Detonators Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बुधवारी डेटोनेटरचे बॉक्स सापडल्याने एकच खळबळ माजली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून बॉम्ब स्कॉड बोलावण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी ५४ डेटोनेटर ताब्यात घेतले. रेल्वे स्थानक परिसरात घातपात घडवण्याचा कट होता का असा संशय आता व्यक्त केला जात असून पोलीस सीसीटीव्ही मार्फत पुढील तपास करीत आहे.
डिटोनेटर हे बॉम्ब सक्रिय करणारे उपकरण आहे. याला बॉम्बचा ट्रिगर असेही म्हणतात. खड्डे खोदून लपविलेल्या आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसेस) बॉम्बमध्ये त्याचा वापर केला जातो. डिटोनेटर बॉम्बची स्फोटक शक्ती वाढवण्याचे काम करतो. डिटोनेटर हे डिटोनेशन चार्ज असलेले एक उपकरण आहे. ज्याचा वापर निश्चित वेळी आणि क्रमाने विश्वासार्हपणे स्फोट सुरू करण्यासाठी केला जातो. हे नॉन-इलेक्ट्रिक अथवा इलेक्ट्रिक असतात. रेल्वेमध्येही डिटोनेटर्सचा वापर केला जातो. हे खराब ट्रॅक शोधण्यासाठी वापरले जाते. तसेच तलावांमध्ये गैरप्रकारे मासेमारी करण्यासाठी आणि खाणींमध्ये ब्लास्टिंगच्या कामासाठी डिटोनेटर्सचा वापर केला जातो.
कल्याण रेल्वे स्थानकात असे ५४ डिटोनेटर सापडल्याने प्रवाश्यांमध्ये देखील घबराट उडाली होती. हे उपकरण नेमके कशासाठी व कोणी आणून ठेवले होते याचा सखोल तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. हे उपकरण घातपातासाठी आणण्यात आले होते की या पाठीमागे अवैध उत्खनन आणि भूमाफियांचा हात आहे ही बाब देखील तपासाअंती समोर येणार आहे.
Detonators Kalyan : What exactly is a detonator? Where is it used?