लेख

आजोबांच्या तरुणपणातला फोटो लागला हाती

आरसा हा आपला वर्तमान दाखवतो. पण आपला भूतकाळ जिवंत ठेवतो तो म्हणजे कॅमेरा. तो आता तर ज्याच्या त्याच्या हातातल्या मोबाईल फोनमध्ये आलेला आहे. पण पूर्वीच्या काळी कॅमेरा देखील फार दुर्मिळ असे. आज माझ्या वडिलांनी मला एक जुना फोटो दाखवला. जुन्या काळात जशी तैलचित्रे असायची तसा तो फोटो होता. कुणाचा फोटो होता हे अगोदर समजलेच नाही. अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या तरुणाचा तो एक रुबाबदार फोटो पाहत असतानाच वडील म्हणाले की हा तुझा आजोबांचा फोटो आहे.

फोटो पाहून विश्वासच बसेना. कारण मी माझ्या आजोबांना लहानपणी पाहिले होते. 2000 साली ते देवाघरी गेले जेव्हा माझे वय 6 वर्षे होते. त्यानंतर एका फोटोमध्येच मी त्यांना पाहत होतो. जो त्यांचा अंदाजे 60 ते 65 वयाचा फोटो असेल. यावरून कल्पनाच करू शकणार नाही की ही फोटोतली तरुण व्यक्ती माझे आजोबा असतील. आखीव रेखीव भुवया आणि भेदक अशी त्यांची नजर होती. कायम वजनात राहायचं आणि रुबाबात जगायचं ही त्यांची स्वभावशैलीच होती. गावखेड्यात आता 21 व्या शतकात बदल होऊ लागले आहेत. त्यापूर्वी शहरी भाग म्हणजे जणू परराज्यात जाण्यासारखे होते. दिवसभराचा अपूर्ण प्रवास आणि कुठेतरी मुक्काम असे काही त्याकाळी (50 वर्षांपूर्वी) असायचे.

ऐन तारुण्यात आजोबांनी गावी राहून फोटो कसा काढला? असा प्रश्न माझ्या मनात आला. फोटो मध्ये सूट घातलेला व्यक्ती गावाला कसा असू शकतो हाही प्रश्न आला? त्यानंतर वडिलांकडून समजले की माझे आजोबा हे तरुणपणातच मुंबईत आले होते. साधारणपणे तो काळ असावा अंदाजे 1960 ते 1965 च्या दरम्यानचा. मुंबईत आल्यानंतर त्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची देखील संधी मिळाली होती. परंतु शहरापेक्षा गाव बरा असे त्यांना वाटले असावे किंवा कौटुंबिक जबाबदारी, अशा कोणत्यातरी कारणाने त्यांनी मुंबईतील वास्तव्य सोडून पुन्हा ते गावात आले. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा खेडयात त्यांना राहणे जास्त सुकर वाटले. पुढे त्यांनी कायमस्वरूपी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुलं आणि तीन मुली असा त्यांचा प्रपंच होता. पत्नी पार्वताबाई यांच्या सोबत त्यांचा शिस्तीचा पण सुखाचा संसार झाला. पाठीवर एक भाऊ आणि दोन बहिणी तुकाराम, अंजुबाई आणि पप्पूबाई.

पप्पूबाई ही त्यांची बहीण कडक स्वभावाची होती. पुढे त्यांचाही विवाह झाला. मुळशी तालुक्यातील मौजे उरावडे गावात कांजणे घराण्यात त्यांना देण्यात आले. तर अंजुबाई यांनाही मुळशी तालुक्यातील मौजे आंबवणे गावात भावेकरांची सून म्हणून पाठविले. पुढे लहान भावाचा विवाह झाला. आणि धोंडिबा बाबांनी घराची वाटणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. त्यांची पाच अपत्ये असून माझे वडील नारायणराव हे थोरले सुपुत्र. यानंतर राजेंद्रराव, नंदाबाई, मंदाबाई, कुंदाबाई ही माझ्या वडिलांनी भावंडे.

मुंबईत वास्तव्यास असताना त्यांनी एका फोटो स्टुडिओमध्ये जाऊन स्वतःचा एक फोटो काढला होता. तो फोटो खरंतर ब्लॅक अँड व्हाईट होता. पण गावी येताना ते हा फोटो घेऊन आले होते. त्याकाळी स्वतःचा फोटो असणे ही खूप मोठी गोष्ट होती. गावात आल्यानंतर संपूर्ण गावाला त्यांनी तो फोटो दाखवला. फोटो पाहण्यासाठी गावकरी म्हणजेच त्यांचे सवंगडी घरीही येत होते. अनेक वर्षे होत गेली. धोंडीबारावांचं वय वाढू लागले. मुले मोठी होत गेली. थोरला मुलगा म्हणजे माझे वडील नारायणराव अंदाजे 12-13 वर्षांचे असतानाच त्यांना दमदाटी करन त्यांचे भाचे सुरेशराव भावेकर यांच्यासोबत मुंबईला नोकरीस पाठवून दिले. तो काळ होता 1962 चा. (वडिलांचा प्रवास नंतर लिहून प्रकाशित केला जाईल).

माझे वडील मुंबईत नोकरीस आल्यानंतर ते अजूनही मुंबईतच आहेत. गावाशी नाळ जोडली असल्याने बालपण गावी गेले असल्याने ते अधूनमधून गावी जातातच. तेव्हाही गावी गेले असताना आजोबांच्या जुन्या सामानात त्यांना आजोबांचा हा फोटो सापडला. त्यांनी तो फोटो मुंबईत आणून बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये रंग भरले. आणि फ्रेम करून गावाला पाठवून दिली. पण फ्रेम फुटल्यानंतर फोटो व्यवस्थितपणे ठेऊन देण्यात आला. आता पुन्हा तो फोटो त्यांना मिळाला आणि त्यांनी तो मला दाखवला. म्हणून हा फोटो आणि फोटोमागची जेवढी समजली तितकी कहाणी सर्वांना समजावी यासाठी हा माझा बऱ्याच दिवसनांतर आलेला स्पेशल लेख.

धन्यवाद !!!

  • संतोष नारायण दिवाडकर (पत्रकार 8767948054)

सूचना : ज्यांनी कुणी हा लेख वाचला असेल ते जर मला ओळखत नसतील तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप वर आपल्याला काय वाटलं ते कळवावे. आणि आणखीन काही जुन्या गोष्टी शेअर कराव्यात. अगदी निःसंकोचपणे बिनधास्तपणे सांगा.

About Author

2 thoughts on “आजोबांच्या तरुणपणातला फोटो लागला हाती

  1. blog is beautiful! The photo of your grandfather evokes memories, bringing the past to life. Great writing!

  2. पत्रकार श्री संतोष नारायण दिवाडकर, सस्नेह नमस्कार 👏 “माझ्या आजोबांचा तरुणपणातील फोटो लागला हाती ” हा लेख वाचायला. खूप खूप आनंद झाला. नातवाने आजोबांच्या प्रतिमेला स्मरण करून जिवंतपणा साकारण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर कौतुकास्पद आहे.
    लेखाची सुरुवात “आरसा हा आपला वर्तमान दाखवतो. पण आपला भूतकाळ जिवंत ठेवतो तो म्हणजे कॅमेरा.” ने केली. हे सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. आपले वडील श्री. नारायण धोंडिबा दिवाडकर हे माझे खास मित्र. ईश्वर कृपेने आमची भेट सन 1981 मध्ये झाली. आम्ही दोघे एकाच वेळी एसटी महामंडळ मुंबई सेंट्रल येथे एकत्र लागलो. त्या दिवसापासुन आजतागायत आमची मैत्री आहे. आपल्या वरील लेखात आपण म्हटले आहे . (वडिलांचा प्रवास नंतर लिहून प्रकाशित केला जाईल). खूप आनंद वाटला. म्हणुनच हा लिखाणाचा प्रपंच केला.
    मी अनेक वेळा आपल्या कल्याण येथील निवासस्थानी आलो आहे. माझी ओळख पटली असेलच. एकदा कल्याण येथे आलो असता आपण आणि आपली बहीण दोघेही माळ्यावर नाटकाचा सराव करत होता. त्यावेळी मी विचारले मुलाला कलाक्षेत्राची खूपच आवड दिसते. तेव्हा आपले वडील म्हणाले हो त्याला लहानपनापासून पत्रकारितेची खूप आवड आहे. तेव्हा वडिलांना सागितले त्याला प्रोत्साहन द्या. खरोखर वडिलांनी देखील खूप चांगले सहकार्य केले. त्याची फलश्रुती आपण करून दाखविली त्या बद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    आपले आई – वडील मुंबईत लालबाग येथे राहत होते आणि मी त्यावेळी माझगांव – ताडवाडी, मुंबई 10 येथे रहाता होतो. आमचा घरचा गणपती आम्ही लालबाग येथील मूर्तिकार श्री. राजन विठ्ठल झाड यांच्याकडून घेत होतो. त्यामुळे श्रावणातील पाहिल्या शनिवारी गणपती सांगितल्या पासून ते भाद्रपद चतुर्थीला गणपती येई पर्यंत माझ्या मित्रांसह बर्‍याच फेर्‍या लालबागला होत असत. त्यावेळी माझी फेरी आपल्या वडिलांकडे नेहमीच होत होती. त्यामुळे आपल्या आईची देखील भेट होत होती. आपले आई – वडील खूप म्हणजे खूपच प्रेमळ आणि माणस जोडणारी आहेत. Lalbaug च्या छोट्याशा खोलीत त्यांचा संसार होता. ज्या ज्या वेळी घरी जायचो तेव्हा तेव्हा आम्हाला जेवल्याशिवाय पाठवत नव्हते. तो पुण्याचा सुगंधी भात आजही स्मरणात आहे. आपल्या आईच्या जेवणाची गोडीची एवढी होती की त्या छोट्याशा खोलीत देखील आम्हाला महालाच्या आनंद मिळत होतो. ईतक भरभरून प्रेम आपल्या मातोश्री आणि वडिलांकडून मिळत होत आणि आजही मिळत आहे. आपल्या लग्नाची पत्रिका मिळाली होती. परंतु काही घरगुती अडचणींमुळे गावी लग्नाला येता आले नाही. परन्तु नंतर मी ऑफिस मधील सहकारी सौ. बरे मॅडम आणखी एक मॅडम आलो होतो. आपण दोघाउभयतां कार्यकारण गावी गेला होता त्यामुळे भेट झाली नाही. त्यावेळीही आपल्या मातोश्रींनी केलेल्या जेवणचा आस्वाद घेतला होतो. आपण खूप भाग्यवान आहात की आपल्याला असे आई वडील भेटले. मुंबईत मिळेल तशा जागेत राहून कष्ट करून आपणास आपल्या ताईला संस्कारित करून तुमचा दोघांचा संसार थाटून दिला. आणि कल्याण सारख्या ठिकाणी 1+1 छान पैकी कायम स्वरूपी घर घेतल. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
    मध्यंतरी काही काळासाठी आपले आई वडील भांडुप मुक्कामी राहत होतो. माझी सासुरवाडी भांडुप देखील भांडुप होती. त्यावेळी मी माझी पत्नी, माझी मुलगी रसिका त्यावेळी लहान होती (आत्ता तिला 2 वर्षाची मुलगी आहे.) आपल्या मातोश्रींनी कोलंबीचा बेत केला होतो. तेव्हा माझा मुलीला कोलंबी येवढी आवडली की ती सारखी कोलंबीच मागत होती. कोलंबो देऊन देऊन टोप खाली झाला. शेवटी सांगितल टोपच खाली झाल तेव्हा ती थांबली. खूप खूप आठवणी सांगण्यासारखा आहेत. कागद कमी पडतील. असो….
    आम्ही आवड आणि छंद यातून agri भाषा, सण, उत्सव, परंपरा यांची सांगड घालून कोरोनावर आधारित ” नाती रक्ताची” लघुपट करीत आहोत. नुकतच शूटिंग पूर्ण झाल आहे. Editing आणि dubbing बाकी आहे. वेब सिरीज करणार आहोत. तरी कलाकार, तंत्रज्ञ यांच्या मुलाखती व एकंदरीत संपूर्ण माहिती प्रेस साठी कशा प्रकारे तयार करता येईल याबाबत माहिती मिळाल्यास उपयुक्त होईल.
    पुःनशच अभिनंदन आणि आपल्या पत्रकारितेला लाख लाख शुभेच्छा. 💐
    आपला,
    श्री. रमेश गणपत माळी
    निर्माता
    श्री एकवीरा देवी प्रॉडक्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *