पवना लेक कॅम्पिंगला निघालोय खर पण काय होणारे हे लेखक सोडून इतर कुणालाच माहित नाही.
पूर्वसूत्र :- जिम मधून बाहेर आल्यानंतर संतोष आणि संदेश दोघांमध्ये पिकनिक बद्दल विषय निघतो. दुसर्याच दिवशी ऑफिसमध्ये मिटिंग होते आणि संपूर्ण स्टाफचा पवना कॅम्पिंगला जाण्याचा निर्णय ठरतो. भाग एक वाचला नसेल त्यांनी तो वाचावा.
पिकनिकचा दिवस सकाळी सात वाजताच आमची टीम तयारीनिशी ऑफिसमध्ये पोहोचली. अशोकच्या मित्राची एक ट्रॅव्हलर गाडी होती. त्याने त्याला आधीच फोन करून बोलावले होते. तो बरोबर सात वाजता ऑफिसवर पोहोचला होता. “अय्यो अशोकजी… हमको बोला 7 बजे आओ. हम आ गये… लेकीन तुम्हारे लोग ही आये नहीं अब तक” तंबाखू मळत मळत तो बोलत होता.”येतील ना **वाशा तुला कसली घाई एवढी.” अशोकने त्याला हसतच शिवी हासडली.अशोकच्या मित्राने तंबाखू खाल्ली आणि हात झटकले. हाताला लागलेला कचरा पाठीमागून येणाऱ्या शिंदे सरांच्या नेमका डोळ्यात उडाला.“आई ग….” सरांनी डोळेच मिटून घेतले. पण संदीप सरांनी पुढे येत त्यांना पाण्याची बाटली दिली आणि डोळे धुवायला सांगितले.“सॉरी हा सर जी… हमने आपको देखा हि नही” असे म्हणत तो करिश्मा कडे पाहून हसायला लागला.पाहता पाहता सर्व जण जमले. अगोदर आम्ही मिळून सामान गाडीत लावले. अशोक त्याच्या मित्राच्या म्हणजेच ड्रायव्हरच्या बाजूला बसला. पहिल्या सीट वर मोरे मेम,श्वेता आणि करिश्माने जागा अडवली. त्यांनी अख्खी एक लाईनच घेतली. पाठी मागे लगोलग संदीप सर आणि जीवन जी बसले. एका सीट वर कानात वायरी घालून गौरव खिडकीला खेटून बसला. त्याच्याच बाजूला स्वप्नीलने जागा धरली. दुसऱ्या सीट वर अंकुशने देखील डोळे मिटून घेतले. पाठीमागे शिंदे सर, मी, संदेश, विशाल आणि ऋषी गप्पा मारीत होतो. आमच्या मस्तीत मध्ये मध्ये अंकुश,अशोक आणि जीवन भाग घेत होते. असे करता करता आम्ही मुंबई पुणे हायवेला लागलो.
गाडी हायवेला लागताच अंकुशने उलट्या सत्र सुरू केले. प्रसादच्या खिशात असलेल्या आवळासुपारीने अंकुशला दिलासा दिला. गौरव अजूनही गाण्यातच. खिडकीतून छान थंडगार वारा आत येत होता. खंडाळा घाटातील प्रवास सुंदर भासत होता. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात रंगत आणण्यासाठी जीवनजीने त्याचा बेगेतून माईक बाहेर काढला आणि सरळ करा ओके ट्रेक बस मधील स्पीकरला जोडून गाणी म्हणू लागला. ‘क्या हुआ तेरा वादा’, ’गुलाबी आखे’ अशी गाणी जीवन म्हणू लागला.शिंदे सर आणि संदीप सर देखील गाडीतच पाठीमागे येऊन थोडा थोडा डान्स करायला लागले. मी मात्र अधून मधून फोनवर केम्पिंगवाल्या मित्राच्या संपर्कात होतो. खंडाळा घाटातील बोगद्यातून जाताना विशाल, जीवन ,स्वप्नील आणि अशोक चौघेही शिट्ट्या मारायला लागले. ‘वे टू लोणावळा’ आमच्या सर्वांचे व्हॉट्स अप वर केव्हाच स्टेटस पडले होते. गौरवने इन्स्टाग्रामवर लाईव्ह देखील केलं. त्याला मोजून चार व्हीवस मिळाले. आणि ते पण आम्ही गाडीतलेच. असो त्याच बघून मी फेसबुकवर लाईव्ह आलो.
सकाळी साडे दहा वाजता आम्ही लोणावळ्यात पोहोचलो. तिथे एका हॉटेलवर आम्ही गाडी थांबवली. खरं तर सर्वांना खूप भूक लागली होती. म्हणून तिथे थोडासा नाश्ता केला.”अरे निघालो तेव्हा पासून लागली होती. आता मोकळा झालो” टॉयलेट मधून बाहेर येता येता ऋषी मला सांगत होता. तिथे आम्ही मुद्दामच मिसळपाव मागवला. “हमको मिसलपाव नहीं… हम मसाला डोसा खायगा जी.” अशोकने आणलेल्या ड्रायव्हरचा वेगळाच थाट.”म्याडमजी पाव मंगताय तो मंगा लो जी” करिश्मा कडे पाहून तो हसू लागला.नाश्ता करून आम्ही गाडीजवळ आलो.”कोण आहे काय माहीत ? सकाळ पासून बघतेय नुसता माझ्याकडेच बघतोय. दिसतो तर काळा घुशी गत” करिश्मा श्वेताला म्हणू लागली. पाहता पाहता सर्वे गाडीत बसले. गाडी सुरू झाली. कुमार रिसॉर्ट वरून उजवीकडे वळून गाडी पुढे निघाली.
दुधीवरे खिंडी मार्गे आमची गाडी अंतर कापू लागली. शेजारून दिसणाऱ्या पवना धरणाचे आम्ही व्हिडीओ काढत होतो. “ए अशोक इथे थांबव ना फोटो काढुयात” श्वेताने अशोकला सांगितले.”अय्यो हमको बोलोजी.. हमारा नाम सम्राट हे जी… सम्राट वेणूगोपाल अय्यर.. हम को बोलो जी. तुम जिधर बोलेगा उधर रुखाताय जी हम गाडी.” असे म्हणत त्याने बोलता बोलता कचकन ब्रेक दाबला. गाडीचा ब्रेक दाबताच पाठीमागच्या सीटवर निवांत आडवे झोपलेल्या शिंदे सरांचा तोल गेला आणि ते धाडकन सीटवरून खाली पडले.”कोण ए तो…. काय रे ए… अशी चालवतात का गाडी ?” उठता उठता रागाने ते मागून जोरात ओरडले.”अय्यो कोण बोला जी ?” ड्रायव्हर मागे पाहू लागला.”कोण बोला क्या बोला… असा कसा ब्रेक मारतो तू ?” शिंदे सर त्याच्यावर ओरडले.”ओ जाऊद्या अप्पा… गाडी आलथी समोर” मोरे मॅडम पुढूनच उठून म्हणाल्या.”ओ जाऊद्या शिंदे…. तुम्ही या इथं पुढे बसून आराम करा” संदीप सरांनी त्यांना पुढे येण्यास संगीतले.”अरे समजत नाय काय नाय माणसं आहेत का जनावर आहेत गाडीत? कशीही चालवतोय माणूस गाडी” असे म्हणत ते मध्य भागी गौरव च्या बाजूला बसले.”ए बाबा तू चल आता नको थांबू कुठं” संदीप सरांनी ड्रायव्हरला चलण्यास संगीतले. मी देखील पुढील डायरेक्शन सांगायला पुढे गेलो.
पवना धरणाला वळसा घालून आमची गाडी ‘जवण’ गावा जवळ आली. तिथूनच खाली एक रस्ता जातो. त्या रस्त्याने साधारण तीन किलोमीटर पुढे गेल्यावर एक बोर्ड लागला. ‘पेरडाईज केम्पिंग’. तिथून पुन्हा दोन किलोमीटर आत आल्यावर आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलो. केम्पिंग जवळ जाऊन आम्ही आमची गाडी पार्क केली. आणि सर्व खाली उतरलो. स्वप्नील, प्रसाद आणि बाकीचे गाडीतील सामान काढायला लागले. माझा मित्र गणेश तिथेच आमची वाट पाहत थांबला होता. मी पहिले त्याच्या हातात हात देत हस्तांदोलन केले.
“वेलकम टू पेरडाईज केम्पिंग… मायसेल्फ मिस्टर गणेश गोणते. विलींग टू युअर सर्व्हीस सर” त्याने आमचे स्वागत केलं.”थँक्स मिस्टर गणेश” मी देखील डोळ्यावरचा गॉगल उतरवला.”मग संतोष कसा झाला तुमचा प्रवास?” त्याने प्रश्न केला.”हम्म एकदम मस्त. चार तासात गावाला टच. शिवाय मध्ये मध्ये थांबलो देखील होतो.” मी म्हणालो.पाठीमागून आमचे सर आले.”मी ओळख करून देतो. हे आमच्या जनशक्ती चॅनलचे सीईओ संदीप सर, हे आमचे संपादक शिंदे सर, हे आमचे सहकारी पत्रकार जीवनजी, विशाल, संदेश, आमचा व्हडिओ एडिटर अशोक, अंकुश, गौरव हे आमचे केमेरा पपर्सन ऋषीकेश, स्वप्नील, प्रसाद आणि या आमच्या अँकर मोरे मॅडम, करिश्मा आणि श्वेता. आणि हे आमचे ड्रायव्हर सम्राटजी अय्यर” मी सर्वांची ओळख करून दिली.”आणि मित्रांनो हा माझा मित्र गणेश. पेराडाईज केम्पिंग मध्ये तो दोन दिवस आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. “हम्म… आता फक्त एक करा.. ओलमोस्ट 12 वाजलेत दुपारचे.. तुम्ही फ्रेश व्हा.. आणि जेवणार आता लगेच आहात की उशिराने ?” त्याने विचारले.”नाही नाही.. सावकाश दादा.. अजून लगेच नाही.” शिंदे सरांनी आजूबाजूचा परिसर न्याहाळत सांगितले.”एक मिनिटं सर… जो पर्यंत आम्ही सांगत नाही. तोपर्यंत कृपया कोणीही पाण्या जवळ किंवा पाण्यात शिरू नका. प्लिज तेवढं सहकार्य करा.” गणेश म्हणाला.”हो हो नक्की” संदीप सरांनी दुजोरा दिला.
आम्ही पटापट खोल्यांमध्ये गेलो. आमच्या बेग्स ठेवल्या. कपडे बदलली. आणि पुन्हा केम्पिंग एरियात फिरू लागलो. दुपार झाली असली तरी वातावरणात काहीसा थंडावा होता, कानावर पक्ष्यांचे आवाज पडत होते. जवळपास कोणतेही वाहन नसल्याने कोणताही इतर आवाज त्रास देत नव्हता. वाहणारा वारा देखील सुंदर वाटत होता. समोर पाहिले तर पवना धरणाचे निळे शार पाणी आणि नजरेला भिडणारा तिकोणा किल्ला उभा होता. पाण्याच्या पलीकडून तो खुणावत होता. धरणा कडेलाच केम्पिंग. लाईट्स होत्या पण त्या रात्री पेटणार होत्या. एका बाजूला खोल्या, आणि एक स्वयंपाक गृह अशी तिथली रचना होती. पार्किंग जवळच क्रिकेट साठी छोटे मैदान होते. आम्ही क्रिकेट खेळण्याचा बेत आखला. पण अजून आमचे जेवण बाकी होते. धरणातील मासे पकडून मस्त पैकी फ्राय केले होते. आम्ही सगळे एका झाडाच्या सावलीतच दुपारचे जेवण केले. गणेशने सांगितल्या प्रमाणे त्याच्या किचन मध्ये काम करणाऱ्या सखाराम आबा आणि खंडूबुवाने सर्वांना जेवण वाढले. फ्राय केलेले गरमागरम मासे, तांदळाची भाकर आणि काळ्या खेकड्यांचा रस्सा आणि इंद्रायणी भात आमच्या ताटात होता. आम्ही मस्त दाबून जेवण केले.
दुपारी तीन चार वाजता आम्ही क्रिकेट खेळू लागलो. शिंदे सरांनी एक बॉल लांब मारला. गौरव तो बॉल आणायला लांबपर्यंत गेला आणि त्याने चेंडू उचलला. काहीवेळ तो तिथेच कायतरी पाहत राहिला आणि त्याने बॉल माघारी फेकला. लांबून हळूवारपणे चालत चालत तो माझ्या जवळ आला. “अरे तिथे काय होत संतोष ?” त्याने येऊन मला विचारले.”काय होते .” मी त्याला विचारले.”अरे तिथे देवा सारख कायतरी होत. आणि खूप सारे लिंबू आणि कोंबड्यांची डोकी होती.” तो सांगू लागला.तोच पाठीमागून गणेश पुढे आला.”अरे ते तिथे वेताळबुवा आहे.” गणेश म्हणाला”म्हणजे नक्की काय ?” मी विचारले.”अरे आज अमावस्या नाय का… म्हणून उतारे आणून टाकतात.” तो सांगू लागला.”हा हा हा हा…. एवढी अंडी वाया घालवली.. आम्हाला तरी द्यायची” गौरव मला हसून सांगू लागला.”एक मिनिटं…. मित्रा हसायचा भाग नाही हा” गणेशने त्याला शांत केले.”म्हणजे गणेश ? काय भानगड तिथे ?” मी विचारले.”संध्याकाळ होत आली. मी आज तुम्हाला धरणा जवळ तर पाठवणार नाहीच. धरणावर उद्याच जाऊ. पण आज तुमचा जो काही प्लॅनिंग असेल ना तो इथे आतच करा.” गणेश बोलला.”आतच करा म्हणजे ?” मी पुन्हा विचारले.”अरे म्हणजे बाहेर कुठे जाऊ नका.. तसं मी सांगेलच रात्री गेम संपल्यावर” असे म्हणत त्याने माझ्या खांद्यावर थोपटले आणि तो निघून गेला. या सर्व गोष्टीं मुळे माझ्या मनात शंभर प्रश्न निर्माण झाले. क्रिकेटवर माझं लक्ष लागेना. इथे ग्राउंडवर मात्र चांगलाच धुराळा उडाला होता. मी मात्र विचारात हरवलो होतो.
क्रमशः