कोंबडीची गोष्ट
काही गोष्टी खूप खास असतात. पण या खास गोष्टी जेव्हा कोणी सांगत नाही तोवर सर्वांना कळत नाही. सध्या मी गावी असल्याने खूप निवांत आहे. करमण्या सारखे काही नसल्याने व नवीन लग्न झाल्याने कुठेही लांब जाण्याची मुभा नसल्याने घरा जवळच मन रमवत असतो. याचं दरम्यान मावशीच्या कोंबडीची गोष्ट आज सांगावी वाटते.
जो फोटो तुम्ही पाहिला असेल त्या कोंबडीचे वय आता ७-८ वर्षे आहे. माझ्या आठवणी प्रमाणे मी कॉलेजच्या अंतिम वर्षाला असल्या पासून या कोंबडीला पाहतोय. शिवाय दरवर्षी येणारे पाव्हणे पण कोंबडी पाहुन आवर्जून पाहत राहतात. एकंदरीत गावात किंवा पंचक्रोशीत सर्वाधिक जगलेली कोंबडी म्हणजे हिच असावी. मुळात कोंबडी ही अंड्यासाठी, कापून खाण्यासाठी किंवा एकतर विकून व्यवसाय करण्यासाठी पाळली जाते. पोल्ट्रीच्या कोंबड्या तर सहा महिन्यांच्या आतच लोकांच्या पोटात जातात. गावठी कोंबड्या जास्तीत जास्त २-४ वर्षे जगवतात आणी नंतर त्यांचा बाजार करून टाकतात. पण हिला ७-८ वर्षे का जगवली ? त्यामागे काय कारण आहे ? हेच तुम्हाला सांगायचे आहे.
आजपासून ६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या घराजवळील एका कुत्र्याने मावशीच्या कोंबडीवर हल्ला केला. त्या कुत्र्याने कोंबडीची मान धरली. जिथे अन्न साठवले जाते ते अन्नाचे जठर (गचुरा) त्या कुत्र्याने बाहेर काढला होता. खाजा खिज ऐकून घरातील सर्व जन बाहेर आले. त्यांनी कुत्र्याला लांब पिटाळले त्यानंतर त्यांनी कोंबडीला उचलून धरले. पण तिचे अन्नाचे जठर तसेच खाली लोंबत होते. माझ्या दोन्ही मावश्या कुंदा काकू आणी शिंदू मावशी यांनी लगेच हळद आणी मिठाचे मिश्रण केले. लोंबत असलेला गचुरा तसाच परत आत कोंबला आणी त्याच्यावर हळद मिठाचा लेप लावला. संपूर्ण जखम फडक्याने बांधून टाकली आणी कोंबडीला खुराड्यात बसवले.
जीवावर बेतणारा हल्ला होऊनही कोंबडी जिवंत होती याचे विशेष वाटत होते. पण जगली तरी ती किती दिवस जगतेय ? हे कोणी सांगू शकत नव्हत. कारण सुरुवातीला तीने जे काही खाल्लं किंवा पाणी पिलं की ते सरळ बाहेर पडत होत. त्यामुळे तिच्या जगण्याची शक्यता नव्हतीच. पण कदाचित तिला अगोदरच दीर्घायुष्य होत की काय काय माहित ती काही दिवसात बरी झाली. तिला बांधलेले फडके काढून टाकले. जखम देखील भरत आलेली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा मोकळ्या अंगणात सोडून दिले. रोजच्या सारखे दिवसभर चरून फिरुन ती संध्याकाळी घरी परतु लागली. आता या गोष्टीला खूप काळ लोटला. त्यावर अनेक पावसाळे, जत्रा, शे दोनशे रविवार आणी गिर्हाईक येऊन गेले. पण मावशीने अजून तिला सांभाळून ठेवले.
कुत्र्याच्या हल्ल्या पासून जीव बचावलेल्या कोंबडीने अनेक वर्षे अंडी तसेच नवीन नवीन कोंबड्या जन्माला घातल्या. ज्यातून मावशीला चार पैसेहि मिळत राहिले. 3 वर्षे झाली का घरात कोंबडी ठेवत नाहीत. पाव्हणा आला की तिचा बेत केला जातो. पण या कोंबडी सोबत असं काही करायची इच्छाच कोणाची झाली नाही. तिच्यामागून कितीतरी कोंबड्या आल्या आणी गेल्या. पण ही कोंबडी अजूनही घरात कायम आहे. आता या कोंबडीचे बऱ्यापैकी वय झाले आहे. तश्या कोंबड्या १०-१५ वर्षे जगू शकतात असे वाचण्यात आले होते. त्यामुळे कोंबडीचा जन्म घेऊनही इतक्या वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे नशीबचं म्हणावं लागेल.
ही छोटीशी पण न ऐकलेली गोष्ट कशी वाटली ते रिप्लाय मध्ये नक्की सांगा. तुम्ही वाचून रिप्लाय दिला तरच मला समजेल की कोणी कोणी वाचली आहे. आणी कधी आलात गावच्या घरी तर कोंबडी नक्की बघून जा. धन्यवाद !!!
लेखन – संतोष दिवाडकर
Nice story