Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराच्या फेऱ्या झडत असून कळवा ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली सुरू आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना कल्याण लोकसभेत रंगला असून शिवसेनेकडून डॉ.श्रीकांत शिंदे व उबाठा पक्षाकडून वैशाली दरेकर हे उमेदवार लढत देत आहेत. योगायोगाची बाब म्हणजे आज कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी एकाच वेळी हे दोन्ही उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली दुपारी ४ वाजल्या पासून श्री राम टॉकीज येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग अपर्णा डेअरी, खडेगोळवली नाला, रायगड कॉलनी, आंबेडकर चौक ६० फुटी रोड, शिवाजी महाराज चौक, राजाराम चौक, चिंचपाडा रोड, काटेमानिवली चौक, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, नेतीवली रोड, चक्कीनाका असा असणार आहे.
शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली सायंकाळी ५ वाजता साईनगर शिवसेना शाखेपासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग पुणे लिंक रोड, काटेमानिवली, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, सुमेरू टॉवर पासून पुढे एका विकासकाच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा सांगता होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा मार्ग हा जवळपास एकच असल्याने दोन्ही रॅली या आमने सामने नव्हे तर मागे पुढे असणार आहेत. एक वेळ एक मार्गिका असल्याने समन्वय कसा साधला जातो हे आता पहावे लागणार आहे.
कल्याण पूर्वेचा बराचसा भाग हा अतिशय कोंडीचा असल्याने या भागातील रस्ते देखील अरुंद आहेत. यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना कल्याण पूर्वेतील नागरिकांना सहन करावा लागतो. त्यात आता दोन्ही उमेदवार एकाच दिवशी एकाच वेळी या रस्त्यांवर शक्ती प्रदर्शनासाठी उतरणार असल्याने हे रस्ते देखील कोंडीत सापडणार आहेत. परिणामी परिसरातील नागरिक, तसेच लगीन खरेदीसाठी तसेच इतर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या खरेदीदारांना मात्र मोठ्या जाचाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्की.
-संतोष दिवाडकर 8767948054
Kalyan Loksabha : Shinde-Darekar face off today in Kalyan East