कल्याण जवळील NRC कंपनीतील बेरोजगारांचा प्रश्न; रामदास आठवले करणार अदानी समूहाशी चर्चा

कल्याण नजीकच्या  एनआरसी कंपनीतील बेरोजगार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर कामगारांच्या शिष्टमंडळाने काही लोकप्रतिनिधींसह भेट घेऊन कामगारांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली.

या शिष्ठमंडळात कामगार प्रतिनिधी, युनियन पदाधिकारी, भूमी पुत्र कामगार संघर्ष समिती, महिला प्रतिनिधी तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी,  ठाणे जिल्हा निबंधक  सहकारी संस्था,  कामगार आयुक्त ठाणे, पीएफ़चे  अधिकारी  व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कामगारोच्या वतीने जे. सी. कटारिया, उदय चौधरी, अविनाश नाईक, सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस,  दासू ठोबरे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत माहिती दिली. यावेळी रामदास आठवले यांनी या कामगारांचे प्रश्न  सोडविण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत  अदानी उद्योग समूह  यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन न्याय मिळण्याकामी सर्वं प्रकारचे आश्वासन दिले.

या बैठकीस माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, रामदास वळसे, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, एस बी शुक्ला,  संजय वाघमारे,  फरीदा  पठाण , राजेश त्रिपाठी,  मछिंद्र दवचे यांच्यासह अन्य कामगारही उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

२७ सामाजिक कार्यक्रम राबवीत माजी आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कल्याण शहर मंडळ व मोहने टिटवाळा मंडळातील २७ ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर,  कोरोना योद्धे सन्मान, मोफत वह्या वाटप,  अन्नधान्य वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळ वाटप, स्वच्छता अभियान, ब्लॅंकेट वाटप, स्मशानभूमी स्वच्छता यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात वृक्षारोपण व जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा प्रभाग ४ मध्ये श्याम मिरकुटे यांनी कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम, प्रभाग २ मध्ये हॉटेल मानसी येथे संजय कारभारी यांनी कोरोना योध्यांचा सन्मान, प्रभाग २७ मध्ये सचिन खेमा यांनी रुग्णांना फळ वाटप केले. प्रभाग ३२ सिद्धेश्वर आळी तर्फे राहुल भोईर यांनी भव्य रक्तदान शिबिर, प्रभाग २३ मधील फ्लॉवर वॅली येथे नीता देसले यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १८ मध्ये डॉ राजू राम यांच्यातर्फे कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १६ योगिधान मध्ये कल्पना पिल्ले यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग १४ मध्ये प्रमोद घरत व रमेश कोनकर यांनी पाटील बालमंदिर शाळेत वाचनालयात पुस्तके भेट व कोरोना योद्धे सन्मान करण्यात आला.

प्रभाग १४ मोहने येथे श्रीकांत पाटील व विमला ताई भोसले यांनी वृक्षारोपण, अन्न धान्य वाटप, प्रभाग १३ मध्ये विवेक जाधव यांनी कोरोना योध्याना सन्मान, प्रभाग १२ मध्ये अनंता पाटील यांनी आदिवासींना अन्नधान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ११ मध्ये विनायक भगत, हेमा गायकवाड, मुन्ना रईस व संदीप गायकवाड यांनी सफाई कामगार व डॉक्टरांचा सन्मान, मोहिली महिला मंडळातर्फे अरुणा शिंगोळे यांनी कार्यक्रम आयोजित केला. प्रभाग ९ मांडा पूर्व येथे उपेक्षा भोईर व शक्तीवान भोईर यांनी वृक्षारोपण व कोरोना योद्धे सन्मान तसेच बालिका आश्रम व अंकुर बालिका आश्रम येथे मदत केली.

प्रभाग ८ मांडा पश्चिम येथे विजय आव्हाड व तात्यासाहेब फड यांनी धान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ७ आंबिवली येथे दशरथ पाटील, अनंता पाटील यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ७ आंबिवली येथे शशिकांत पाटील यांनी धान्य वाटप व कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग ६ अटाळी येथे नवनाथ पाटील, राजन पाटील यांनी ब्लॅंकेट वाटप, स्मशानभूमी स्वच्छता व कोरोना योद्धे सन्मान,  प्रभाग १५ शहाड येथे मोहन कोनकर यांनी कोरोना योद्धे सन्मान, प्रभाग २ स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये प्रकाश पाटील यांनी कोरोना योद्धे शिक्षक व डॉक्टर यांचा सन्मान केला. प्रभाग ३५ बैलबाजार येथे कल्पेश जोशी यांनी कोरोना योद्धे सन्मान आयोजित केला या सर्व ठिकाणी नरेंद्र पवार यांनी भेट दिली.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा नारा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने मरगळ झटकत काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.

स्थानिक पातळीवर पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कमकुवत असलेली काँगेस स्वबळावर लढून किती जागा निवडून घेऊन येईल या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात सेना राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस कल्याण डोंबिवलीत मात्र स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत १२२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत काँग्रेसचे फक्त ४ नगरसेवक निवडून आले होते.

महापालिकेत आयुक्तांना नागरी प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेवक रवी पाटील, कल्याण पूर्व अध्यक्ष शकील शेख आदी बरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरवस्था, अपुरा पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन कर, वाहतूक कोंडी, बी.एस.यु.पी घरे, कचोरे येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी,  स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पा तसेच शहरातील वाढते प्रदूषण या बाबत निवेदन देण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयाला एक वर्ष पूर्ण; पालिका आयुक्तांचं आभार प्रदर्शन

नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी, सर्वांनी अशाप्रकारे एकत्र येवून काम केलं, तर काय होऊ शकतं याचं उत्कृष्ठ उदाहरण म्हणजेच डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय होय, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले.

कोविडच्या पहिल्या लाटेत कोविड हॉस्पिटल ही संकल्पना सगळयांसाठी नविन होती, त्यामुळे डोंबिवली जिमखाना बॉस्केटबॉल मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी हे एक आश्चर्यच आहे. त्यामुळे ज्यांनी हे रुग्णालय उभारले त्यांचा सत्कार करणे अत्यावश्यक आहे. महापालिका कर्मचारी/अधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व महापालिकेला मदत करणारी डॉक्टर्स आर्मी यांनी झोकुन देवून केलेल्या कामामुळे महापालिकेला ” कोविड इन्हावेशन अवार्ड” सारखा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला, याचा उल्लेख आपल्या भाषणात करीत आयुक्तांनी कोविडसाठी मदत करणा-या सर्वांचेच आभार आपल्या भाषणात मानले.

आयुक्तांनी दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे सर्वांनी मिळून आपत्तीतून निभावून नेलं आणि यापुढेही निभावून नेतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. तात्पुरत्या स्वरुपातील कोविड रुग्णालय उभारण्याचा अजिबात अनुभव नसतांना सर्वत्र पाहणी करुन, माहिती घेवून हे रुग्णालय उभारले, अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी दिली. जिमखाना कोविड रुग्णालय चालविणा-या ओमसाई केअरचे डॉ. साहिल शेख यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयात प्रारंभी 122 बेडची संख्या उपलब्ध होती. त्यामध्ये 70 आयसीयू बेडस्, 3 डायलेसिस बेडस् आणि उर्वरित बेडस् ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. कोविडच्या दुस-या लाटेत कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली. दरम्यानच्या काळात सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या पत्नी टाटा आमंत्रातील उत्कृष्ठ व विनामुल्य उपचाराअंती ब-या झाल्यामुळे विजय भोसले यांनी जिमखाना कोविड रुग्णांसाठी 10 बेडस्, 10 गादया व 10 उशांची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे आता जिमखान्यामध्ये एकुण132 बेडस् रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

आतापर्यंत 3747 रुग्णांनी जिमखाना रुग्णालयात उपचार घेतले आहेत. जिमखाना कोविड रुग्णालय पूर्णपणे वातानुकुलित असून तिथे निगेटिव्ह प्रेशरची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच वातानुकुलनाची हवा रिसायकल न होता नविन हवेचा पुरवठा सतत होत असतो. सद्यस्थितीत एकुण 63 कोविड रुग्ण जिमखाना कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कोविड रुग्णालयात प्रामुख्याने क्रिटीकल पेशंट दाखल केले जात असून , डायलेसिसची उपलब्धता असल्याने नागरिकांची चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय वर्षपूर्ती निमित्त जिमखान्याचे सचिव महेंद्र मोकाशी, माजी अध्यक्ष दिपक मेजारी, ऑक्सिजन पुरवठादार भाऊ चौधरी, महापालिकेचे डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. समिर सरवणकर तसेच डॉ. प्रशांत पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिमखाना कोविड रुग्णालयासाठी सर्वत्तोपरी मदत करणा-या इतर संस्था इतकेच नव्हे तर या रुग्णालयात काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग/महापालिका अधिकारी वर्ग यांचा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आयुक्तांनी स्वतः सत्कार केल्यामुळे कोविडच्या बिकट कालावधीत रुग्णसेवा करणा-या कर्मचारी वर्गाच्या चेह-यावरील सार्थ अभिमान व आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. या समयी अतिरीक्त आयुक्त सुनील पवार, डोंबिवली जिमखानाचे महेंद्र मोकाशी, उपायुक्त सुधाकर जगताप, उपायुक्त रामदास कोकरे, आयएमए कल्याणचे अध्यक्ष प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पाटील व्यास पीठावर उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिमखाना कोविड रुग्णालयाच्या मॅनेजर तथा उप अभियंता रोहिणी लोकरे यांनी केले.

-कुणाल म्हात्रे

रस्त्याच्या अभावाने भिंतीवरून पलीकडे नेलं प्रेत; सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या गावातील घटना

अंत्यसंस्काराला जाताना मृतदेहाची परवड झालेला व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. सदरचा व्हिडिओ कल्याण ग्रामीण भागातील रायते गावातील असल्याचे समोर आले आहे. देशातील सैनिक एका रस्त्यासाठी विनवणी करत प्रशासन केव्हा सक्रिय होईल याबाबत खंत व्यक्त करीत आहे.

ग्रामपंचायतीत कुठले निययोजन नसते? स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रहिवाश्याना मार्ग नसल्याने “इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’. या घटनेमुळे अशा काही काव्य पंक्ती आठवतात. वास्तव्यातही आणि प्रत्यक्षात मेल्यानंतरही काही व्यक्तींच्या आयुष्यातलं दुःख संपत नसल्याचे विदारक चित्र कल्याण तालुक्यातील रायते गावातील सुखदेव भोईर यांच्या अत्यंयात्रेने समोर आले आहे.

अरुणाचल प्रदेश मध्ये सीमेवर लढणाऱ्या योगेश घावट या जवानाने २०२० मध्ये निधन झालेल्या सुखदेव भोईर यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून रस्त्याबाबत चे वास्तव समोर आणले होते. 
सैनिक योगेश घावट यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून  प्रशासनाची चालढकल कशी असते याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या व्हिडिओची सत्यता पडताळणी नंतर प्रकाश भोईर यांचे वडील सुखदेव भोईर यांची ही अंत्ययात्रा असल्याचे समोर आले. कल्याण तालुक्याच्या तहसीलदारांनी प्रस्तावित केलेल्या रस्त्याचा मार्गातील अडथळे दूर करून रहिवाश्यांच्या मागणी कडे लक्ष देण्याची अत्यावश्यकता या व्हायरल मधून दिसून येत आहे. या प्रश्नाला स्थानिक ग्रामपंचायत आणि सत्ता धारी  पक्षाने हातभार लावणे आवश्यक आहे नाही तर रस्त्याच्या अभावी होणारी विदारकता समोर येईल यात दुमत नाही. मी शहीद झालो तर माझी अंत्ययात्रा कुठून नेणार असा खडा सवाल देखील एका जवणाने प्रशासनाला विचारला आहे.

-रोशन उबाळे

कल्याण परिमंडळात लाखो ग्राहकांनी थकवली करोडो रूपयांची बिलं; महावितरणावर गुडघे टेकवण्याची वेळ

महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी महावितरणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

धनंजय औंढेकर हे नुकतेच कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य कार्यालयातील देयके व वसुली विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. कल्याण परिमंडलातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रिडींग, वीजबिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनमधील २ लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात ३ लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे लाख १०३ कोटी ८२ लाख रुपयांची तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे भाग समाविष्ट असलेल्या पालघर मंडलात १ लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. 

यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी ७ लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे २ कोटी ८६ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा समावेश आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे. 

महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘ते’ दोघं ठरले भाजपासाठी सुपरहिरो; शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

भाजपा कार्यलयावर हल्ला करणाऱ्या शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजपतर्फे जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नंदू परब, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी आदींसह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधा तील शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद कल्याणात देखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी व शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यानी काल कल्याण पश्चिमेकडील भाजपच्या कल्याण शहर कार्यालयाला लक्ष करत दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी भाजपचे हे दोन पदाधिकारी त्याठिकाणी कार्यलयाच्या संरक्षणासाठी उपस्थित होते. व्हायरल व्हिडीओमध्ये त्या ठिकाणी आणखी दोन जण देखील दिसत होती. मात्र आक्रमक शिवसेनेच्या नेत्यांनी खिडकीवर दगड मारताच त्या दोघांनी काढता पाय घेतला. निघून जाणारे दोघे जण कोण होते ? याबाबत ठोस माहिती नाही. मात्र इतर दोन जन शिव्या आणि धक्काबुक्की झेलत त्याठिकाणी दिसत होते.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन्ही कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यलयात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी हा सत्कार नसून सन्मान असल्याची प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे. अतिशय खेदजनक बाब आहे आणि त्यावर फक्त प्रतिप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्र्याला सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये धरून आहे. या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणे, तोडफोड करणे, मारहाण करणे या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका; एका कंपनीशी झाला सामंजस्य करार

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने क्रेडाय एमसीएचआय, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.

महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

   महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी , चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजकांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूकबेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. यानंतर याबाबतचा करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि क्रेडाय एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, क्रेडाय एमसीएचआयचे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भाजप कार्यालय वाचवण्यासाठी उभं राहिलेल्या आणि कार्यालय फोडणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांचा पक्षाने केला गौरव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे कल्याण मध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने भाजपा कार्यालय फोडल्यानंतर कल्याण मधील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा कार्यलय फोडणारया शिवसैनिक अमोल गायकवाड याचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्ता प्रताप टूमकर यांचा देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे.

आज दुपारच्या वेळी शिवसैनिक कल्याण मधीलच भाजप कार्यालय फोडण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी भाजपचा एक कार्यकर्ता त्यांना विरोध करीत होता. जेव्हा शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ला केला तेव्हा मारहाण होऊन देखील प्रताप टूमकर यांनी तेथून न हलता ते तिथेच उभे राहिले. याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

एकीकडे ही सर्व झटापट होत असताना शिवसैनिक अमोल गायकवाड याने स्वतःची पर्वा न करता आपल्या हाताच्या बुक्कीनेच भाजपा कार्यालयाची काच फोडली. या धाडसी कृत्याबद्दल अमोल गायकवाड याचा देखील महानगरप्रमुख विजय साळवी आणि उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी गौरव केला.

-कुणाल म्हात्रे

‘यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार’; कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्षांचा ईशारा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजपकडून शिवसेनेला यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी  दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला होता.

केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर कल्याणात मात्र शिवसेनेकडून निषेध करण्यासह भाजपच्या शहर कार्यालयावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली.

 त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. शिवसेनेमध्ये खरोखर हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहीजे होता. यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे