Kalyan Loksabha : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण शहरात जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेपुर्वी शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मोदींच्या सभेवरून मोरे हे नाराज असल्याचे त्यांच्या राजीनाम्यातुन स्पष्ट होत आहे.
शिवसेनेच्या बंडानंतर सुरुवातीला अरविंद मोरे हे ठाकरे गटात होते. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची कल्याण मुरबाड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. पदनियुक्तीनंतर ते मिळालेली जबाबदारी पार पाडत होते. मात्र आता मोदींच्या सभेपुर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जिल्हाप्रमुख या पदाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मान प्राप्त करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेकरिता आमदार, माजी आमदार तसेच पक्षाचे शहरप्रमुख यांना मंचावर निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या प्रोटोकॉलनुसार जिल्हाप्रमुखालाही हा मान मिळायला हवा होता. यात माझे नाव जाणीवपूर्वक डावलले असल्याने मी या पदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. नरेंद्र मोदी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील, कल्याणचे डॉ.श्रीकांत शिंदे व ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभा घेत असून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्याच्या चर्चा कल्याणच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Kalyan Loksabha : Shiv Sena’s Kalyan Murbad District Chief Resigns to Chief Minister Ahead of Modi’s Meeting