गोकुळधाम सोसायटीच्या रहिवाश्याला बिल्डरकडून मारहाण; पाणी कनेक्शन कापल्याचा विचारला होता जाब

पाणी कनेक्शन का कापले अशी विचारणा करणा-या रहिवाशी मनोज प्रजापती (वय 33) यांना बिल्डर रामप्रताप सिंग आणि विकास रामप्रताप सिंग या पिता-पुत्राने रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पिसवली येथील अमरदीप कॉलनीतील गोकुळधाम सोसायटीत सोमवारी घडली. मनोज यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात सिंग पिता-पूत्र विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज हे गोकुळधाम सोसायटीत गेल्या पाच वर्षापासून पत्नी आणि मुलासह राहतात. सोमवारी ते संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आले. त्यावेळी घरी पाणी नसल्याचे समजले असता ते सोसायटीच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी असलेले बिल्डर रामप्रताप सिंग यांना माझ्या घरात पाणी नाही तुम्ही माझे पाणी कनेक्शन का तोडले अशी मनोज यांनी विचारणा केली. यावर रामप्रताप यांनी आधी मेंटेनन्स भर तेव्हा पाणी चालू करतो असे सांगितले.

मी ५ हजार रूपये सोसायटीसाठी दिलेले आहेत तुम्ही आधी माझे पाणी कनेक्शन चालू करा असे मनोज बोलले असता रामप्रताप यांनी त्याला शिवीगाळी करीत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मनोज यांनी प्रतिकार करताच रामप्रताप यांनी त्यांचा मुलगा विकासला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. त्याठिकाणी आलेल्या विकासने लोखंडी रॉडने डोक्याला, हाताला व पायावर प्रहार केला. यात मनोज यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न; आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार -मेहबूब शेख

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या आणि पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी घोडदौड सुरू आहे. त्या घोडदौडींकडे पाहता आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागांचा नारा देत महापौर राष्ट्रवादीचाच बसेल यात संदेह नसावा असा आत्मविश्वास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. आता जनता युतीच्या करनाम्यांना कंटाळली असून केवळ राष्ट्रवादी हा पर्याय समोर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पक्षामध्ये युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होत असून आजच्या मेळाव्याला आलेली उपस्थिती हे त्याचं प्रतिक आहे. असाच उत्साह कार्यकर्त्यांनी मनामध्ये बाळगून एकमेकांशी सहकार्याची भावना घेऊन पुढे जावं असे आवाहन त्यांनी केले.

यानिमित्ताने महिलांना देखील उमेदवारी मध्ये संधी देऊन मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाचा विचार यावेळी पुढे आला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच पक्षाला तीन आकडी बळ देण्यास आम्ही सज्ज आहोत असा नारा देखील दिला. तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. नागरिकांमध्ये वावरताना त्यांच्या अडचणी व समस्या सोडवताना प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले. शहरांमधील नागरी समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर द्यावा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

ग्रामीण भागातील पाणी समस्या तसेच शहरी भागातील खड्डे, कचरा, प्रदूषण, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, शाळांच्या फी वाढीबद्दलच्या समस्या या सर्वांवर प्रकाशझोत टाकल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून एक सक्षम कार्य देखील होऊ शकत. आपली नाळ नागरिकांशी असून त्यानिमित्ताने सगळ्यांनी निवडणूकीच्या धागा पकडून पुढे जायला हवं हे सूत्र लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन करून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने लोकसभा, विधानसभेला जशी बुथ रचना चांगली केली होती. तशीच पुन्हा मोट बांधण्याचे कार्य ज्येष्ठांनी करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षम करावा असा विचार पुढे आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने १००+ जागा तसेच आघाडी असली तरी पक्षाचा महापौर बसेल असा दावा या बैठकीत उपस्थित केला. क.डों.म.पा. निवडणुकीत सध्या १२२ प्रभाग असून याच जागांसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे नुकसान झाले होते. काँग्रेस बरोबर आघाडी असूनही राष्ट्रवादीला फक्त दोन जागी विजय मिळाला होता. तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. सर्वाधिक ५२ जागांसह शिवसेनेने पुन्हा आपला महापौर बसविला होता. मात्र आता येथील सर्वात मोठा पक्ष शिवसेने सोबत राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादी कोंग्रेसला कल्याण डोंबिवलीत त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राज्यातील सध्याची कारकीर्द ही समाधानकारक व स्थिर असल्याचे दिसत आहे.

-कुणाल म्हात्रे

वडवली अटाळी रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती; विकासकामात बाधित झाडांची कत्तल

महत्वाकांक्षी वडवली अटाळी रिंगरोड प्रकल्पातील ६०० मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. या विकासकामासाठी बाधित होणाऱ्या झाडांची दुर्दैवाने कत्तल करावी लागली असून त्यापूर्वी १५ हजार झाडांचे वृक्षारोपण केल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वडवली अटाळी महत्वकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडवली नदी पासून अटाळी पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित राहीले होते. बुधवारी ११ ऑगस्ट रोजी नदीच्या पुलापासून ते अटाळी हद्दीपर्यंत ६०० मीटर रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणारी झाडे वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीनुसार महापालिकेच्या विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, एमएमआरडीएचे अधिकारी, ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत तोडण्याचे काम हाती घेण्यात येऊन लगेचच रस्त्यालगतच्या गटारीचे कामकाजास प्रारंभ करण्यात आला.

रिंगरुट प्रकल्पात बाधीत झालेली झाडे तोडण्यापूर्वी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने आंबिवली टेकडी येथे सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आलेली आहेत आणि आज तिथे घनदाट जंगल उभे रहात आहे. रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणा-या झाडांपैकी ताडांच्या झाडासाठी प्रती झाड रुपये १० हजार मोबदला महासभेच्या ठरावानुसार यापूर्वी तोडण्यात आलेल्या ताडांच्या बदल्यात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. यापुढे ही तोडलेल्या झाडांपैकी ताडांच्या झाडांसाठी प्रती झाड रु.१० हजार मोबदला संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या दिला जाईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

शहरातील वाहतूकिवरील ताण कमी व्हावा यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. मात्र वृक्षतोड करून केलेला विकास पर्यावरण प्रेमींच्या पथ्यावर पडत नसून. झाडांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण पर्यावरणाशी छेडछाड केल्याने काय होते ? हे प्रकृतीने मानवाला या अगोदर अनेकदा दाखवून दिले आहे. त्यातीलच कोकणातील तळीये दुर्घटना हे एक ताजे उदाहरण म्हणता येईल.

-संतोष दिवाडकर

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातील बॅरेकमध्ये आढळला मोबाईल; पोलीस डि.सी.आर मधून माहिती उघडकीस

कल्याण येथील आधारवाडी कारागृह नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे कारागृह एका वेगळ्या प्रकारामुळे चर्चेत आले आहे. कारण येथील स्वच्छतागृहातून पोलिसांनी एका मोबाईल फोनसह विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे पोलीस डि.सी.आर. (दैनंदिन गुन्ह्यांची नोंद वही) मध्ये गुन्ह्याची नोंद असल्याने ही गंभीर बाब उजेडात आली आहे.

आधारवाडी कारागृहातील कर्मचा-यांनी शुक्रवारी अचानक तुरुंगांची पाहणी केली. यावेळी एका बॅरेकमध्ये पाहणी करण्यासाठी हे कर्मचारी गेले. पाहणी करताना या बॅरेकमधील शौचालयात त्यांना दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं नजरेस पडले. लोणच्यासाठी वापरले जाणारे हे जार त्यांनी तपासणीसाठी उघडले असता त्यांना त्यात चक्क एक मोबाईल फोन आढळून आला. या बरोबरच एक इलेक्ट्रिक वायर, २५ ते ३० स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे त्यात ठेवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे इतके सामान व मोबाईल फोन तुरुंगातील बॅरेकमध्ये कसे पोहोचले ? याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. यानंतर संबंधीत कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या वस्तू कारागृहाच्या आत कशा पोहचल्या ? व त्या कशासाठी जमा करण्यात आल्या होत्या ? हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यासंदर्भात खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे मान्य केले. परंतु याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही तुम्ही कंट्रोल रूममधून माहिती घ्या असे उत्तर दिले. तर वरिष्ठ अधिका-यांनीही आम्ही माहिती देऊ शकत नाही तुम्ही कारागृहाच्या अधिका-यांकडून माहिती घ्या असे सांगितले. तर जेल अधीक्षक ए. एस सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही इतक्या गंभीर विषयावर पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ का केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा काहीवेळेस गंभीर गुन्ह्यांबाबत वाच्यता करण्यास टाळाटाळ करताना दिसतात. मात्र ठाणे पोलीस डी सी आर मध्ये रजिस्टर गुन्ह्यांची रोज नोंद केली जाते आणि याच माहितीच्या आधारे आधारवाडी कारागृहातील प्रकार उघडीस आला आहे आणि प्रसिद्धी माध्यमात याचे वृत्त आले आहे. पाच वर्षांपूर्वीही याच कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार समोर आला होता.

-रोशन उबाळे

वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी केंद्राकडे १२०८.४७ कोटी रुपयांच्या निधीची खासदारांनी केली मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी आणि उल्हास या दोन नद्या पाच शहरांमधून जात असून सुमारे ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत आहेत. तसेच या नद्यांच्या पाण्याचा वापर पिकांसाठीही केला जातो. मात्र या नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘नमामि गंगे’ च्या धर्तीवर या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराजांकडून उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी तर वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी ९९७.१३ कोटीच्या एकूण १२०८.४७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय जल-शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील २१ नद्यांचे ‘मिशन फॉर क्लीन रिवर्स इन महाराष्ट्र’ या मोहिमे अंतर्गत पुर्नजिवितकरण करण्याचे जाहीर केले असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९९७.१३ कोटी आणि उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडे सदर निधी मंजुरीकरिता महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवला आहे. तरी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी जलशक्ति मंत्रलयाने लवकरात लवकर मंजूर करावा. त्याचबरोबर भविष्यात या नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या त्रयस्थ संस्थेकडे सदर कामाच्या लेखापरिक्षणाचे काम देण्यात यावे. जेणेकरुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या संस्थांना अहवाल सादर करतील. याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान जलशक्ती मंत्रालय दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून जल-शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

कल्याण-उल्हासनगर परीसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत आजूबाजूच्या वस्तीमधून सांडपाणी सोडले जाते. अनेक टाकाऊ वस्तू व नदी परिसरातील काही कंपन्यांकडून रसायन मिश्रित पाणी नदीत राजरोसपणे सोडले जाते. यामुळे या दोन्ही नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्या असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीतील पाणी तसेच नदीखालील भूस्तर प्रदुषित होत असून या प्रदुषित पाण्यामुळे नदीचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुद्धा दूषित होण्याचा मोठा धोका संभवत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. या दोन्ही नद्यांचे पुर्नजिवितकरण हा खूप खार्चिक भाग असून तो खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडणारा नाही. आणि म्हणूनच केंद्राकडे यासाठी मागणी करण्यात आलेली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये टवाळखोरांचा उच्छाद; एकीकडे मारहाण तर दुसरीकडे गाडीचे नुकसान

कल्याण पोलीस परिमंडळ -३ मधील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणाने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही घटनांमध्ये टवाळखोरांनी आपली दहशत दाखविली असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटना सोमवारी ९ ऑगस्ट रोजी घडल्या आहेत.

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार ओव्हटेक केल्याच्या कारणावरून अज्ञात कार चालकाने ओव्हरटेक का केली या कारणाने कार ची समोरची काच फोडली तर त्याच गाडीमागे असणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना मारहाण करीत मोबाईल आणि पैश्याचे पॉकेट हिसकावून नेले. तर दुसरीकडे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरामध्ये  महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तिघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी  चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जन गंभीर जखमी झाले.

एकाच दिवशी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे कायद्याचे भय कल्याण मध्ये राहिले की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आनंद दिघे पूलाखाली कोळसेवाडी पोलिसांची हद्द संपते म्हणूंन  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पीडित याना पाठवण्यात आले. एकाच दिवसात पाठोपाठ तीन घटना घडल्याने कोरोना काळात आधीच पिचलेल्या नागरिकांत या प्रकारामुळे दाहशतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक गस्त वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-रोशन उबाळे

उबेर चालकाची हत्या करून कार केली लंपास; महात्मा फुले पोलिसांकडून दोघांना अटक

ओला उबेर सारख्या खाजगी वाहनाने प्रवास सुरक्षित असल्याचा लोकांचा एक समज आहे. मात्र अशा प्रवासी वाहनावरील चालक देखील सुरक्षित नसल्याचे आता एका घटनेतून समोर आले आहे. काही वेळेस प्रवाश्याची हत्या होते तर कधी वाहन चालकाची हत्या होते. त्यामुळे सुकर प्रवास करावा कसा ? असा पेच निर्माण झाला आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

कल्याण ते धुळे या प्रवासासाठी आरोपींनी उबेर कंपनीची गाडी बुक केली. या गाडीच्या प्रवासा दरम्यानच त्या आरोपी प्रवाशांनी चालकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. नंतर त्याची कार चोरून तिथून पोबारा केला. मात्र या हत्येतील दोन आरोपीना महात्मा फुले पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करीत ताब्यात घेतले आहे. राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. अमृत गावडे असे या दुर्दैवी उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उबेर चालकाच्या हत्येच्या या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेने खासगी प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे का म्हणतात ? हे देखील तितकेच अधोरेखित झाले आहे.

-रोशन उबाळे

क.डों.म.पा.क्षेत्रात आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचे लसीकरण; मोबाईल लसीकरणाला प्रतिसाद

छायाचित्र :- संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण मोहीम कधी वेगात सुरू असते तर काही वेळेस रखडत राहते. अशाही परिस्थितीत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण ५ लाख ७८ हजार हुन अधिक नागरिकांचे लसीकरण पार पडल्याची माहिती पालिका प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. पालिका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेता सर्वांचे लसीकरण होई पर्यंत आणखी किती कालावधी लागतोय हे देखील आता पहावे लागणार आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर तसेच १८ वर्ष वयावरील नागरिकांचे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत ३ लाख ९८ हजार इतके लसीकरण झाले आहे. महापालिकेने गत महिन्यात सुरु केलेल्या ‘निअर टू होम’ म्हणजेच मोबाईल व्हॅनद्वारे झोपड्पट्टी व चाळ परिसरात केल्या जाणा-या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ३८ हजार ४८२ इतके लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये एकुण १ लाख ४१ हजार ४९० इतके लसीकरण झाले आहे.

शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या लस साठयानुसार नियोजन करुन महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने गेले ६ महिने लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असल्यामुळे आत्तापर्यंत ५ लाख ७८ हजार हुन अधिक लोकांचे लसीकरण करण्यात पालिका प्रशासनाला आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील लोकांची संख्या १३ लाखांच्या जवळपास होती. मात्र आता दहा वर्षे उलटल्याने ही लोकसंख्या २० लाखांपर्यंत देखील आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजून जवळपास ७०% नागरिकांचे लसीकरण पालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.

-कुणाल म्हात्रे

ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशसमोर स्वतःच नाक स्वतःच कापलं; ‘या’ इगो मुळे धक्कादायकपणे गमावली मालिका

बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन देशांत नुकतीच पाच सामन्यांची टी-20 मालीका संपन्न झाली. या मालिकेत बांग्लादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत करत ट्रॉफी उचलून सेलिब्रेशन केले. तर याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मात्र छोट्या संघासोबत झालेला मोठा पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र या पराभवाला त्यांचा ‘इगो’ कारणीभूत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेतील पहिले तिन्ही सामने बांग्लादेशने जिंकून मालिका ताब्यात घेतली. चौथ्या सामन्यात कसाबसा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने फक्त 122 धावांवर बांग्लादेशला रोखले. 123 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मात्र नांगीच टाकली. एकामागोमाग एक असे सारे फलंदाज तंबूत परतले आणि संपूर्ण बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा संघ बांग्लादेशच्या निम्म्या मात्र ६२ धावांवर गारद झाला.

बांग्लादेश सारख्या दुबळ्या संघाबरोबर झालेला इतका मोठा पराभव ऑस्ट्रेलिया विसरणार नाहीच. तर मिळालेला विजय बांग्लादेश साठी प्रेरणादायी ठरणार आहे. मात्र या पराभवा मागे ऑस्ट्रेलियाचा इगो नडला असे नेटकरी म्हणत आहेत. बांग्लादेश संघाला हलक्यात घेण्याची चूक ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅनेजमेंट आणि निवड समितीने केली. यात त्यांनी वॉर्नर,स्मिथ,मॅक्सवेल आणि इतर दिगग्ज खेळाडूंना विश्रांती देत कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना दौऱ्यावर पाठवले. याचमुळे ऑस्ट्रेलियाला पराभव पहावा लागला असे नेटकरी म्हणत आहेत.

ऑस्ट्रेलिया संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), जोश फिलिप, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, एश्टन टर्नर, एश्टन अगार, वेस अगार, एलेक्स केरी, अँड्र्यू टाय, एडम झांपा, जोश हेजलवूड, मोईसेस हेन्रिक्स, बेन मॅकडरमॉट, डॅन ख्रिश्चन, रिले मेरीडिथ, जेसन बेहरनडोर्फ, नेथेन ईलिस, तनविर संघा.

भारताचा संघ देखील नवख्या खेळाडूंना घेऊन श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. सुरुवातीला 2-1 ने वनडे मालिका जिंकली मात्र नंतर भारताने सुद्धा 2-1 ने टी-20 मालिका गमावली. पुढील काळात आयपीएल संपल्यावर टी-20 वर्ल्डकप रंगणार आहे. यादरम्यान अनेक लहानसहान संघ यात समाविष्ट असणार आहेत. अशात कोणत्याही संघाला कोणी हलक्यात घेऊ नये हे आता स्पष्ट झाले आहे. कारण छोट्या संघाला हलके घेण्याच्या नादात वर्ल्डकप मध्ये आयर्लंडचा संघ बलाढ्य इंग्लंडवर भारी पडताना दिसला आहे.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा. देणार नागरिकांना रेल्वेपास; तिकीटघरा शेजारी महापालिकेचा कक्ष

कोविड-19 च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिका आयुक्त, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, एसआरपीएफ, सीआरपीएफ, रेल्वे अधिकारी यांच्या समवेत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास देण्याबाबत रेल्वे व्यतिरिक्त इतर विभागांनी करायच्या कामांबाबत नियोजन करण्यात आले.

कोविड लसीकरणाचे 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्‍यासाठी व रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटरजवळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 व दुपारी 3.00 ते रात्री 11.00 या दोन शिफ्टमध्ये महापालिका कर्मचा-यांचे प्रत्येक रेल्वे टिकीट काऊंटर शेजारी स्वतंत्र मदत कक्ष(हेल्प डेस्क) उभारले जाणार आहे.

कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत(प्राधान्याने आधारकार्ड) घेवून आलेल्या नागरिकांची सर्व प्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये सदर कागदपत्रांची पडताळणी होऊन मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी  केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र व ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.

महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या टिटवाळा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, आंबिवली व शहाड या रेल्वे स्थानकामधील रेल्वे टिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची व फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या आगमन आणि बहिर्गमन मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे टिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य राहील. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सदर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील, अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.

-कुणाल म्हात्रे