कल्याण : नर्सिंग कोर्सच्या नावाखाली कल्याण मध्ये जवळपास ३०-४० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या संदर्भात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षण संस्थे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण मध्ये एक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून मोठी फी उकळून नर्सिंग कोर्स चालवीत होती. आमची संस्था सरकारी नोंदणीकृत संस्था असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर कोर्सचे सर्टिफिकेट देखील देण्यात आले. मात्र हेच सर्टिफिकेट घेऊन विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तेथे त्यांच्यावर खोटे सर्टिफिकेट देऊन इंटरव्ह्यू देत असल्याचे आरोप केले गेले. यानंतर गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना मिळालेलं सर्टिफिकेट हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. या फसवणुकीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि मेहनत वाया गेली असून जवळपास लाखो रुपयांची कमाई या बोगस शिक्षण संस्थेने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू असून विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
–संतोष दिवाडकर
Cheating students in the name of nursing courses