Dombivali : शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या बाजारपेठेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केला. याच विचाराने शहरात कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात ही ग्राहक पेठ सुरु असणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे. सर्वांचे पोट भरावे यासाठी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळाले, तसेच शहरातील नागरिकांना थेट शेतातील माल खरेदी करता आला तर त्यात दोघांचाही फायदा असल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले.
या संकल्पनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय तसेच नैसर्गिक पद्धतीचा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य आदी जिन्नस रास्त दरात विकत घेता येणार आहेत. नेहरू मैदान येथे नवरात्रीनिमित्त विशेष फ्रुट महोत्सवाच्या रूपाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Dombivali : Vegetables, fruits, pulses available from direct farmer to consumer concept