शिंदेशाही वर पुन्हा काळ चक्र; Dinkar Shinde यांचं निधन

Dinkar Shinde : महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे तृतीय पुत्र गायक दिनकर शिंदे यांचे आज रात्री २ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथील राहत्या घरापासून त्यांची अंतिम यात्रा निघणार असून शहरासह राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राचे लोकसंगीतकार गायक प्रल्हाद शिंदे यांची गाणी आजही अजरामर आहेत. त्यांच्या आवाजातील जादू ही केवळ त्यांच्या पुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या आवाजाचा वारसा त्यांनी आपल्या आपत्यांनाही दिला. त्यातीलच एक अपत्य म्हणजे दिनकर प्रल्हाद शिंदे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या जे जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची अनेक गीते, भक्तिगीते, भीमगिते, कव्वाली लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. महाराष्ट्र भरात त्यांनी आपले संगीताचे कार्यक्रम सादर केले असून अजूनही ते संगीतमय प्रवासात जगत होते. मात्र आज १३ ऑगस्ट रोजी त्यांचा संगीतमय आयुष्याचा प्रवास इथेच थांबला आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेड लावले त्या संगीतकार प्रल्हाद शिंदे यांचे २००४ साली निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांना आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे, चंद्रकात शिंदे, सूर्यकांत शिंदे, सूरज शिंदे, किरण शिंदे अशी अपत्ये आहेत. मागील वर्षीच दिनकर शिंदे यांचे पुत्र सार्थक शिंदे यांचे निधन झाले होते. त्यांच्या अकाली मृत्यूने दिनकर शिंदे खचून गेले होते. मात्र एकामागोमाग एका वर्षी पिता पुत्राच्या निधनाने शिंदेशाही घरण्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Dinkar Shinde passed away

Nandivali – Chakkinaka मार्ग बनला खाजगी पार्किंग झोन? अर्धा रस्ता अडवून वाहने उभी

Chakkinaka : कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड रोड सध्या वाहतुकीसाठी डोके दुखी बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबरोबरच रस्त्यालगत होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जात आहे. यासंदर्भात कल्याण पूर्व वाहतूक उपविभाग शाखेकडेही तक्रारी प्राप्त होत असून यावर कायमचा अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेवाळी नाक्याहून चक्कीनाक्याकडे दिवसभरात हजारो वाहनांची रेलचेल असते. यात परिवहन बसेस सह, अवजड वाहने, रिक्षा तसेच असंख्य खाजगी वाहनांतून हजारो प्रवासी ये जा करीत असतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नांदिवली ते चक्कीनाका पर्यंतचा परिसर हा विशेष वर्दळ असणारा परिसर आहे. मात्र याच रस्त्यालगत अनेकदा डबल ट्रिपल लेन मध्ये चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे जवळपास निम्मा रस्ता अडवून निम्माच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो. यावर वाहतूक विभागाने बेकायदा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर अनेकदा दंड ठोठावला आहे.

केवळ हाच मार्ग नव्हे तर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. प्रशासनाने बऱ्याच मार्गावर नो पार्किंगचे बोर्ड लावले असून काही ठिकाणी P1, P2 अशी संकल्पना राबवली आहे. आता हाच नियम श्री मलंगगड मार्गावर देखील लागू करावा अशी मागणी वाहतूक विभागाकडे होऊ लागली आहे. त्यामुळे आता वाहतूक विभाग यावर काय कार्यवाही करतेय ते आता पहावे लागणार आहे.

Nandivali – Chakkinaka road to become a private parking zone?

Kalyan East : शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून शाळकरी विद्यार्थ्याने घेतला गळफास

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने एका शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून ठेवले होते.

विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आई वडीलांसह राहत होता. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. रविवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने एक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. एका शिक्षिकीने व विद्यार्थ्याने मला चिडवल्याने आत्महत्या करीत असल्याचे या नोट मध्ये लिहण्यात आले आहे. मात्र त्याच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलिकडल्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी मानसिक तणावातून आत्महत्या केली जाते हे प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील तितकाच समावेश होतो. यामध्ये आत्महत्या करण्यामागे काही गंभीर कारणे असतात तर काही प्रकरणात शुल्लक कारणाने आपले जीवन संपवल्याचे देखील समोर येते. त्यामुळे अशा विषयांवर शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे असे दिसते. त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घ्यायला हव्यात ही काळाची गरज बनू लागली आहे.

Kalyan East : A school student hanged himself after writing the name of the student along with the teacher

डोंबिवली गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी युवा उद्योजकाने दिली ३० किलो चांदीची वीट

डोंबिवली : शहराचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या गणेश मंदिराची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता या डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा जीर्णोद्धार केला जाणार असून मोठ्या प्रमाणात चांदी लागणार आहे. याकरिता अनेक दानशूरांना आवाहन केले जात आहे. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर नांदेड मधील एका युवा उद्योजकाने आज बाप्पा चरणी ३० किलो ९०० ग्रॅम वजनी चांदीची वीट अर्पण केली आहे.

डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर चांदी लागेल अशी माहिती दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी नांदेडचे युवा उद्योजक सुमित मोगरे यांच्याशी संपर्क केला होता. यानंतर चव्हाण यांच्या शब्दाला मान देत सुमित यांनी तात्काळ चांदी दान देण्याचे ठरविले. आज सकाळच्या दरम्यान मंदिरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी चांदीची वीट गणरायाच्या चरणी अर्पण केली. या विटेची किंमत साधारणपणे २७ लाख २७ हजार रुपयांच्या घरात आहे.

युवा उद्योजक सुमित मोगरे यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे. त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी २ कोटी ४० लाख रुपयांची चांदी अर्पण केली होती. त्यापाठोपाठ त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डोंबिवलीच्या गणेश मंदिरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी दान केली आहे. असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोगरे यांचे आभार व्यक्त केले.

A young entrepreneur donated 30 kg of silver brick for the renovation of Dombivli Ganesh Temple

Kalyan East भागात हायटेक सेमी इंग्लिश स्कुल उभारण्याची मागणी

Kalyan East : दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची घटती पटसंख्या, शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे, शाळांची झालेली दुरावस्था तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्व महापालिकेच्या शाळा या सेमिइंग्लिश करणे बाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नुकतीच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली.

Kalyan East भागात मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक राहत असून इंग्रजी शाळेत आकारण्यात येणारी भरमसाठ फी व डोनेशन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडणारे नाही. कल्याण पूर्वेत नेतीवली येथे महापालिकेच्या मालकीची केवळ एकमेव सेमीइंग्लिश शाळा आहे. मात्र ती शहराच्या एका वेगळ्या टोकाला असल्याने कल्याण पूर्वेच्या मध्यभागी असलेल्या काटेमानिवली शाळा व जाईबाई शाळा येथे तातडीने सेमीइंग्लिश स्कुल सुरू करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.

अलीकडल्या काळात काटेमानिवली येथील शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे नव्याने सुसज्ज ईमारत बांधून कल्याण पूर्वेतील मुलांसाठी सर्व सोयीसुविधा असलेली हायटेक सेमी इंग्लिश स्कुल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नितीन निकम यांनी आयुक्तांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास शिंदे देखील उपस्थित होते.

Demand for establishment of Hi-Tech Semi English School in Kalyan East area

Kalyan East : कल्याण पूर्व विधानसभेसाठी प्रथम दावा भाजपचाच असेल – मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा पेच आता वाढू लागला आहे. मात्र कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेची जागा ही भाजपच लढवेल असे आता म्हटले आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे स्थानिक आमदार असून मागील १५ वर्षे ३ टर्म त्यांनी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. गोळीबार प्रकरणा नंतर ते तुरुंगात असल्यानंतर आता कल्याण पूर्वेत सत्तापालट होणार का? अशा चर्चा सुरू होत अनेकांची नावे पुढे येऊ लागली. त्यानंतर हा विधानसभा क्षेत्र शिवसेनेला देऊन कल्याण पश्चिमचा भाजपला दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही जागा भाजपचे लढवेल असे सांगितल्यानंतर आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणपत गायकवाड हे वर्षानुवर्षे या भागाचे नेतृत्व करीत आलेले आहेत. ते सातत्याने निवडूनही येतात. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले आहे. ते येथील विद्यमान आमदार असल्याने महायुतीत या ठिकाणी प्रथम दावा हा भाजपचाच असेल. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणे हे गैर नाही त्याचप्रमाणे दावे करणे देखील बरोबरच आहे असे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Kalyan East : BJP’s first claim for Kalyan East Assembly will be – Minister Ravindra Chavan

भाजप पसरतंय अंथरून सोडून पाय; पाच जागांवर दावा, मग बाकीच्यांना काय?

कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात रस्सीखेच सुरु झाली असताना कल्याणमध्ये भाजपने खळबळजनक दावा केला आहे. कल्याण मध्ये भाजपाने पाच जागांवर दावा केला असून आमचे तुल्यबळ जास्त असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. यामुळे युतीत असलेल्या भाजपाने हेतुपरस्सर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथे भाजपाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ या पाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून इथे भाजपचे उमेदवार द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी आहे की अंथरून पसरून पाय पसरणे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा मजबूत असल्याचा दावा केला आहे. या पाच पैकी डोंबिवली, कल्याण पूर्व या दोन मतदारसंघात भाजप, कल्याण पश्चिम, अंबरनाथमध्ये शिवसेना तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचा उमेदवार असून या पाचही मतदारसंघात सूर्यवंशी यांनी भाजपचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात येत असून अनेक ठिकाणी शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी असे दावे करणे म्हणजे अंथरून सोडून पाय पसरणेच आहे अशा चर्चा देखील केल्या जात आहेत.

BJP claims five seats in Kalyan

Kalyan East : गणेशवाडीतील गीता हरिकीसनदास रुग्णालयात लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची होतेय मागणी

Kalyan East : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणेशवाडी येथे महानगरपालिकेचे गीता हरीकिसनदास हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ओ.पी.डी. आणि कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र सुरू आहे. याजागी लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक ९२, गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुलातील भूखंड हा सांस्कृतिक भवनाकरिता आरक्षित आहे. मात्र या भूखंडावर महात्मा फुले योजने अंतर्गत व इतर शासकीय योजने अंतर्गत सर्व आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून आरक्षण बदलण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. सदर भूखंडावर असलेल्या इमारतीत रुग्णालयाचे काम करण्यात आलेले आहे. मात्र आरक्षण बदल होईपर्यंत याठिकाणी महिलांसाठी प्रसृतिगृह तसेच गीता हरिकीसनदास रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयीसुविधा याठिकाणी हलविण्यात याव्यात याबाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शक्तीधाम येथील इमारतीत १५ ऑगस्ट पर्यंत तातडीने प्रसृतिगृह उभारून गीता हरिकीसनदास रुग्णालय लहान मुलांसाठी सुसज्ज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचे नितीन निकम यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड देखील उपस्थित होते.

Demand for setting up a well-equipped children’s hospital at Geetha Harikisandas Hospital in Ganeshwadi

Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंजिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल.

आप्पा शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)

________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)

_____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते.” –उदय रसाळ (माजी नगरसेवक)

____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे.”शाहीन मुल्ला (समाजसेविका)

Kalyan News : KDMC ‘D’ ward area is still a haven for addicts

Arya Global ग्रुपने साजरा केला ‘ग्लोबल वेलनेस डे’

Arya Global : डॉ नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल, आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम राबवित असते. आयोजित उपक्रमात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांची पालकत्वावर चर्चा आयोजित केली गेली.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक, डॉ. हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केले होते. आपल्या विचारप्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉ. शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या. अधिक स्क्रीन वेळ, अस्वास्थ्यकर अन्न सवयी, एकटेपणा, विभक्त कुटुंबे यासारख्या समस्यांना स्पर्श केला गेला.

डॉ. शेट्टी यांनी लवचिकता, नातेसंबंध, दुरुस्ती आणि निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग कसा असावा याबद्दल सांगितले. पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकतात आणि तरीही घरात निरोगी वातावरण कसे तयार केले जाऊ शकते हे सांगितले.

या कार्यक्रमाला डॉ. इंदुरानी जाखड IAS, आयुक्त आणि प्रशासक, KDMC या देखील उपस्थित होत्या.आर्य ग्लोबल समुहाकडे इनहाऊस समुपदेशकांचे (Counsellors) एक पॅनेल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतात. प्रोजेक्ट मानवतावादी, सेवा आणि मूल्य शिक्षण यासारखे सकारात्मक शालेय वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ते शाळेत नियमितपणे अनेक उपक्रम राबवतात जे मानसिक आणि भावनिक कल्याण, आत्म-शोध, सर्वसमावेशक वातावरण आणि सहानुभूतीपूर्ण व्यक्ती निर्माण करण्यास मदत करतात.

आर्य गुरुकुल, नांदिवली, अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल, कल्याणच्या समुपदेशकांनी (Counsellors) त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शालेय स्तरावर समुपदेशन प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अलीकडच्या काळात समुपदेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे केस स्टडी देखील शेअर केले.

क्रीडा विभागाने देखील सांगितले की ते कसे सक्रियपणे खेळांच्या माध्यमातून मुलाच्या आरोग्याच्या एकूण संतुलनास प्रोत्साहन देतात. तसेच त्यांनी वेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (𝙳𝚒𝚏𝚏𝚎𝚛𝚎𝚗𝚝𝚕𝚢 𝚊𝚋𝚕𝚎𝚍 𝚜𝚝𝚞𝚍𝚎𝚗𝚝𝚜) मार्ग उघडून सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन दिले गेले.

लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले, “लर्निंग डिसॅबिलिटी हा प्रचलित परीक्षा पद्धतीचा प्रश्न आहे, मुलाचा नाही.” डॉ. इंदुरानी जाखड यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणांचा कसा फायदा होऊ शकतो कारण ही प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहे. जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त म्हणजे इको सिस्टीम तयार करण्याचे स्मरणपत्र आहे, जिथे एखाद्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल उघड करणे सुरक्षित वाटते, जिथे भावनिक गोंधळातून जाण्याचा कोणताही निर्णय किंवा कलंक नाही, जिथे आवाज ऐकला जातो आणि जिथे सर्वसमावेशकता केवळ एकच नाही. खोटी कल्पना पण वास्तव ठरते.

Arya Global Group celebrates ‘Global Wellness Day’