पुन्हा ‘याच’ वस्तीतून पकडला गेला आणखी एक सराईत गुन्हेगार; कोळसेवाडी पोलिसांनी केला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

कल्याण :- कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी एका सराईत चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे. अलि हसन जाफरी अस या चोरट्याचं नाव आहे. २२ वर्षीय अलि हसन हा सराईत गुन्हेगार आहे. चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी मध्ये त्याचा हातखंडा आहे. चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.

कल्याण कोळसेवाडी परिसरात गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी चैन स्नेचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला. गुप्तहेरां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अली हसनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटरसायकल, तीन साखळ्या, ४लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आतापर्यंत कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणे, मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अली हसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे. दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी माहिती देत सहकाऱ्यांचे कामगिरी बाबत कौतुक केले. मात्र या इराणी वस्तीत वाढलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगार हे संपूर्ण शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील वेळेस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर देखील हल्ला झाला होता. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.

-रोशन उबाळे

रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक

कल्याण : रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जुने रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून याविरोधात चक्काजाम करुन रिक्षाचालकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने मध्य रेल्वेच्या कल्याण स्टेशन डायरेक्टर आणि केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीसचे काम सुरु आहे. सँटीस काम सुरू असताना प्रशासनाकडुन वाहतूक व्यवस्था संदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत यामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस प्रशासनाचे समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुना रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता अनेक दिवसापासुन कायमस्वरूपी बंद केलेला आहे. नियोजना अभावी स्टेशन परीसरात नित्यरोज वाहतुक खोळबुंन वाहतुक विस्कळीत होत आहे. त्याचे खापर नाहक रिक्षा चालकांवर फोडले जात आहे.

नित्यरोज वाहतुक पोलिसांकडुन होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षा चालकांना भरावा लागत आहे. महापालिका हद्दीत पुर्वी पासुन प्रशस्त रिक्षा स्टँड उपलब्ध नाही. रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जूने उर्वरित दोन स्टँड पर्यायी व्यवस्था न करता कायम स्वरूपी बंद करुन फक्त दोन छोट्या लाईन मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यास रिक्षा चालकांची हरकत नाही पंरतु १०० %मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद नाही शेअर पध्दतीने रिक्षा वाहतुक व रिक्षा स्टॅण्ड आवश्यकता आहे.

नियोजित सॅटीस स्टेशन परीसर वाहतुक सुधारणा प्रकल्प आराखड्यात प्रशस्त रिक्षा स्टॅण्ड व वाहतुक व्यवस्था काही एक विचार केलेला नाही. रिक्षा वाहतुक सार्वजनिक प्रवासी व्यवस्था प्रमुख घटक आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस, पोलिस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्ड बाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी महापालिका आयुक्त  व स्टेशन डायरेक्टर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

पर्यायी व्यवस्था न करता रेल्वे स्टेशन हद्दीतील जुने रिक्षा स्टॅण्ड जोर जबरदस्ती बंद केल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे स्टेशन परिसरात संपुर्ण रिक्षा लॉक करून चक्काजाम करुन तीव्र आदोलंन छेडले जाईल. उद्रेक व कायदा सुव्यवस्था गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपुर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन व संबधित यंञणा यांची राहील असा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महावितरण विभागाची मोठी कारवाई; १ कोटी २९ लाखाची वीज चोरी उघड

कल्याण :- महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या आठवड्यात विशेष पथकांनी वीजचोरी शोध मोहिमेत ३ हजार ७१८ वीज जोडण्यांची तपासणी केली. यात विशेष पथकांनी तब्बल ५०३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देत एक कोटी २९ लाख रुपयांची ९ लाख १० हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. तर पथकांच्या तपासणीत १७० ठिकाणी २६ लाख रुपयांच्या (७५ हजार ७३२ युनिट) विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.व्यापारी आणि वीज ग्राहक मधील चोरट्यांची चोरी पकडण्यात वीज विभागाला यश आले आहे .

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी, पोलिस, सुरक्षारक्षक, जनमित्र, कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी १३.४७ टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित ५०१ ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या १७० जणांवर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील पारनाका, वाडेघर, उंबर्डे, नेतीवली, हाजीमलंग, नांदिवली, शीळ, सोनारपाडा भागात १८२ ठिकाणी ४३ लाख २४ हजार रुपयांची (२ लाख ४३ हजार युनिट) वीजचोरी आढळून आली. उल्हासनगर व कल्याण ग्रामीण विभागातील अंबरनाथ पश्चिम, लालचक्की, तानाजी नगर, इंदिरा नगर, बुवापाडा, खुंटवली, व्हिनस चौक, सेक्शन-२५, कुला कँप, गोवेली, कोन, मांजर्ली, फर्डेपाडा, धसई, शहापूरच्या ग्रामीण परिसरात ८५ जणांकडे २४ लाख ९४ हजार रुपयांची (१ लाख ७१ हजार युनिट) वीजचोरी सापडली.

वसई विभागात वलिव, कोल्ही, गोखिवरे, नायगाव, उमेलमन तर विरार विभागात बाजार वार्ड, फुलपाडा, मानवेलपाडा, चंदनसार, बरफपाडा भागात ४१ लाख २० हजार रुपयांची (२ लाख ५९ हजार युनिट) वीजचोरी उघड झाली. तर पालघर विभागात बोईसर शहराचा काही भाग, नांदगाव, चिंचणी, वानगाव, सरावली, देलवाडी, दांडी परिसरात १९ लाख ५२ हजार रुपयांच्या (२ लाख ३० हजार युनिट) वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात विशेष पथकाना यश आले.

वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाई सुरू आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरी शोध व कारवाईच्या मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमधील अवैध जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने चढवले बुलडोझर

कल्याण : कल्याण मधील अवैध जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने धडक कारवाई केली आहे. ‘क’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात  जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे,या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्या बाबत पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, कल्याण प्रादेशिक कार्यालयाने काल महापालिकेस पाठवले होते. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशाप्रकारे अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर वर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले. 

आज सकाळी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाचे चार कारखाने ३ जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.

हा परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी त्वरेने उपलब्ध करून दिलेले सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे १५ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

मुरबाड नगरपंचायत निवडणूक: “थापेबाजांना निवडून देऊ नका”; शिवसेनेच्या प्रचार सभेत प्रकाश पाटलांचं मतदारांना आवाहन

मुरबाड :- राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा तर नगर विकास मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचेच असतानाही प्रत्येक वेळी मीच निधी आणला अशी थाप मारणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत सेनेच्या प्रचार सभेत मतदारांना केले आहे.

मुरबाड नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागांवर निवडणुका होत असुन ही लढत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेत होत आहे. भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत, तर सेनेने दहा ठिकाणी भाजपा विरोधात दंड थोपटले आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक भाजप सेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पालक मंत्री एकनाथ शिंदे, प्रमोद हिंदुराव, सुभाष पवार असे सर्व दिग्गज नेते रणांगणात उतरले आहेत.

भाजप हा थापाड्यांचा पक्ष आहे. मुरबाडच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी निधी पुरवला, मात्र काहीजण हे श्रेय लाटत असुन त्याच्या पाट्या लावत आहेत. अशी टीका यावेळी प्रकाश पाटील, सुभाष पवार आणि पुष्पा पाटील यांनी स्थानिक आमदारांचे नाव न घेता केली. महागाईने गरीबांचे कंबरडे मोडले असुन पंधरा लाख रुपये कुठे आहेत? असा सवालही प्रकाश पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या प्रचार सभेत उपस्थित केला.

व्हिडीओ: प्रकाश पाटील यांचे भाजपवर टीकास्त्र

मुरबाड नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून १७ पैकी १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर उर्वरित ४ प्रभागातील निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी १३, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ७, काँग्रेस ७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३ तर इतर घटक पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

-निलेश अहिरे

अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्तांचा कृती आराखडा; प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची केली उचलबांगडी

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पालिका आयुक्तांनी कृती आराखडा तयार केला आहे. या अनव्ये कारवाईसाठी पालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकार्याची खांदेपालट करून पालिकेची अनधिकृत बांधकामा प्रकरणी मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. काही प्रभाग क्षेत्र अधिकार्याची अन्य प्रभागात बदली करण्यात आली तर तीन विद्यमान प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकार्याची उचलबांगडी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हि अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी म्हणून ओळखली जात असून गेल्या दोन दीड दशकात लाखो अनधिकृत इमारती व चाळी उभारल्या गेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील आरक्षित जागेवर रात्री अपरात्री अनधिकृत इमलेच्या इमले अनधिकृत पणे उभारले जात असून त्याला पालिकेच्या काही अधिकार्यानाचा छुपा आशीर्वाद असल्याने अनधिकृत बांधकामे हि प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना भ्रष्टाचाराची कुरणे बनली आहेत असा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. प्रभाग क्षेत्रपदी विराजमान होण्यासाठी सर्वच खाबुगीरि करणार्याची धडपड सुरु असते. अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमान विभागाचे कर्मचारी व प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना वेळे प्रसंगी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पालिका आयुक्तांनी पालिकेतील अनधिकृत बांधकामांना वेसण घालण्यासाठी तसेच बेकायदेशीरपणे उभारल्या गेलेल्या बांधकामावर कारवाई साठी कृती आराखडा तयार केला असून या बेकायदेशीर बांधकामावर येत्या १५ दिवसात कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. पालिका आयुक्तांनी गेल्या अनेक वर्षा पासून प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदावर चिटकून बसलेल्या अधिकार्यांना आता नारळ दिला आहे तर काही प्रभाग क्षेत्र अधिकार्यांची अन्य प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी पदी बदली केली आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसत असल्याने आता काळा मलिदा खाणारे पालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिक हडबडून गेले आहेत. तर बांधकामांच्या तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करून पैसा खाणारे स्वयंघोषित समाजसेवक यापुढे कसे गुजारण करावे या विचारात पडलेले आहेत. मात्र अनधिकृत बांधकाम बंद झाली तर शहरांचा विकास हा निश्चितच होऊ शकतो.

-रोशन उबाळे

‘आर के बाजार’ मध्ये शेकडो कल्याण डोंबिवलीकरांनी केलं रक्तदान

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांच्या पसंतीच ग्रोसरी मार्केट म्हणजे आर के बझार. मागील १६ वर्षांपासून ग्राहकांच्या खिशाला परवडेल असे आणि उत्तम दर्जाचे गृहोपयोगी वस्तू ‘आर के बाजार’ देत आहे. याच आर के बाजार ने सामाजिक सलोखा दर्शवित रक्तदान शिबिराचे आयोजन डोंबिवली येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात केले होते.

आर के बाजार ने गुरुवार १६ डिसेंबर रोजी डोंबिवली येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आर के बाजार, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील यांच्या संयुक्त विध्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आर के बाजार चे कर्मचारी, आर के बाजार चे ग्राहक तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले. संपूर्ण दिवसभरात जवळपास शेकडो लोकांनी रक्तदान केले. व्यवसाया पेक्षा ग्राहकांचा माणुसकीच्या नात्यातून विचार करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे आर के बाजारचे संचालक मनोज रामकृष्ण डुंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कल्याण डोंबिवलीतील उच्च वर्गीय तसेच मध्यम वर्गीय लोकांना मागील १६ वर्षांपासून आर के बझार ने आपली सेवा अविरतपणे दिलेली आहे. यासाठी त्यांच्या १६ शाखा कार्यरत आहेत. दिवाळी चा सण असो अथवा गुढीपाडव्याचा क्षण. प्रत्येक सण घराघरात साजरा व्हवा या मानसिकतेतुन अत्यंत माफक दरात आपल्या वस्तू जसे की धान्य, तेल, मसाले, खाद्यपदार्थ, शीतपेये, सौंदर्य प्रसाधने अशा विविध गृहोपयोगी वस्तू आर के बाजार कडून विक्रीस उतरतात.

अगदी महागाई असली तरी सर्व दुकानांपेक्षा स्वस्त आणि उत्तम दर्जा असलेल्या वस्तू मिळण्याचे आर के बाजार हे एकमेव ठिकाण मानले जाते. आणि म्हणूनच गेल्या १६ वर्षांपासून लोकांची पसंती आर के बाजारला असून कल्याण डोंबिवलीत इतर शॉपिंग मार्ट पेक्षा सर्वाधिक पसंती आर के बाजारला मिळते. असे आर के बाजारचे रिजनल हेड विशाल बोडके यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

पहा व्हिडीओ : ‘आर के बाजार’ चं रक्तदान शिबिर
गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत

कल्याण : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होता असताना आजपासून केडीएमसी क्षेत्रातील १ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना शाळेत कोरोनासंबंधित शासकीय नियमावलीनुसार प्रवेशउत्सव साजरे होत असताना कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा १ डिसेंबर रोजी सुरू होणार होती. परंतु पुन्हा ओमिक्रोन यामुळे शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असे घोषित करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १६ डिसेंबर म्हणजेच आज सुरू करण्यात येतील असे केडीएमसी प्रशासनाने जाहीर केले होते.  त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करून सर्व शाळा सुरू होत आहेत. कल्याण पूर्वेकडील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर या  शाळेतील मुलांना शिक्षकांनी औक्षण करून त्यांचे तोंड गोड केले. प्रत्येक विद्यार्थ्यास भेटवस्तूही देण्यात आली.

 मुलांच्या प्रवेश उत्सवासाठी सगळी शाळा स्वच्छ आणि सॅनिटाइझ  करून शिवाय फुले, फुगे,व रांगोळी यांनी शाळा सजवून गाण्याच्या सुरात ढोल-ताशांच्या गजरात  अतिशय भारावलेल्या व आनंदी वातावरणात पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना  प्रवेशाचा  सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांनी दिली. तसेच यासाठी नागरिक सेवा मंडळाचे पदाधिकारी, तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

एकाच वर्षात कल्याण डोंबिवली मनपाला मिळाला दुसरा पुरस्कार

कल्याण :- महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे क.डो.मनपाने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड नंतर या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.

मेडा या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, बिल्डींग सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावर्षीच्या सोळाव्या उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महापालिकेच्या विदयुत विभागाने, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फॉरमॅटमध्ये उर्जा संवर्धन व वीज बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, जल/मल नि:सारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती सप्टेंबरमध्ये पाठविली होती.

या सादरीकरणाच्या आधारे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाच्या निवड समितीने विदयुत विभागास प्रकल्प सादरीकरणासाठी वेळ दिली होती, त्यानुसार महापालिकेच्या विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व त्यांच्या सहका-यांनी निवड समितीसमोर केलेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे मंगळवारी दोन क्षेत्रांमध्ये मनपास पुरस्कार जाहिर करण्यात आले, यामध्ये म्युन्सिपल सेक्टरमध्ये सर्टिफिकेट ऑफ मेरीट हा प्रथम पुरस्काराचा बहुमान महापालिकेस जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल सेक्टरमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी दुस-या क्रमांकाचा पुरस्कार महापालिकेस जाहिर करण्यात आला.

मनपा परिसरात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, महापालिकेने नविन इमारतींना सौर उर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे, त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १९१० इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वर्षाला जवळ जवळ १२ कोटी युनिट विजेची बचत होत आहे, पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातही उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली.

भविष्यात महापालिकेमार्फत इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्याचप्रमाणे आयरे, कचोरे, बारावे, उंबर्डे या परिसरात घनकच-यापासून जैविक इंधन तयार करण्याचे ५ प्रकल्प उभारण्यात आले. या सर्व माहितीच्या सादरीकरणाअंती राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेस हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

-कुणाल म्हात्रे

अनधिकृत बांधकामांवर पालिकेची टांगती तलवार; डोंबिवलीत पाच मजली इमारतीवर कारवाई

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने शहर आणि ग्रामीण विभागातील बेकायदेशीर असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा सुरूच ठेवला असून, बिनधास्तपणे धडक कारवाया केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरातून अनेक अनधिकृत इमारतींवर अशी धडक कारवाई सतत होत असल्याने स्थानिक भुमाफिया हद्दपार होवू लागले आहेत. विकासक आणि जमीन मालकांचा बेकायदेशीर बाजार मनपाने उठवून लावला आहे. अशा कारवाया सुरू राहिल्यास बांधकामांच्या परवानग्या घेऊन पालिकेच्या महसुलीत वाढ होईल तसेच ठेकेदार आणि भूमाफियाना जरब बसेल यात दुमत नाही.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भूमाफियांचा बेकायदेशीर इमारतीचा धंदा बंद केल्याने भूमाफियांनी हळूहळू पळ काढला आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार १०/ई प्रभागातील सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आपले कर्तव्य निभावून आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत बेधडक कारवाई करत डोंबिवली पूर्व, सोनारपाडा येथील विकासक रुपेश म्हात्रे व विजय जाधव यांच्या चालू असलेल्या तळ+५ मजल्याच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई मंगळवार १४ डिसेंबर रोजी केली आहे.

सदर बांधकामधारकास यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी आणि मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व ४ गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

-रोशन उबाळे