Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब बरोबर असल्याचे मान्य केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण आणि सर्व राजकीय समीकरणे पूर्णपणे फिरली आहेत. आता नेमके मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे निवडणूकीच्या निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यात जरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी कल्याण डोंबिवलीत मात्र या दोन्ही बाजूंमध्ये तू तू मे मे अशीच परिस्थिती पहायला मिळते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. मात्र शहरात भाजपा, शिवसेना, उबाठा गट आणि मनसे या चार पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ पहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा महापौर बसला नसून आता भाजप देखील शिंदे गटा समोर चालत नसून त्यांनी महापौर पदाची वलग्ना करू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला देत त्यांना डिवचले आहे.
राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत असून शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजपचे खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
–संतोष दिवाडकर
Raju Patil & Ganpat Gaikwad criticized Shinde