कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.
शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.
-कुणाल म्हात्रे
Schools in Maharashtra resume from today