कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता.
यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.
येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.
-कुणाल म्हात्रे
Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development