एका ठिकाणी जायचे आहे. तिथे घेऊन चल तुझे काय भाडे होईल ते देऊ असे सांगत ते रिक्षात बसले. ही रिक्षा उल्हासनगरात पोहचताच या दोघांचे अन्य तीन साथीदार आले आणि ते ही रिक्षात बसले. रिक्षा थेट कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात असलेल्या केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग प्रभाग परिसरात पोहचली. याठिकाणी या पाचही जणांनी रिक्षा चालकास एका ठिकाणी थांबवून नशापान केले. त्यानंतर जावेद शेख याला बेदम मारहाण करीत त्याला खाली पाडले. आणि त्याची रिक्षा घेऊन हे पाचही जण पसार झाले. या प्रकरणी रिक्षा चालक जावेद शेख याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख, पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. एका ठिकाणी रस्त्यात रिक्षातबसून रिक्षा जात असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. अवघ्या सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चार जणांना पा्ेलिसांना ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे.

करण दखनी विरोधात एकट्या उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल असून अंबरनाथ मध्ये देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांपैकी तिघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली जाणार आहे. त्याच बरोबर एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

-रोशन उबाळे

कल्याण मध्ये भरली माणुसकीची शाळा

कल्याण :  कल्याण मध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी हि माणुसकीची शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे राजू काऊतकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माणुसकीची शाळा ही संकल्पना शाहिरी जलसाचे निर्माते लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांच्या हस्तेच या माणूसकीच्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक माणुसकिचे दुत यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर संभाजी भगत यांनी माणुसकीची शाळा या संकल्पनेवर बोलत असतांना सांगितले कि, प्रत्येक समाजामध्ये माणसातील माणूसपण कमी होत चालले आहे. समाजात वावरताना समाजामध्ये फूट पडलेली जाणवत आहे. जात धर्म पंथ याचे याचे जोडे बाहेर काढून माणसांनी माणसातील माणुसकी जतन केली पाहिजे. या देशात एक मिनिटांत सोळा लोक आत्महत्या करीत आहेत. असे एका तज्ञानी हे मत व्यक केले आहे. कारण माणसावर येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ताण तणाव निर्माण होऊन या घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे.

या देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे माणसांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली असून यामुळे माणसं  डिप्रेशनमध्ये जात आहेत. माणुसकीच्या शाळेमध्ये फक्त एका विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या  लोकांपर्यंत ही माणुसकीची शाळा पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये नवतरुण महिला आणि आबालवृद्ध यांची देखील शाळा सुरू केली असल्याचे भगत यांनी सांगितले.यावेळी शाहीर संभाजी भगत यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आनंद नागरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शेरकर, साक्षी डोळस, अनिता कदम, मीरा वासनिक, वर्षा काळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माणुसकी शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजू काऊतकर, माधुरी सपकाळे, आम्रपाली भालेराव, कविता काऊतकर  आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत रात्री अपरात्री लुटपाट करणारे पाच वाटमारे जेरबंद

डोंबिवली :- मध्यरात्री उशिराने रस्त्याने घरी चालत जाणाऱ्या एका इसमास चाकू आणि कोयत्याचाधाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. मात्र पोलिसांत तक्रार दिल्या नंतर या वाटमारू लुटारूंना डोंबिवली राम नगर पोलिसांनी आता अटक केली आहे.

संतोष कुमार शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना अचानक काही लुटारूंनी त्यांची वाट अडवली. यानंतर या वाटमाऱ्यानी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा वस्तू काढून घेतल्या. जीवाला घाबरलेल्या संतोष कुमार यांनी सर्व वस्तू त्यांना देऊन टाकल्या. मात्र या नंतर संतोष यांनी या संदर्भात राम नगर पोलीस स्थानकात झाल्या प्रकारची तक्रार दाखल केली.

डोंबिवली राम नगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ही लूटपाट करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधणे कठीण गेले. मात्र संपूर्ण कसोशीने तपास करून पोलिसांनी त्या पाच जणांचा सुगावा लावला. यात २० ते २५ च्या वयोगटात असलेले आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी परीसरात राहणारे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.

-रोशन उबाळे

कल्याणच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं एन.डी.ए. परिक्षेत मिळवलं यश

कल्याण : वयाच्या १२व्या वर्षापासून देश सेवेची इछा मनाशी बाळगून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. च्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत कल्याण पूर्वेतील माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांचे सुपुत्र राज काळे याने यश मिळविले असून मुंबईसह संपूर्ण कोकण विभागातून उत्तीर्ण होणारा राज हा एकमेव विद्यार्थी आहे.

‘स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे’ संस्थापित आणि ‘शिवनिकेतन ट्रस्ट’ संचलित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण तालुक्यातील खडवली, जि. ठाणे येथे शैक्षणीक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या राज याने वयाच्या १२ व्या वर्षापासून अभ्यासाला सुरवात केली होती. त्याच्या या यशासाठी पुणे येथील ‘अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी’ चे संचालक तथा गणितज्ञ अनीस कुट्टी सर व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. अखेर त्याच्या या अथक प्रत्नाला अखेर यश आल्याचे राज च्या वडिलांनी सांगितले.

राजचे वडील प्रशांत काळे यांनी स्वतः वकिलीची पदवी घेतली असून कल्याण पूर्व येथे ‘जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतात. राजची आई माधुरी प्रशांत काळे ही पेशाने शिक्षिका असल्यामुळे घरचे वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आहे. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. ची ही परिक्षा ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ खडकवासला, पुणे मार्फत देशसेवेत-भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होण्यासाठी घेण्यात येतात.

या परीक्षेसाठी संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात परंतु वयाची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त १ किंवा २ वेळा ही परीक्षा बसण्याची संधी मिळते. राज यांनी या संधीचे सोने करीत प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईसह कोकण विभागाची मान उंचावली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून राज ने ‘जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळा’चे संचालक जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी देखील राजला पुढील वाटचालीसाठी शुभेचा दिल्या.

-कुणाल म्हात्रे

मागवला लॅपटॉप आणि आलं भलतंच; ऑनलाइन शॉपिंग पडली महागात

कल्याण :- पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणारे अनिल शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर जाहिरात पाहून एका लिंकवर क्लिक करून एक नॉटपॅड लॅपटॉप ऑर्डर केला. पुढील काही दिवसांनी कुरियरद्वारे त्यांना पार्सल मिळाले आणि त्यांनी अडीच हजार रुपये कुरियर वाल्याला दिले. मात्र पार्सल उघडून पाहिले असता त्यात लॅपटॉप ऐवजी बंद पडलेला पॉवर बँक देण्यात आला होता.

अलिकडल्या काळात डिजिटल ऑनलाइन व्यवहार आणि शॉपिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे तंत्रज्ञानाची माहिती घेऊन काही स्मार्ट लुटेरे ऑनलाइन स्केम करीत आहेत. अनिल शिंदे यांना फेसबुकवर अडीच हजारात लॅपटॉप मिळण्याची एक जाहिरात दिसली होती. घरातील मुलांना वापरण्यासाठी म्हणून त्यांनी ती वस्तू मागवली देखील. मात्र वस्तू घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील एका लहानग्याला कमी पैशातल्या लॅपटॉपबाबत शंका आली. वजनाने बॉक्स हलका लागल्याने त्याने व्हिडीओ केमेरा सुरू करून पार्सल उघडले. पार्सल उघडल्या नंतर त्यातून भरपूर पुठ्ठे आणि कागद बाहेर निघाले. व त्यानंतर एका कागदात त्याला जुना बंद असलेला पॉवर बँक आढळून आला. हा व्हडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.

‘शॉपिफाय’ नामक एका वेबसाईटवर आपले ऑनलाइन दुकान बनवून आपण त्यावर आपले प्रोडक्ट विकू शकतो. मात्र याच नावाचा वापर करून एका ऑनलाइन स्केमरने ‘माय शॉपिफाय’ नावाची बनावट वेबसाईट बनवली. या वेबसाईटवर एक सबडोमेन दिसून आले. ज्यात कमी पैशात लॅपटॉप विक्रीसाठी आहेत. याच ठिकाणाहुन दाखवलेल्या आमिषाला भुलून शिंदे यांनी वस्तू मागवली होती. मात्र अज्ञात स्केमरने त्यांची फसवणूक केली.

ऑनलाइन व्यवहार करताना कसे सतर्क रहावे याबाबत वारंवार बँके कडून जनजागृती केली जाते. त्यामुळे आता ऑनलाइन शॉपिंगच्या मार्फत घोटाळे करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दररोज समाज माध्यमांवर गिफ्ट, वस्तू अथवा पैशांचे अमिश दाखवून लिंक व्हायरल केल्या जातात. याच व्हायरल झालेल्या लिंकद्वारे अनेक लोकांची फसगत होते. ज्यात अनेकदा फ्लिपकार्ट, अमेझॉनचा लोगो वापरण्यात येतो. मात्र त्या साईटचा वेब अड्रेस (स्पेलिंग सहित) नक्की बरोबर आहे का ? ती वेबसाईट खरी आहे का ? याची अगोदर खात्री करून घ्यायला हवी. जर संपूर्ण खात्री असेल तरच ऑनलाइन व्यवहार अथवा शॉपिंग करावी.

-संतोष दिवाडकर

पार्सल उघडतानाचा व्हडीओ