कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 : कल्याण डोंबिवलीत मागील निवडणुकीत कुणाला किती मतं?

कल्याण : Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 च्या तुलनेत यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. सध्या मतदान प्रक्रिया पार पडली असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नवा निकाल हाती येण्यापूर्वी जरा मागील निकालावर एक नजर टाकूयात.

मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील चारही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि मनसे या तीन पक्षांनी आपापले झेंडे रोवले. कल्याण पूर्वेत भाजपकडून गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील तर डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण आमदार म्हणून निवडून आले होते. यात भाजपच्या दोन्ही आमदारांची हॅट्रिक वगळता इतर दोन आमदार नव्यानेच लोकांना मिळाले होते.

यंदा होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांनाच किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात लढणारे उमेदवार यावेळी काहीसे वेगळे आहेत. मात्र त्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा मागील निकाल जाणून घेऊयात.

कल्याण पूर्व विधानसभा :-

मागील वेळी भाजपचे गणपत गायकवाड विरुद्ध अपक्ष (शिवसेना बंडखोर) धनंजय बोडारे यांच्यात थेट लढत झाली होती. यात गणपत गायकवाड यांना ६०,३३२ मते तर बोडारे यांना ४८,०७५ मते मिळाली होती. गायकवाड यांनी बोडारे यांचा १२,२५७ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत पक्षीय लढत पाहता ही जागा आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसने लढली होती. ज्यात प्रकाश तरे यांनी १६,७५७ मते मिळवली होती. तर वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवार अश्विनी धुमाळ यांनाही १२,८९९ मते मिळाली होती. कल्याण पूर्वेत ३६९० जणांनी नोटा हा पर्याय निवडला होता. यासह १९ उमेदवारांच्या यादीत नोटा हा पर्याय पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.

कल्याण पश्चिम विधानसभा :-

सदर विधानसभा क्षेत्रात युतीकडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेले तेव्हाचे विध्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र तरीही विश्वनाथ भोईर यांनी ६५,४८६ इतकी मते मिळवून आमदारकी मिळवली होती. तर नरेंद्र पवार यांना ४३,२०४ मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानी मनसेचे प्रकाश भोईर यांना ३८,०७५ लोकांनी पसंती दर्शवली होती. झालेल्या तिरंगी लढतेत विश्वनाथ भोईर यांनी २२,२२७ मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती. पक्षीय लढत पाहता युती विरोधात लढणाऱ्या आघाडीकडून ही जागा काँग्रेसचे सचिन पोटे लढवीत होते. ज्यांना २०,१६० मते मिळाली होती.

कल्याण ग्रामीण विधानसभा :-

या मतदारसंघात शिवसेनेने तेव्हाचे विध्यमान आमदार असलेल्या सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना निवडणूक लढण्याची संधी दिली होती. मात्र ही शिवसेनेची घोडचूक ठरली आणि याचा फायदा मनसेने उचलत शिवसेनेकडून ही जागा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली. २०१९ निवडणुकीत मनसेच्या राजू पाटलांनी ७१५४ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. राजू पाटील यांना ९३,९२७ इतकी मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६,७७३ मते मिळाली होती. या विधानसभा क्षेत्रात २००९ पासूनच मनसे विरुद्ध शिवसेना अशी काटो की टक्कर पहायला मिळत आहे. पराभूत उमेदवार रमेश म्हात्रे यांचा २००९ मध्ये देखील मनसेच्या रमेश पाटील यांनी पराभव केला होता. मात्र रमेश पाटलांना २०१४ साली सुभाष भोईर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. २०१९ साली शिवसेनेने विध्यमान आमदारांना थांबवून पुन्हा एकदा रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा ते पराभूत झाले आणि ही जागा पुन्हा एकदा मनसेच्या ताब्यात गेली.

डोंबिवली विधानसभा :-

२०१९ च्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी ८६,२२७ मते मिळवून एकतर्फी विजय मिळवत आमदारकीची हेट्रिक साधली होती. तब्बल ४१,३११ मतांच्या फरकाने त्यांनी मनसेच्या मंदार हळबेंचा पराभव केला होता. मंदार हळबे यांना चव्हाण यांच्या जवळपास निम्मी ४४,९१६ इतकी मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतही त्यांनी असाच मोठा विजय मिळवला होता. ज्यात त्यांची लढत शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांच्याशी झाली होती. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे हेच त्यांचे प्रतिस्पर्धी ठरले आहेत. २००९ साली झालेली पहिली निवडणूक रवींद्र चव्हाण यांना चुरशीची गेली होती. यादरम्यान शहरात मनसेची मोठी लाट होती. त्यामुळे मनसेच्या राजेश कदम यांच्यासमोर त्यांना १२,३२७ मतांनी विजय मिळाला होता. आता ते चौथ्यांदा निवडणूक लढवीत असून चौथा निकाल काय असेल याकरिता काही तास वाट पहावी लागणार आहे.

कल्याण डोंबिवली मधील या चारही जागांवर कोण आमदार होणार? तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *