Kalyan Suicide : कल्याण पूर्वेत आणखी एक आत्महत्या

Kalyan Suicide : कल्याण पूर्वेतील गणेशवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पवन धनराज आगडे (२८) असं या तरुणाचे नाव असून गळफास घेऊन त्याने स्वतःचे जीवन संपवले आहे.

मागील काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत अनेक गुन्हे घडत असून आत्महत्याच्या घटनाही समोर येत आहेत. सहाय्यक लोको पायलट आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता आणखीन एका तरुणाने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कोणी नसल्याचे पाहून सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करीत त्याच्या मूळगावी पाठवून देण्यात आला.

सदर तरुण आपल्या आई वडिलांसह राहत होता. मागील काही काळापासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. व याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Suicide: Another suicide in Kalyan East

Kalyan Murder : कल्याण पूर्वेत आणखी एक हत्या; टोळक्याच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Kalyan Murder : कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी शहरवासीयांसाठी चिंतेची बाब बनली असताना आता आणखीन एका हत्येची बातमी समोर येत आहे. खडेगोळवली येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर मुलाला काही जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर लोखंडे असं मृत मुलाचे नाव असून तो काल सायंकाळी कैलाशनगर परिसरात गेला होता. तेथे जुन्या वादातून एका टोळक्याने त्याला घेराव घालून अमानुषपणे मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच टोळक्याने तेथून पोबारा केला. त्या टोळक्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले तसेच जखमी समीरला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र आज पहाटेच्या दरम्यान समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. सध्या काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुकेश आणि नीरज दास अशी त्यापैकी दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्व भागात सध्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. तिसगावातील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण ताजे असताना आणखी एका मुलाच्या हत्येने आता पूर्व भागात खळबळ माजली आहे. स्थानिक आमदार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी नुकतेच आणखी एक पोलीस स्थानक तसेच पोलीस कुमक वाढवण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या, क्षेत्रफळ, फोफावलेली गुन्हेगारी आणि एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावरील ताण लक्षात घेता आता गृहखात्याने गांभीर्याने विचार करून आणखी एक पोलीस स्थानक निर्माण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

शहरातील तरुणाईला गांचाचा नाद ?

अलिकडल्या काळातील तरुणाई ही गांजाच्या अधीन गेली असून शहरात ठिकठिकाणी गल्ली बोळात घोळका करून गांजा सेवन केले जाते. खडेगोळवली भागातील असंख्य अल्पवयीन मुलं या नशेच्या आहारी गेली असल्याचे स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या अगोदर मानापाडा पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला होता. मात्र तरी देखील शहरात तरुणांना गांजा कुठून मिळतो? गांजा विक्रेते कोण आहेत? हा गांजा कुठून सप्लाय होतो? याचा शोध घेऊन तरुणाईला वाचवणे ही देखील येणाऱ्या काळाची गरज बनली आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Murder : A minor boy died in a gang attack in Kalyan East

Maval News : कामशेत मध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला कल्याण पोलिसांनी केली अटक

Maval News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व शहरातील चक्कीनाका परिसरात एका सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाऊन कामशेत येथून या नवरा बायकोला अटक केली आहे.

सायकल खरेदी करताना दुसऱ्या व्यक्तीच्या नावे फेक चेक देऊन, आपण डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असल्याचं महिलेने सांगून, माझ्या गाडीत माझी पर्स राहिली आहे त्यामुळे आता मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा मला दहा हजार रुपये द्या नंतर मी संध्याकाळी तुम्हाला ते परत करते असे तिने सांगितले. व त्या नंतर पुन्हा अडीच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. यानंतर दोघेही नवरा बायको पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायकल मार्टच्या मालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्या आचरे दांपत्याचा कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने तपास करून त्यांना आता कामशेत येथून अटक केली आहे. कामशेत मध्ये राहून ठाणे जिल्हयातील लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा धंदा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कल्याण एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत असल्याचे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले आहे.

संतोष दिवाडकर

Maval News : Kalyan police arrested a couple who cheated the people of Thane by living in Kamshet

आयडीएट प्रोटो प्रकार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन Arya Gurukul अंबरनाथने पटकावले

Arya Gurukul : अंबरनाथ Arya Gurukul स्कूल आयोजित मंथन फेस्टिवल सफल झाला. दोन दिवसीय लेख, क्राफ्ट आणि सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक मॉडेल बनवून आपली प्रतिभा दाखवली. एग्जीबिशनमध्ये सर्वोत्तम प्रकल्प तयार करणारे विद्यार्थ्‍यांना स्‍कूल मॅनमेंट तर्फे बक्षीस देऊन सन्मानित केले गेले.

कार्यक्रमात कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी अजित दुबे, डॉ. सुजीत नायर, अजुकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.नीलम मलिक आणि सचिव भरत मलिक यांनी विद्यार्थी ट्रॉफीकर उत्साही मनोबल वाढवला. एजुकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित अंबरनाथ आर्य गुरुकुल स्कूल मध्ये 12 आणि 13 ऑगस्ट ला मंथन फेस्टिवल संपन्न झाला. चार स्कूल्स ने यात भाग घेतला होता.

प्रदर्शन थीम या वर्षी होणारी जी-२० शिखर परिषदेवर आधारित होती. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी मॉडेल च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यात रोलिंग ट्रॉफी कल्याण पूर्वच्या सेंट मेरिज हाई स्कूल आणि लिटल आर्यन्स ने जिंकली तर प्रोटो प्रकार श्रेणीमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन आर्य गुरुकुल स्कूल अंबरनाथ ने पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मंथन फेस्टिवल पाहिल्यानंतर भरत मलिक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पवार यांनी सांगितले की मी कार्यक्रमाचा पाहुणा नसून आर्य गुरुकुल परिवाराचा एक सदस्य म्हणून येथे आलो आहे . पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येक पालकाला आपलं मुल यांनी आर्य गुरुकुल मध्ये शिक्षा घ्यावी असं वाटत आहे.

या मंथन फेस्टिवल कार्यक्रमात अमरनाथ आर्य गुरुकुल चे प्रिंसिपल नीलेश राठौड़, गीता नायर, आर्य गुरुकुल कल्याणच्या प्रिंसिपल राधामनी अय्यर, सेंट मेरिज स्कूल कल्याणच्या प्रिंसिपल दिव्या बोरसे सहित तमाम टीचर्सचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul Ambernath won the Best Exhibit in the IDET Prototype category

Watch Exhibition Video
क.डों.म.पा. क्षेत्रातील पदपथांवर सर्रास अतिक्रमणे; पत्रकार धमकी प्रकरणी तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.

विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.

संतोष दिवाडकर

Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association

तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया

नांदीवली Aarya Gurukul School मध्ये गायत्री हवन

Aarya Gurukul School : दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी, नांदिवली येथील सर्वोत्कृष्ट CBSE शाळा असलेल्या आर्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅम्पसमध्ये गायत्री हवन केले. विद्यार्थी, शिक्षक आणि आर्य गुरुकुलच्या व्यवस्थापन संघाने एकत्रितपणे हवन केले.

गायत्री हवनाचे महत्त्व असे आहे की गायत्री, सावित्री आणि सरस्वती या तीन देवतांचे प्रतीक असलेल्या देवी गायत्रीचे स्मरण केले जाते. गायत्री ही इंद्रियाची स्वामी आहे, सावित्री ही थ्रुथ आणि सरस्वती ही वाणीची देवी आहे.

गायत्री मंत्र हा आपल्या सर्व इंद्रियांना पोषण आणि बळकट करणारा सर्वसमावेशक मंत्र आहे. आपली बुद्धी तीक्ष्ण करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. गायत्री हवनाच्या वेळी होम (अग्नी) समोर गायत्री मंत्राचा जप केला जातो. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला गायत्री हवन हा एक सुंदर क्षण पाहण्याजोगा होता. विद्यार्थ्यांनी मंत्राचा उच्चार करून शाळेचे वातावरण बदलून टाकले.

शाळा व्यवस्थापनाचे समर्पण दिसून आले आणि त्यांनी मनापासून हवन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. गायत्री हवन आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंकडे आपली उर्जा प्रवाहित करते – बुद्धिमत्ता, सौंदर्य, वाणी, आरोग्य जे आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्ण कल्याणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रतिबिंबित करते.

आर्य गुरुकुल ही चिन्मय मिशन शाळा आहे आणि आपल्या परंपरेचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात सतत विचारपूर्वक कार्यक्रम आणि उत्सवांद्वारे प्रबळ करते.

संतोष दिवाडकर

Gayatri Havan at Nandivali Aarya Gurukul School

Kalyan Crime News : संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाने पोलिसांसमोरच दाखवला माध्यमांना माज

Kalyan Crime News : कल्याण पूर्वेत बुधवारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्नात कोळसेवाडी पोलिसांनी एका नराधमाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले होते. याचवेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी या प्रसंगाचे चित्रीकरण सुरू केले. मात्र संतापजनक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीने चक्क पोलीसांच्या समोरच माध्यमांच्या केमेऱ्याकडे दोन बोटे दाखवून विक्टरी म्हणजेच विजयाची खून केली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणी वरून आपल्या घरी जात असताना विशाल गवळी नामक इसमाने तिचा पाठलाग करून तिला भर रस्त्यात अडवले. यानंतर तिला रस्त्याकडेला नेले व तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. भयभीत झालेल्या मुलीने त्याचा प्रतिकार केला आणि ती निसटून घरी आली. यानंतर तिच्या घरच्यांनी थेट कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तासाभरातच नराधम आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्थानकात हजर केले.

अटकेत असलेल्या आरोपीचे चित्रीकरण करणाऱ्या प्रतिनिधींना या नराधमाने चक्क पोलिसांच्या समोरच दोन बोट दाखवून संतापजनक कृत्य केले. त्याने असे कृत्य करताच पोलिसांनी त्याचा हात झटकरला. यामुळे याला कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. केलेल्या दुष्कृत्याचा जराही पश्चाताप या नराधमाला झाला नसून आता तो पोलिसांच्या तावडीत आहे.

आरोपी विशाल गवळीवर या अगोदरही बलात्कार तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून त्याच्यावर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली होती. आता त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्याला पोलीसी खाक्या दाखवावा असे लोकांमार्फत बोलले जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Crime News : Attempt to rape a minor girl in Kalyan East

ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party