Bhajan Bhavan Dombivli : भजन ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून, डोंबिवलीलाही या समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेला नवे व्यासपीठ मिळावे या हेतूने डोंबिवली पश्चिम येथील गणेश घाट परिसरात ‘डोंबिवलीकर भजन भवन’ उभारण्यात आले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या या नव्या वास्तूचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते आज मोठ्या उत्साहात लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डोंबिवलीकरांशी स्नेहसंवाद साधला.
डोंबिवली पश्चिम येथील युवा गायक राजयोग धुरी यांच्या भजन क्षेत्रातील कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लोकरे, शहाबाजकर, प्रमोद धुरी, मुणगेकर, चिले, भाई राणे, सतीश राणे आदी हरीभक्त तसेच भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राहुल दामले, जनार्दन म्हात्रे, नंदू म्हात्रे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राहुल म्हात्रे, नंदू जोशी, रेखा म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.
भजन परंपरेचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ‘डोंबिवलीकर भजन भवन’ मुळे स्थानिक भजन गायक, कलाकार आणि रसिकांना एक समान मंच उपलब्ध होणार आहे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.
Dombivli : Inauguration of Bhajan Bhavan; A new platform for the Bhajan tradition

