महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका युनिटची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत तर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदिप देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस उत्तम सांडव, अखिल चित्रे व राजेश उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाने हि कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र संदीप देशपांडे यांच्याहस्ते देण्यात आले आहे.
या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष मनोज घरत, कार्याध्यक्ष उल्हास भोईर, सरचिटणीस प्रकाश भोईर, कोषाध्यक्ष चेतना रामचंद्रन, उपाध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, गणेश खंदारे, चिटणीस हेमंत दाभोळकर, महेश मोरे, सहचिटणीस राजेश दातखीळे, शुभम बांगर, यतीन जावळे यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्त व पदाधिकाऱ्यांची केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पांना भेट दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात शुन्य कचरा मोहिम राबवून आधारवाडी येथील डंम्पीग ग्राऊंड बंद केले आहे. आता महापालिका क्षेत्रातील ओल्या कच-यावर बारावे व उंबर्डे घनकचरा प्रकल्पात थेट प्रक्रिया केली जाते. यापूर्वी महापालिकेत फार कमी म्हणजेच सुमारे २ टक्के इतक्या कमी प्रमाणात कच-याचे वर्गिकरण होत होते. परंतू आता जवळ जवळ ९० टक्के वर्गिकरण केले जाते.
महापालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेच्या अनुषंगाने राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी राज्यातील १५ महापालिका आयुक्तांसमोर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुन्य कचरा मोहिमेबाबत सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहून काही आयुक्तांनी महापालिकेच्या या कार्यप्रणालीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली.
त्यानुसार गुरुवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व इतर स्थायी समिती सदस्य, पक्षनेता नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आधारवाडी डंम्पींग ग्राऊंड, बारावे घनकचरा प्रकल्प तसेच विविध इमारतींमध्ये केल्या जाणा-या खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली आणि महापालिकेत कच-याचे कशा प्रकारे वर्गिकरण केले जाते याची माहिती घेतली. महापालिकेचे हे प्रकल्प पाहून आपण प्रभावित झालो असून पिंपरी चिंचवड महापालिकेतही अशाप्रकारे शुन्य कचरा मोहिम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या कोविड रुग्णांचे आशीर्वाद हेच आपले सर्वांत मोठे अवॉर्ड आहे असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून आज सायंकाळी महापालिकेत आयोजिलेल्या हॉस्पिटल मॅनेजर्सच्या छोटेखानी सत्कार समारंभात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.
महापालिकेतील इंजिनियर्स, डॉक्टर्स इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांनी एकत्रितरीत्या टीम म्हणून केलेल्या कामामुळे महापालिकेस आज राष्ट्रीय पातळीवरील कोविड १९ इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त झाला, परंतु आपल्या रुग्णालयातुन बरे झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच खरे अवॉर्ड, त्यामुळे सर्वांचे काम हे कौतुकास पात्र आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने अभिमान वाटावा असेच काम केले असे आयुक्त पुढे म्हणाले. कोविड मध्ये काम केलेल्या प्रत्येकाला पुढे अभिमानाने सांगता येईल की मी कोविडमध्ये न घाबरता काम केले, यासाठो प्रत्येकाने आपल्या कामाचे अनुभव लिहून ठेवावे त्याचे एक आपण पुस्तक बनवूया असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या छोटेखानी कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील ,कोविड कालावधीत आर.आर. रुग्णालय, निऑन रुग्णालय, होली क्रॉस या रुग्णालयांचे नियोजन करणारे कार्यकारी अभियंता तरुण जूनेजा, कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी काम करणारे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, साई निर्वाण कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके, टाटा आमंत्राचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, सावळाराम कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता किरण वाघमारे, पाटीदार कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता सुरेंद्र टेंगळे, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरीचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता भालचंद्र नेमाडे, जिमखाना कोविड समर्पित रूग्णालयाच्या हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता रोहिणी लोकरे, रुक्मिणी प्लाझा रुग्णालयाचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उप अभियंता श्रीकांत मुंडे, सर्व कोविड सेंटरमध्ये विद्युत यंत्रणा उभारणारे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सर्व कोविड रुग्णालयातील खानपान व्यवस्था सांभाळणारे महापालिका सचिव संजय जाधव, सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शहर अभियंता यांचे स्वीय सहाय्यक भागवत यांचा भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भिवंडी लोकसभेचे खासदार तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खडकपाडा येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला.
खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भिवंडी तालुक्यातील त्यांच्या अंजूर दिवे गावात व भिवंडी लोकसभा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कपिल पाटील हे देशातले पाहिले आगरी समाजाचे नेते आहे की ज्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. आम्ही ह्या देशातल्या सर्व आगरी समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ पातकर, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, पंकज उपाधय, संजय कारभारी, शत्रुघ्न भोईर, वैशाली पाटील, प्रिया शर्मा, पुष्पा रत्नपारखी, प्रीती दीक्षित आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
३० जानेवारी २०२० रोजी प्रसाद महाजन यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्णता लाकडाऊन लावण्यात आल्याने सर्व कॉलेज शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणे शक्य नव्हते. अशातही महाजन यांनी संपर्कातील राष्ट्रवादी विचारांशी एकनिष्ठ असणारया विद्यार्थ्यांशी संपर्क करुन संघटना बांधणी सुरू केली. विद्यार्थी संघटना वाढीस सुरवात केली.
या नियुक्तीला कालावधी १६ महीनेही पुर्ण झालेला नसताना अचानकपणे जुन २०२१ मध्ये विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पदमुक्त करण्यात आले. पक्षातील एक धनदांडग्यांचा गट संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील गरिब कार्यकर्ताचा छळ करत अपमानास्पद वागणूक देत सतत हेटाळणी करत असल्याचा आरोप प्रसाद महाजन यांनी केला आहे.
या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे हे जावाबदार असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला असल्याचे महाजन यांचे म्हणणे असून याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून याविषयी सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याचे शाश्वत आश्वासन पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांना विचारले असता, प्रसाद महाजन हा मूळचा शिवसैनिक त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसादकडे असताना संघटनेचे काम असमाधान कारक होते. त्या मुळे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिफारशी वरून सुजित रोकडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात युवा सेनेचा प्रवेश होत असून प्रसाद महाजन हे आरोप जाणीवपूर्वक सुपारी घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे.
कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात जोराने आदळली.
यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेउ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
क.डों.म.पा. चे मा.नगरसेवक महेश गायकवाड हे आता एका नव्या क्षेत्राकडे निघाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतुन ‘डाव’ हा मराठी चित्रपट उभा राहणार आहे. आणि या चित्रपटाचा महूर्त सोहळा आज कल्याण येथे पार पडला. या सोहळ्याला सिनेमात असणारे कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.
‘नाथ प्रोडक्शन’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘डाव’ चे चित्रीकरण १३ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्यातून निर्माण होणारा जुगार आणि जुगाडाचा डावपेच अशी संपुर्ण मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अनेकसे ट्विस्ट, एक्शन, ड्रामा, कॉमेडी अशी सर्व फोडणी या चित्रपटात घालण्यात आली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नायिकेची भूमिका कोण करणार ? हे मात्र गुपितच आहे. या चित्रपटात खलनायक आणि इतर महत्वाच्या भूमिका कल्याण मधील काही नवोदित कलाकार साकारणार आहेत. याशिवाय भाऊ कदम आणि आणखीन दिगग्ज कलाकार देखील चित्रपटात दिसणार असल्याचे दिग्दर्शक अमित कोळी यांनी या सोहळ्यात प्रेक्षकांशी बोलताना सांगितले आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉंग ने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले. मिलिंद शिंदे यांचे चिरंजीव मधुर शिंदे यांनी हे गाणे आपल्या शिंदेशाही आवाजाच्या शैलीत गायले आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक शकील अहमद यांचेही संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. त्याचबरोबर चंद्रकला दासरी व यशश्री दासरी यांच्या आवाजातील गाणी देखील असणार आहेत. करण आणि दर्शन हे स्वतः चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत आहेत.
बजरंग बादशाह यांची ही कथा असून पटकथा देखील त्यांनीच केलेली आहे. चित्रपटातील संवाद संकेत हेगाणा व राकेश शिर्के यांनी लिहले आहेत. कौशल भारती छायाचित्रण तर विकी बिडकर कला दिग्दर्शक म्हणून असणार आहेत. मुहूर्त सोहळ्याला झी टॉकीज निर्माते अन्वय नायकोडी तसेच अरबाज मोघल देखील उपस्थित होते. याशिवाय निर्मिती प्रबंधक चेतन मुरूमकर, गीतकार अजय वाघमारे आणि चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक युगंधर शिंदे असनार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा कॅमेरा डिपार्टमेंट श्रीनिवास शिंगे आणि राहुल बर्गे पाहणार आहेत. राधा सागर, भाग्यश्री मोटे, नितीन रूपवते, भरत ठाकूर, टिना सोनी, जॉनी रावत, विश्वजीत सोनी हे कलाकार म्हणून दिसणार आहेत.
‘नाथ’ प्रोडक्शनच्या माध्यमातून ‘डाव’ हा चित्रपट पुढे येणार असून त्यामागे अनेक लोकांचे मोठे योगदान असणार आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतला हा चित्रपट असून प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांचे या चित्रपटाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कल्याणचे कॉमेडी किंग आणि गायक बजरंग बादशहा तसेच वैशाली ठाकूर आणि सुजाता पवार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तमाम कल्याणकर आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरच हा नवा ‘डाव’ पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील.
कल्याण कोळसेवाडी भागात काल रात्री एका महिलेला मारहाण झाली होती. या प्रकरणाबाबत कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्ह्याची नोंद केली असून व्हडीओ मध्ये असणाऱ्या जणांना अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला प्रवासीची रिक्षाचालकाने छेड काढल्याचे बोलले जाते. यावरून महिलेला व तिच्या मित्रांना जमावकडून मारहाण झाली होती. या संदर्भात कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून नऊ जणांना आता ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करून कारवाई करणार असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकरणातील दोन्ही बाजू व्यवस्थितपणे उजेडात येतील.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका महिलेला व तिच्या दोन मित्रांना रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास उशीर होत असल्यावरून स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याला धारेवर धरले आहे.
रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षा प्रवास करीत होती. दरम्यान रिक्षा चालकाने तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे. त्या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे तरुण रिक्षाचालकाला जाब विचारत होते. मात्र यादरम्यान रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने त्या महिलेला व तिच्या दोन्ही मित्रांना अमानुषपणे मारहाण केली. शिवाय एका व्यक्तीने पट्टा काढून त्याने मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्थानीक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या माणसावरच तक्रार दाखल करतात. मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड काढला तर लक्षात येईल की या पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट अधिक प्रमाणात आहेत. दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोघांना अटक करायची व नंतर तोडपाणी करून त्यांना सोडून द्यायचे. पोलिसांच्या या धोरणामुळे या भागात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”
– गणपत गायकवाड (स्थानिक आमदार)
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला असून त्यांनी या बाबत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.
तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.
“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”