Lagnachya goshti : लग्न पहावे करून… यंदा कर्तव्य आहे… जुळल्या रेशीमगाठी… असल्या ओळी आता हमखास वाचायला मिळत आहे. शहरातील गल्लोगल्ली व गावातील वाडीवाडीत लग्न समारंभाचे सूर ऐकायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हीच वेळ योग्य आहे लग्नावर लिहण्याची. बरेच दिवस हे डोक्यात घोंगवणारे विचार लिहायला मोकळीक मिळत नव्हती. म्हटलं आता थोडा वेळ काढुच आणि मग केली ही सुरुवात.
या नव्या लेख मालिकेतून मला आधुनिक लग्न समारंभाविषयी सांगायचे आहे. तसे विषय बरेच आहेत. जसे की लग्नाची ठरवा ठरव, बस्ता, पत्रिका, मानपान, भोजन समारंभ, पाहुण्यांचे रुसवे फुगवे, वरातीचा घाट, पूजा, जागरण गोंधळ आणि पुढचे काही दिवस. यातील प्रत्येक मुद्द्यावर मी निश्चितपणे बोलणार आहे.
दोन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात अनुभव घेऊनच पुढे इतरांच्या लग्नातील सावळे गोंधळ सांगणार आहे. सुरुवात करायची झाली तर बघा बघी पासून. मुळात कोणत्याही लग्नाचा हा मुख्य पाया असतो. हा जर नीट नसेल तर त्या दोघांचे संपूर्ण आयुष्य हे तडजोड करण्यातच जातं. ज्यात सुखाचा शोध शोधून शोधून घ्यावा लागतो.
फार पूर्वी प्रेमविवाह म्हणजे गैर मानले जात होते. थोडक्यात पालकांना नाक कापले गेल्याचा आविर्भाव होत असे. आज हाच आविर्भाव अभिमान बनला आहे. आमक्या आमक्याच्या पोराने पोरगी पटकावली. तुमच्या पोराला काय जमत का नाय? किंबहूना आता पालक आपल्या मुलालाच म्हणतात की तुला मुलगी शोधता नाही येत का? की ते आता आम्हीच बघायचं? आता या प्रेमविवाहाच्या गोष्टी झाल्या. ज्या अजूनही काही घरांमध्ये मान्य नाहीत. जग काय म्हणेल? या एका प्रश्नामुळे कित्येक पालक आपल्या मुलांचे सुख हिरावून घेतात. तर काही मुलं घरातून पळून जाणे पसंद करतात.
पालकांना एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. देवाधिकानी देखील प्रेम केले आहे. यात गैर काय आहे ? शेवटी काय तर आयुष्याच्या जोडीदाराची निवडच ती. उगाच तुम्ही ठरवून दिलेल्या लग्नाचा मागे लागता आणि मुलांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता. यामुळे होत असे की, ठरवून केलेलं लग्न हे यशस्वी होत की नाही हे सांगू शकत नाही. काही वेळेस मुलाला मुलीचे वागणे पटत नाही, मुलीला मुलाचा स्वभाव पटत नाही. काही वेळेस शांत स्वभावाच्या मुलाला नखाने ओरबाडून मांजरी सारखी चवताळणारी बायको मिळते. तर कधी गरीब गाई मुलीला दारुडा आणि मारझोड करणारा अन्यायकारी नवरा मिळतो. आणि मग पुढे काही दिवस घरच्यांच्या बैठका, वोर्निंग लेटर, सोडचिठ्ठया, भांडण, खर्चाची मागामाग असे खूप काही कुटाने होतात. पण हे तेव्हाच जेव्हा त्रास सहन करायची तयारी नसते.
आई वडिलांना त्रास नको म्हणून कित्येक लेकीबाळींनी नवऱ्याचा व सासरच्या लोकांचा जाच सहन केला आहे. बापाकडे फुलाप्रमाणे आयुष्य जगलेली मुलगी सासरी आल्यावर अक्षरशः पायपुसन देखील बनली आहे. हे समाजातील भीषण वास्तव्य आहे. परिस्थिती आज ना उद्या बदलेल या एका आशेवर कित्येक संसार अजूनही सुरू आहेत. पण जोपर्यंत पती पत्नी एकमेकांच्या सुखाचा विचार करीत नाहीत तोवर हे संसार कधीच बहरत नाहीत. म्हणून म्हटले की स्थळ शोधन ही लग्नाची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. ही पसंद चुकली तर आयुष्याचा खेळ झाला. पण शेवटी खेळ तर नियतीचा पण आहे. जसं वालाह्याचा वाल्मिक ऋषी होतो तसंच काही.
म्हणजे सांगायचं हे की काही वेळेस पसंद चुकते सुरुवातीची काही वर्षे जाचात जातात पण कुठून तरी आशेची किरण जागी होतात आणि आयुष्याला कलाटणी मिळते. दुःखाचा संसार सुखाचा होतो जेव्हा वेळ चांगली होते. आणि बहुतेक वेळा ही चांगली वेळ आनण आपल्याही हातात असतं. अशा परिस्थितीत आपलं आयुष्य बरबाद झालं हा विचार सोडून आपलं आयुष्य सुंदर होणार आहे हा विचार करून संसाराचा गाडा पुढे हाकत रहावा. असे करणाऱ्याच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस येतात.
मुला मुलीचे लग्न जमवताना अगोदर त्यांच्या सुखाचा विचार केला जावा. कारण फक्त लग्न लावून देणं ही आपली जबाबदारी नाही. तर आपल्या मुलाबाळाचं सुख कशात आहे हे पाहूण आपली खरी जबाबदारी आहे. असो आता लग्न ठरल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी नातेवाईकांमध्ये, शेजारीपाजारी, गावभर पसरते. मग चर्चा सुरू होतात. “हीच जमलं बरं का… कुठं दिली तिला?… बरीच लांब दिली… आता तिकडे कामं जमली तर बरी… अजून चांगलं स्थळ बघायला पाहिजे होतं… पोरगी लय शिकली पण पोराचं शिक्षण कमी आहे… पोर सावळी आहे पण नवरा गोरापान भेटला बुवा… सरकारी नोकरी आहे पोराची… तरी पण नीट चौकशी केली पाहिजे यांनी…” या अशा चर्चा ऐकायला मिळतात.
ऍरेंज मॅरेज… म्हणजेच ठरवून लग्न करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे आमच्या मुला मुलीचे लग्न आमच्याच समाजात किंवा जाती जमातीत करून देण्याचा अट्टहास. मग जातीपुढे आयुष्याची माती का होईना. आम्ही जोखीम उचलायला तयार असतो. जो जातीचा नाही तो या मातीचा नाही अशा फुशारक्या करणारी चार पाच स्वयंघोषित विचारवंत टाळकी पुढे येतात आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा सौदा करून सुपारी फोडून पान चावून कोपऱ्यात घाण करून निघून जातात. यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता ही आहे की यांचे मोठेपण मिरवणे हे कुणाच्या तरी आयुष्याशी खेळ असतो. त्यामुळे आजच्या जगात जाती पाती पाहण्यापेक्षा तुम्ही मुलाचे विचार आणि आपल्या मुलीला तो कसा सुखी ठेऊ शकतो हे पाहण्याकडे प्राधान्य द्या. कारण जात जात करून उद्या जेव्हा संकट येईल तेव्हा कोणी पूढे येत नसतं. त्या संकटाला आपल्यालाच सामोरे जायचे असते. मग जी चार लोक तुमच्या गरजेला उपयोगी पडतील का नाही हे माहीत नाही ते काय म्हणतील या विचाराने मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. जोडीदार निवडताना जात पात विसरा त्या जोडीदाराची गुणवत्ता पहा. सुखाचा संसार होईल अशी खात्री असेल तर द्या हातात हात.
तुमचं लग्न झालं आहे का? ठरलं आहे का? किंवा तुमच्या ऐकण्यात असे काही किस्से असतील तर नक्की कमेन्ट करा. किंवा मला पर्सनल मेसेज करून तुमचं मत नक्की कळवा. जेणेकरून मला हे कळेल की हा लेख कोण कोण वाचत आहे. आणि वाचकांना त्याबद्दल काय वाटते. आता पुढच्या भागात आपण जरा निमंत्रण पत्रिकां बद्दल बोलूयात. तो खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यावर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. पत्रिका ऑनलाइन की ऑफलाइन द्याव्यात यावर व्यक्त होऊयात. वाट पहा… लवकरच पुढील भाग.
–संतोष दिवाडकर (युवा पत्रकार 8767948054)
Lagnachya goshti : Lagna pahave karun; part 1
दादा चालू परस्थिती वर लिहिलं आहे 👌