लेख

मुंबईचा वडापाव बनला महाराष्ट्राचा फेव्हरेट; Vadapav history

Vadapav history : ‘वडापाव’……… एक अशी चव जी प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांच्या जिभेवर जणू कोरली गेली आहे. आज २३ ऑगस्ट हा दिवस म्हणजे जागतिक वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. मग असे असेल तर आजच्या दिवशी मुद्दाम वडापाव खायलाच हवा. लहानपणापासून जो वडापाव आपण खात आलो तो वडापाव नेमका आणला कसा ? याबाबत अनेक कहाण्या आहेत पण माहीत खुप कमी लोकांना आहेत.

काय असतो वडापाव ? तर एक पावाचा तुकडा मधोमध भेदून त्यात टाकलेला बटाट्याचा बेसनात तळलेला एक गोल गरगरीत गोळा. आता महाराष्ट्रात पावाला डिमांड मिळाला तो वड्यामुळे. बटाट्याच्या भाजीपासून केलेले गोळे बेसनात बुडवून तेलात सोडले की तयार होतो वडा. त्याच वड्याला पावात घातला की झाला वडापाव. आता हे सर्वांना माहिती आहेच. वडापाव दिसायला कसाही असो शेवटी त्याची चव काय आहे ? यावरून त्याचा दर्जा कळतो. वडा पावाला पुढे चटणी आणि मिरचीची जोड आली. आणि चटणी मिरची शिवाय लोकांनी वडापाव खाण्याला नाराजी दर्शविल्याने विक्रेत्यांना देखील खादाड मंडळींच्या जिभेचे चोचले पुरवायला घेतले. एकीकडे जिभेचे लाड आणि दुसरीकडे खिसा जाड. धावपळीच्या युगात घराबाहेर असताना वेळेची आणि पैशांची बचत करून पोट भरण्यासाठी वडपावची जागा कुणीही घेऊ शकत नाही.

Vadapav history :- आम्ही घेतलेल्या शोधात अशी माहिती मिळाली की हा वडापाव मुळात मुंबईत तयार झाला आहे. स्वातंत्र्या नंतरच्या काळात मुंबईत गिरणी कामगारांचे मोठे प्रमाण वाढले होते. याचदरम्यान १९६६ साली दादर रेल्वे स्थानकात अशोक वैद्य यांनी या वडपावला प्रथम विक्रीसाठी आणले. तयार केलेली बटाट्याची भाजी बेसनात घोळून त्यांनी उकळत्या तेलात सोडली आणि वड्याचा जन्म झाला. बटाट्याचा वडा रेल्वे स्थानकात खूप प्रसिद्ध होऊ लागला. पुढे हा वडापाव गरमगरम खाणे जरा कठीणच होते. आणि मग पुढे लगेचच याच वड्याला मिळाली पावाची जोड. आणि वडापाव खऱ्या अर्थाने उदयाला आला. वैद्य यांनी बनवलेला वडापाव पाहून ठिकाणी स्टोल लागू लागले.

वडापाव आणि शिवसेना :- त्याकाळात दाक्षिणात्य लोकांनी मुंबईत आपले पदार्थ विकून जम बसवला होता. पण नव्यानेच सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना हलहळू विस्ताराला लागली होती. आणि एके याच वड्याने बाळासाहेब ठाकरेंच्या जीभेला तृप्त केले. जिभेवर रेंगाळलेली चव त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी याच वडापावला चालना दिली. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान विसरून चालणार नाही. आणि याच वडापावने पुढे दाक्षिणात्य पदार्थांच मार्केट ठप्प करून मुंबईत स्वतःच आणि परिणामी मराठी अस्मितेच नाव उच्च स्थानी नेलं. पुढे शिवसेनेने शिव वडा नावाने उद्योग सूरू केला. आणि शिवसैनिकांनी वडापावच्या व्यवसायात पाय रोवले.

Diwadkar Vadapav Karjat :- मुंबई पुणे प्रवास करीत असताना कुणी दिवाडकरांचा वडा खाल्ला नाही असे खूप कमी लोकच असतील. आता तुम्ही म्हणाल पहिल्या सारखा राहिला नाही. आता हे ग्राहकांचं म्हणणं आहे त्याच्या जिभेने केलेले परीक्षण. वडापावचा जन्म झाल्या नंतर पुढील काही वर्षानंतर कर्जतमध्ये दिवाडकरांचा वडापाव प्रसिद्ध झाला. त्याकाळी रेल्वे स्थानक म्हणजे विशेष गजबजाट नसायची. एक रेल्वेगाडी गेली की शुकशुकाट. ना कसली अनाऊन्समेंट, ना लोकांच्या बडबडीचा आवाज, ना बाहेरील गाड्यांचे हॉर्न. अतिशय शांत वातावरण कर्जत रेल्वे स्थानकात असायचे. मनुष्य वस्ती देखील फारशी नव्हती. या काळात डेक्कन क्वीन सारखी एक्स्प्रेस या स्थानकात खूपवेळ थांबायची. त्याचे कारण असे की कर्जतच्या पुढे खंडाळा घाट सुरू होत असल्याने इथे एक्स्ट्राचे इंजिन जोडण्याची गरज भासायची. आणि इंजिनच्या जोडजोडीला बराच वेळ निघून जायचा. मुंबईपासून प्रवास करून आलेले पुण्याकडे निघालेले प्रवासी कर्जत पर्यंत येई पर्यंत भुकेले असतात. आणि म्हणूनच इथे वडापावची विक्री अधिक प्रमाणात होते.

कर्जतपासून पुढे राहत असलेले बाबुराव दिवाडकर यांनी या गोष्टीचा फायदा करायचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला घरून परातभर वडे बनवून आणले आणि रेल्वे येताच विकायला घेतले. मुंबईपासूनचा प्रवास, पुढे घाट मध्ये खाण्यास काही नाही. म्हणून त्यांचे वडे पटापट विकले गेले. हळूहळू त्यांनी वडे वाढवले. पण जितके वाढतील तितके वडे विकले जाऊ लागले. आणि पाहता पाहता दिवाडकर वडापाव ब्रॅन्ड बनला. पुढे हा व्यवसाय बनला आणि आता या वडापावची फ्रँचायजी विकली जाते. त्यामुळे आता या वडापावचं नाव जरी दिवाडकर असलं तरी तो बनवणारा दिवाडकरच असेल हे सांगता येत नाही. पण तेव्हाचा आणि आताचा वडापाव यात जमीन आणि आसमानाचा फरक आहे. आकारा सोबतच चव देखील बदलली असल्याचे ग्राहक सांगतात. एकंदरीतच आता हा वडापाव आवर्जून नव्हे तर भुकेपोटी नाईलाजाने खाल्ला जात असल्याचे खाणारे म्हणतील. असोत खवय्यांना नाराज केल्याचा परिणाम व्यवसायावर होतो हे कळायला वेळ लागत नाही.

वडापाव महाराष्ट्राच्या गावागावांत :- मुंबईतून निघालेला वडापाव हळुहळु बाहेर पडला आणि संपुर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. आता वडापाव फक्त मुंबईचा राहिलेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. खेडोपाड्यात एसटी स्टॅन्डवर एक रुपयाला स्वादिष्ट वडापाव विकला जाऊ लागला. आज प्रत्येक गाव खेड्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला फेमस वडापाव हॉटेल नक्कीच मिळेल. जसे की महाराष्ट्रातील संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा इथे एसटी प्रवासी वडापाव वर ताव देतात. कोल्हापुरात पावावर का जुलूम होत आहे माहीत नाही. कारण येथील वड्याची चव इतकी खास नाही आणि शिवाय पावाच्या जागी ब्रेड दिला जातो. त्यामुळे याठिकाणी वडापाव खाण्याचे समाधान मिळत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

बदलता वडापाव :- सुरुवातीला वडा…पुढे पावाची जोड… चटणीची चव… आणि ठेचा किंवा मिर्चीचा झणका… इथपर्यंत वडापाव खाण्यात खरी गंमत आहे. पण आता वडापाव मध्ये छेडछाड करून त्यात वैविध्यता आणण्याचा प्रयत्न खूप वेळा केला जातो. प्रत्येक प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांची एक वेगळी आणि जबरदस्त अशी चव आहे. कारण चवीनेच प्रसिद्धी दिलेली असते. काही वडापाव विक्रेते हे आपल्या वड्या बरोबर चटणी देताना खूप काळजी घेतात. आणि फक्त चटणीमुळे देखील तिथला वडपाव प्रसिद्ध होतो.

२०१० च्या दशकात मुंबईत काही ठिकाणी वडापावची साईज मोठी केली आणि जम्बो वडापाव म्हणून मार्केट जमवले. तर पुढे पाश्चिमात्य बर्गरचा क्रेज पाहून काहींनी वडापावचा आकार देखील गोल केला आणि गोली वडापाव नावारुपाला आला. २०२० च्या दशकात काही लोकांनी वडपावला चायनीज चटण्यांमध्ये बुडवून विकला. नावीन्य असल्याने प्रसिद्धी देखील मिळाली. काहींनी तर चीज,बटर,व्हाईट सॉस शक्य होईल तितके नवनवीन प्रयोग वडापाव सोबत केले. यामुळे आजच्या तारखेला १२ रुपयांचा साधा वडापाव आणि २५ रुपयांचा हायजेनिक वडापाव असे प्रकार बनले. किती बदल जरी झाले तरी साधा आणि खरा वडपावच आज सर्वाधिक लोकांची पसंद बनलेला आहे. २०३० च दशक सुरू झालेल आहे. त्यामुळे इतक्या वर्षांचा वडापाव आणखी कोणती रूप घेतो हे येणारा काळच सांगेल. तो पर्यंत खात रहा आणि भरवत रहा… मराठमोळा वडापाव.

सदर लेख तुम्हाला कसा वाटला ? हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशी माहिती वाचायला आवडेल याबद्दलही आपल्या सूचना कळवा.

-संतोष दिवाडकर

Mumbai’s Vada pav becomes Maharashtra’s favourite; Vadapav history

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *