कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात रस्सीखेच सुरु झाली असताना कल्याणमध्ये भाजपने खळबळजनक दावा केला आहे. कल्याण मध्ये भाजपाने पाच जागांवर दावा केला असून आमचे तुल्यबळ जास्त असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. यामुळे युतीत असलेल्या भाजपाने हेतुपरस्सर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथे भाजपाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ या पाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून इथे भाजपचे उमेदवार द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी आहे की अंथरून पसरून पाय पसरणे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा मजबूत असल्याचा दावा केला आहे. या पाच पैकी डोंबिवली, कल्याण पूर्व या दोन मतदारसंघात भाजप, कल्याण पश्चिम, अंबरनाथमध्ये शिवसेना तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचा उमेदवार असून या पाचही मतदारसंघात सूर्यवंशी यांनी भाजपचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात येत असून अनेक ठिकाणी शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी असे दावे करणे म्हणजे अंथरून सोडून पाय पसरणेच आहे अशा चर्चा देखील केल्या जात आहेत.
BJP claims five seats in Kalyan